BJP कार्यकर्त्या सना खान 2 दिवसात येते म्हणून बाहेर निघाल्या पण बातमी आली ती त्यांच्या खुनाची….

नागपूरमधल्या भाजपच्या आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान १ ऑगस्टला तडका फडकी जबलपूरसाठी बसने निघाल्या होत्या. तिथे पोहोचून सना यांनी त्यांच्या आईला फोन केला आणि मी सुखरूप जबलपूरला पोहोचले आहे आणि मी दोन दिवसात परत येईन असं सांगितलं. त्यांनतर दोन दिवस उलटले, तीन दिवस उलटले पण सना खान नागपूरला काही परतल्या नाहीत की त्यांनी कोणाला संपर्कसुद्धा केला नाही. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्या सना खान अचानक गायब झाल्यामुळे नागपूर शहरात गजबज निर्माण झाली.

नऊ दिवसांनतर या प्रकरणात पोलिसांनी आता जबलपूरमधल्या आशीर्वाद ढाब्यात काम करणाऱ्या जितेंद्र गौड याला अटक केली आहे.

जितेंद्र गौड याने अमित साहू या आशीर्वाद ढाब्याच्या मालकाने सना खान यांची हत्या केल्याचं आणि मृतदेह हिरण नदीत फेकल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी जितेंद्र गौड याला ताब्यात घेतलं आहे पण अमित साहू अजूनही बेपत्ता आहे. हा अमित साहू कोण आहे? भाजप कार्यकर्त्या सना खान यांचा जबलपूरच्या अमित साहू याच्याशी काय संबंध? हे जाणून घेऊयात.

सना खान आणि अमित साहू यांच्यात नेमका संबंध काय?

दोन वर्षापूर्वी सना खान आणि गोरा बाजार बिल्हारी भागातल्या अमित उर्फ ​​पप्पू साहू यांची नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सहा महिन्यांपूर्वी सना खान आणि अमित साहू यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. अमित साहू हा गोरा बाजार मधल्या राजुल अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या घरात राहतो आणि त्याचा जबलपूर मध्ये झागरा इथे आशीर्वाद नावाचा ढाबा आहे. सना सुद्धा या ढाब्यामध्ये अमितच्या बिजनेस पार्टनर होत्या. गेले काही दिवस ढाब्याच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद सुरु होते.

सना खान जबलपूरला गेल्यावर काय घडलं?

एक ऑगस्टला सना खान आणि अमित साहू यांच्यात व्हिडीओ कॉलवर वर भांडण झालं आणि सना खान तडकाफडकी नागपूरहून बसने जबलपूरसाठी निघाल्या. दुसऱ्या दिवशी २ ऑगस्टला सकाळी सना जबलपूरला पोहोचल्या. तेव्हा सकाळी ६:३० – ७ च्या दरम्यान त्यांनी आपल्या आईला फोन करून त्या जबलपूरला सुखरूप पोहोचल्या आहेत आणि दोन तीन दिवसात त्या नागपुरात परत येतील, असं सांगितलं. फोन ठेवता ठेवता त्यांनी आपल्या मुलाची चौकशी केली आणि त्याला वेळेवर शाळेत पाठवण्यासाठी सांगितलं.

त्याचदिवशी संध्याकाळी सना यांनी पुन्हा त्यांच्या आईला फोन केला. तेव्हा मात्र त्यांनी त्यांच्या आईला अमित साहू त्यांना मारहाण करत असल्याचं सांगितलं. पण त्यांच्या आईने हे त्यांचं नवरा बायकोमधलं भांडण आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सना यांच्या आईने त्यांना फोन केला पण त्यांचा फोन स्वीच ऑफ लागला म्हणून त्यांनी सना यांच्या दुसऱ्या दोन नंबरवर फोन केला पण तेही स्वीच ऑफ लागले.

