स्वस्तात मिळतंय म्हणून बिहारमधले कार्यकर्ते नेपाळमध्ये जाऊन पेट्रोल भरतायत

दिवाळी धमाका ऑफरमध्ये पाच रुपयांची सूट मिळते, तसं दिवाळी वेळी पेट्रोलचे रेट किरकोळीत कमी झाले. तेही सगळीकडेच नाही, तर निवडक राज्यांमध्येच. हे दर कमी होऊनही काही राज्यांमध्ये पेट्रोलचे रेट शंभरला लागूनच आहेत.

आता प्रत्येक वेळी पंपावर जाऊन शंभर किंवा दोनशेची नोट मोडायची म्हणल्यावर जीवावर येतं शेठ. मग कायतर आयडिया काढावी लागती. मित्राला म्हणायचं आज तू भर उद्या मी भरतो, ऑफिसमधल्या कार्यकर्त्यासोबत गाडीवर जायचं, कोण आपल्यावर मरत असंल तर त्याला/तिला म्हणायचं- जरा चौकात सोड की!

एवढा कुटाणा करण्यापेक्षा पेट्रोल स्वस्त मिळालं तर? अर्थात त्यासाठी अजून जास्त थेअऱ्या कराव्या लागतील. आपण काय करता येईल याचा विचार करत बसलो आणि तिकडं बिहारमधल्या कार्यकर्त्यांनी गाड्या थेट नेपाळमध्ये घातल्या.

नेमका विषय असाय की, बिहार आणि उत्तर प्रदेशची बॉर्डर नेपाळला लागून आहे. आता नेपाळमध्ये पेट्रोल भारतापेक्षा स्वस्तात मिळतं. त्यामुळं कार्यकर्ते थेट नेपाळमधूनच पेट्रोल भरून आणतात.

भारत-नेपाळ बॉर्डरला असणाऱ्या रक्सौलमध्ये, सरकारनं सवलत दिल्यानंतरही, पेट्रोल १०७ रुपये ९२ पैसे लिटर, तर डिझेल ९२ रुपये ९८ पैसे लिटर किंमतीला मिळतंय. म्हणजे दोन्हीसाठी शंभरची नोट द्यावीच लागते. हेच पेट्रोल स्वस्तात मिळवण्यासाठीचा जुगाड म्हणून नेपाळची वाट धरली जाते.

नेपाळमध्ये पेट्रोल-डिझेल मिळतंय तरी कितीला?

नेपाळमधल्या पर्सा इथं एक लिटर पेट्रोल मिळतंय १३२.२५ नेपाळी रुपयांना, तर डिझेलची किंमत आहे ११५.२५ नेपाळी रुपये पर लिटर. आता तुम्ही म्हणाल, भिडू हे तर भारतापेक्षा जास्त होतंय की. पण नाय नेपाळी रुपया भारतीय चलनाच्या दृष्टीनं स्वस्त आहे.

भारतीय चलनानुसार तिकडं पेट्रोल ८२ रुपये ६५ पैसे प्रति लिटरनं मिळतंय आणि डिझेल प्रति लिटर ७२ रुपये ३ पैशाला. त्यामुळं लिटरमागं पद्धतशीर २०-२५ रुपये वाचतायत. म्हणूनच बिहार-युपीमधल्या गाड्या टाक्या भरण्यासाठी नेपाळमध्ये वळतायत.

आता नेपाळमधून भारतात पेट्रोल आणायची ही काय पहिलीच वेळ नाही. जेव्हा भारतात पेट्रोलच्या दरांमध्ये मोठी वाढ होते, तेव्हा तेव्हा नेपाळमधून भारतात पेट्रोल-डिझेलची तस्करी होते. नेपाळमधून टँकर भरून येतात आणि भारतात स्वस्तात पेट्रोल विकलं जातं. फक्त टँकरच नाही, तर ड्रममधूनही पेट्रोल-डिझेलची तस्करी होते.

तिथलं पोलिस प्रशासन गस्त वाढवून, पहारा आणखी कडक करून ही तस्करी रोखण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र आलेल्या टँकरमधून किंवा गाड्या थेट नेपाळमध्ये घालून तिथले भिडू स्वस्त पेट्रोल गाडीत भरून घेतातच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.