बिहारमध्ये गंगेच्या किनाऱ्यावर १५० पेक्षा जास्त मृतदेह आढळले? नक्की काय आहे प्रकरण

उत्तरप्रदेशच्या यमुना नदीत मृतदेह तरंगताना सापडल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक अशीच घटना समोर येत आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या माहितीनुसार, आज बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर तब्बल १५० पेक्षा जास्त मृतदेह तरंगताना सापडले आहेत. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा आकडा ४० ते ४५ च्या घरात आहे.

पण हे सगळे मृतदेह बघून भीतीमुळे सध्या गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे मृतदेह उत्तरप्रदेशमधून वाहून आले आहेत.

नक्की काय आहे हे प्रकरण?

बक्सर जिल्ह्यातील चौसा गावातील गंगा नदीच्या महादेव घाटावर आज सकाळी काही मृतदेह आढळून आले आहेत. पण हे नेमके किती मृतदेह सापडले आहेत या बद्दल स्पष्ट आकडेवारी अजून समोर येताना दिसत नाही. कारण NDTV ने दिलेल्या बातमीनुसार आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इथं ४० मृतदेह सापडले आहेत. तर काँग्रेस आणि टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार १५० पेक्षा जास्त मृतदेह आढळले आहेत.

 

आज सकाळी महादेव घाटावर गावकऱ्यांना काही मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यानंतर काही वेळातच तिथं मृतदेहांचा खच जमा झाला. गावकऱ्यांनी त्यावेळी काठावर गर्दी करण्यास सुरुवात केली आणि मृतदेहांचे फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर अपलोड केले. हा सगळा प्रकार समजल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते घटनास्थळी दाखल झाले.

चौसाचे विकास अधिकारी अशोक कुमार यांनी ई-टीव्ही भारतशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार,

जवळपास ४०-४५ च्या दरम्यान मृतदेह मिळाले आहेत. हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणांवरून महादेव घाटावर वाहत आले आहेत. तसेच त्यांनी सांगितल्यानुसार हे मृतदेह या भागातील नसून ते सगळे उत्तरप्रदेशमधून वाहत आले आहेत. तिथं कोरोना रुग्णांना अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्यामुळे त्या लोकांनी हे मृतदेह गंगेमध्ये सोडून दिले.

तसेच आम्ही आमच्या भागात अंत्यसंस्कार करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली असल्याचं देखील कुमार यांनी सांगितलं.

बक्सरचे एसडीओ के. के उपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार,

हे मृतदेह पाच ते सात दिवसांपूर्वीच आहेत. आता सध्या आम्ही हे वाराणसी, अलाहाबाद कि उत्तरप्रदेशच्या अन्य कोणत्या भागातून वाहत आले आहेत त्या संदर्भातून तपास करत आहे. पण तिथून वाहत येणाऱ्या मृतदेहांना थांबवण्यासाठी आमच्याकडे कोणताही उपाय नाही हे देखील तितकंच खरं असल्याचं ते म्हणाले.

उपाध्याय यांनी सांगितलं कि सध्या या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे आणि मृतदेह काढून देणाऱ्यांना ५०० रुपये देत आहोत.

स्थानिक रहिवासी नरेंद्र कुमार मौर्य यांनी काही हिंदी माध्यमांशी बोलताना या घटनेबाबत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले,

चौसा मधील घाटाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. कोरोना बाधितांचे इथं कमीत कमी १०० ते २०० मृतदेह येत असतात. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाकडे पुरेशी लाकडं उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे मृतदेह गंगेत ढकलून दिले जातात. आम्ही सगळे हेच पाणी वापरतो. त्यामुळे ग्रामीण भागात आता संक्रमण पसरण्याची भीती आहे.

सध्या या सगळ्या प्रकारानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देशभरातून प्रश्न विचारले जातं आहेत.

बिहारमधील कोरोनाची सद्यस्थिती

प्रशासनाच्या आकडेवारी नुसार,

बिहारमध्ये रविवारी ९ मे रोजी जवळपास ११ हजार कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले होते. तर राज्यात सध्या १ लाख १० हजार ८०५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रिकव्हरी रेट ८०.७१ टक्के इतका आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण राज्याची राजधानी पटनामध्ये आहेत.

चार दिवसांपूर्वीच उत्तरप्रदेशमध्ये मृतदेह तरंगताना आढळले होते 

याआधी चार दिवसांपूर्वीच म्हणजे शुक्रवारी उत्तरप्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील यमुना नदीत वाहत असलेले अनेक मृतदेह आढळून आले होते. कानपूर-सागर मार्गावरील पुलावरून जाणार्‍या लोकांना हे मृतदेह नदीत दिसल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. यातील एक मृतदेह अर्धवट जळलेल्या स्थितीत होता.

पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे हे मृतदेह असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांना नदीत सोडण्यात आले असं पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितलं होतं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.