बिहारमध्ये काँग्रेसचं ब्रेकअप पुढची लोकसभा निवडणूक एकट्यानंच लढवणार

जसजशा निवडणूक जवळ येत आहेत. काँग्रेस मजबूत होण्यापेक्षा जास्तच विभागत चाललंय. एक झालं कि एक टेंशन हाय कमांड समोर यायला लागलाय. काँग्रेस, उत्तरप्रदेश, छत्तीसगड नंतर आता बिहारमध्ये राजकीय नाट्य पाहायला मिळतंय.

बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसमधील युती तुटली आहे. काँग्रेसचे बिहार प्रभारी भक्तचरण दास यांनी याबाबत जाहीर घोषणा केली. त्यांनी म्हंटल कि, येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राज्यातील सगळ्या ४० जागांवर आपला उमेदवार उभा करेल.

भक्तचरण दास  यांच्या या घोषणेमुळे बिहारमध्येही काँग्रेसला महागठबंधांमधून बाहेर पडावं लागल्याचं स्पष्ट झालाय. गेल्या जवळपास ३० वर्षांपासून काँग्रेस आणि राजद एकत्र होते.

खरं तर, राज्यातील दोन जागांच्या पोटनिवडणुकीवरून सुरू झालेल्या वादामुळे दोन्ही पक्षांमधील ही युती तुटली आहे.

भक्तचरण दास म्हणाले, “राजदने युती तोडली असल्याने, आता ते २ जागांवर पोटनिवडणूक लढवत आहेत. काँग्रेस स्वत: च्या ताकदीवर उभी राहील आणि आम्ही पुढच्या निवडणुकीत ४० लोकसभा जागांवरही जोरदार लढा देईल.”

ते पुढे म्हणाले,

राजदने युतीचे संबंध राखले नाहीत. आम्ही दोन्ही जागांवर पोटनिवडणूक जिंकण्यासाठी लढत आहोत. काँग्रेसचे सर्व नेते येथे उपस्थित आहेत, आजपासून प्रचार तीव्र होईल. काँग्रेस दोन्ही जागांवर समान लढत करत असून आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. लोक आरजेडी आणि एनडीए दोघांनाही पाहत आहेत.

अलीकडेच, काँग्रेसचे बिहार प्रभारी भक्त चरण दास यांनी राजदवर भाजपशी संबंध असल्याचा आरोप केला होता. नंतर, राजदचे प्रवक्ते आणि खासदार मनोज झा यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, भक्त चरणदासांना बिहार समजत नाही.

ज्यानंतर आज काँग्रेसने थेट आरजेडीसोबत संबंध तुटल्याची घोषणा केली. महत्वाचं म्हणजे काँग्रेसने युती तोडण्याची घोषणा अशा वेळी आली आहे,  जेव्हा कन्हैया कुमार पक्षात सामील झाल्यानंतर पहिल्यांदा बिहारमध्ये येत आहे. सोबतच हार्दिक पटेल सुद्धा बिहारमध्ये येणार आहे.

यासोबतच पप्पू यादव पोटनिवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणाही करू शकतात. एवढंच नाही तर पप्पू यादव यांचा जनता अधिकार पक्ष  काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतो,अशीही शक्यता वर्तवली जातेय.

यात विशेष गोष्ट म्हणजे कन्हैया आणि पप्पू या दोघांनाही लालू-तेजस्वी आवडत नाहीत.

दुसरीकडे, काँग्रेसने युती तोडल्याच्या घोषणेवर राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह म्हणाले की,

आरजेडी अजूनही महाआघाडीचा एक भाग आहे. मी लांबच्या गोष्टींचा इतक्या लवकर विचार करत नाही. २०२४ मध्ये निवडणुका होणार आहेत आणि आम्ही महायुतीचा भाग आहोत.”

येत्या ३० ऑक्टोबर रोजी बिहारमधल्या दोन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. कुशेश्वर आणि तारापूर विधानसभा जागांसाठी ही निवडणूक होईल. ज्यासाठी दोन्ही पक्षांनी आधीच  आपली युती तोडली आणि एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत.

काँग्रेसने आरोप केला होता की, त्याच्या संमतीशिवाय राजदने दोन्ही जागांवर आपले उमेदवार उभे केले. यानंतर काँग्रेसनेही दोन्ही जागांवर आपले उमेदवार उभे केले. आता महायुतीच्या दोन्ही मित्रपक्षांचे उमेदवार आमनेसामने आहेत.

खरं तर, पोटनिवडणुकीच्या घोषणेपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार होईल असे मानले जात होते. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना परस्पर समन्वयाच्या आधारावर प्रत्येकी एक जागा वाटप करण्याचा आग्रह करत होते.

पण जसजशी निवडणुकीची तारीख जवळ आली, राजद-काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर वाढू लागले आहे. आरजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते मनोज झा यांनी काँग्रेस नेत्यांवर आरएसएस समर्थक असल्याचा आरोप केला, ज्यावर त्यांनाही उत्तर देण्यात आले. काँग्रेसचे बिहार प्रभारी भक्त चरण यांनी म्हंटल की, पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राजदची भाजपसोबत युती होईल.

आता एकाच घरात अश्या कुरघोड्या म्हंटल्यावर चुली तर वेगळ्या होणारचं ना. हेच चित्र बिहारमध्ये पाहायला मिळालं. आता या दोन्ही पक्षांनी पोटनिवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले खरे. पण निकाल काय लागतो हे पाहून महत्वाचं ठरेल. 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.