तेव्हा घाबरून मुलीची चौकशी करण्यासाठी त्यांनी अमित साहूला फोन केला. अमितने सना यांच्या आईला आधी सांगितलं की, सना इथे आलीच नाहीये. पण सना यांनी अमितच्याच घरून त्यांना फोन केला होता हे सना यांच्या आईला माहित होतं. सना यांच्या आईने खोदून खोदून विचारलं तेव्हा अमित म्हणाला की,

“सना इथे आली होती पण आमच्यात भांडण झालं तेव्हा तिने मला मारलं आणि माझा फोन तोडला. त्यानंतर ती इथून निघून गेली पण ती कुठे गेली हे मला माहित नाही.”

त्यानंतर सना यांचा भाऊ मोसिन खान याने परत अमितला फोन केला. आता अमितचा सुद्धा फोन स्वीच ऑफ येऊ लागला होता. तेव्हा सना खान यांची आई आणि भाऊ मोसिन खान हे नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यांनी घडला प्रकार मानकापूरच्या पोलिसांना सांगितला.

३ ऑगस्टला नागपूर पोलीस, जबलपूरला अमितच्या घरी पोहोचली.

पण अमित साहूच्या घराला कुलूप होतं तेव्हा पोलिसांनी आपला मोर्चा अमितच्या आशीर्वाद ढाब्याकडे वळवला. तो तिथे नव्हताच पण ढाब्याला टाळं लाऊन ढाब्याचे नोकर सुद्धा गायब होते. अमितचा कुठेच पत्ता नव्हता. तेव्हा पोलिसांनी अमितच्या घराची झडती घेतली पण काहीही हाती लागलं नाही. त्यांनी बिल्डींगचं CCTV फुटेज चेक केलं. त्यात त्यांनी पाहिलं की, अमित एक काळी पिशवी आपल्या गाडीच्या डिकीत टाकतोय.

जितेंद्र गौड कसा सापडला?

पोलिसांनी ढाब्यावर काम करणाऱ्यांचा शोध घायला सुरुवात केली. ढाब्यावर काम करणाऱ्या सगळ्यांचे फोन पोलिसांनी ट्रॅकिंगवर टाकले तेव्हा त्यापैकी ढाब्याचा वेटर जितेंद्र गौडचा फोन ट्रॅक करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तेव्हा त्याने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात सांगितलं की, त्याच्या मालकाने म्हणजे अमितने सना यांना मारून त्यांचे तुकडे करून हिरण नदीत फेकून दिले आहेत. त्यांनतर २ ऑगस्टला रात्री अमितने त्याची गाडी जितेंद्रकडे धुवायला दिली होती. तेव्हा गाडीच्या डिकीत जितेंद्रने रक्ताचे डाग पाहिले होते.

आता हे प्रकरण जबलपूरच्या गोराबाजार पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. गोराबाजार पोलिसांनी जितेंद्र गौडला ताब्यात घेत अमित साहूचाही शोध सुरु केला आहे. पण जोवर सना खान यांचा मृतदेह सापडत नाही तोवर त्यांना मृत घोषित करता येणार नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे.

अमित साहू हा खरंतर सराईत गुन्हेगार आहे.

तो आपल्या ढाब्यात बेकायदेशीर रित्या दारू विकत होता. एवढंच नाही, यापूर्वी २०११-१२ मध्ये अमित साहू याने आपल्या साथीदारांसोबत मिळून एका तरुणाची हत्या केली होती. तेव्हा तो ४१ महिने फरार होता पण त्यानंतर त्याला पकडून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आता तो याच प्रकरणात जामिनावर बाहेर होता आणि सना खान यांच्या प्रकरणानंतर तो पुन्हा फरार झाला आहे. तो सिवनी, सागर किंवा नरसिंगपुरच्या आसपास लपून बसल्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सना खान या भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्या होत्या. गेल्या १५ वर्षात त्यांनी पक्षाच्या छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळल्या होत्या. त्यामुळे भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सुद्धा या प्रकरणाची दाखल घेतली जात आहे. पण २ ऑगस्टच्या रात्री नेमकं काय घडलं? हे अमित साहूच सांगू शकेल.

हे ही वाच भिडू,

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.