भाजपला देणगी देणाऱ्यांवर ईडी कृपादृष्टी दाखवते हा शुद्ध गैरसमज आहे…

ईडी आणि सीबीआय. दोन केंद्रीय तपास यंत्रणा. या तपासासाठी जेवढ्या हुशार आणि चाप्टर मानल्या जातात तेवढ्याच बदनाम देखील आहेत. बदनाम यासाठी की, या केंद्रीय तपास यंत्रणांवर जेवढे आरोप होतात, तेवढे आरोप कदाचित एखाद्या राजकीय पक्षावर देखील होतं नसतील.

या यंत्रणा सातत्यानं केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, भाजपच्या आदेशावर काम करत असतात, या यंत्रणांचा वापर भाजप कडून विरोधी पक्षातील आमदार, खासदारांना भीती घालण्यासाठी, त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी केला जातं असतो, भाजपच्या धार्जिणी लोकांना मदत करत असतात अशा सगळ्या प्रकारचे हे आरोप होतं असतात.

मात्र याच सगळ्या दाव्यांना छेद देणारी एक गोष्ट आज समोर येतं आहे.

आज देशातील कोणत्या राजकीय पक्षांना किती आणि कोणाकडून देणगी मिळाली, याबाबत एक आकडेवारी समोर आली आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात एक अहवाल सादर केला होता, याच अहवालातील माहिती वरुन ही आकडेवारी सार्वजनिक करण्यात आली आहे.

या आकडेवारी नुसार, 

२०१९-२० या एका आर्थिक वर्षात भाजपाला मिळालेल्या देणग्यांचा आकडा तब्बल ७५० कोटींच्या घरात आहे. याच काळात काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांपेक्षा हा आकडा पाच पट आहे. काँग्रेसला केवळ १३९ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.

इतर राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांबाबत बघायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५९ कोटी, तृणमूल काँग्रेसला ८ कोटी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला १९.६ कोटी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला १.९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.

या मिळालेल्या देणग्यांमधील सगळ्यात जास्त आकडा असलेल्या भाजपच्या देणगीदारांवर एक नजर टाकली तर यात भाजप खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या मालकीच्या ज्युपिटर कॅपिटलने १५ कोटी, ITC ग्रुपने ७६ कोटी, आत्ताची मॅक्रोटेक डेव्हलपर्स २१ कोटी, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी ३५ कोटी, जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट ४५.९५ कोटी या सगळ्यांचा या यादीत समावेश आहे.

याच यादीतील आणखी एका नावावर नजर टाकली तर त्या नावानं सध्या सगळ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे नाव आहे प्रसिद्ध उद्योगपती सुधाकर शेट्टी यांचं.

आता या नावानं लक्ष वेधून घेण्याचं कारण म्हणजे या शेट्टींनी ऑक्टोबर २०१९ मध्ये भाजपला जवळपास २० कोटींची देणगी दिली होती, पण त्यानंतर देखील जानेवारी २०२० मध्ये केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीने सुधाकर शेट्टी यांची कार्यालय आणि घरांवर छापे टाकले होते.

म्हणजेच भाजपला मदत करणारे आणि देणगी देणारी असले तरी ईडीने शेट्टी यांच्यावर छापेमारी केली होती.

कोण आहेत सुधाकर शेट्टी?

सुधाकर शेट्टी म्हणजे मोठे उद्योगपती. या उद्योगांमध्ये मग ते बऱ्याच क्षेत्रात आहेत. यात अगदी बांधकामापासून ते वृत्तवाहिन्यांपर्यंत. पण त्यांची प्रामुख्यानं ओळख म्हणजे बांधकाम व्यावसायिक. मुंबईच्या बऱ्याच भागात त्यांचे प्रकल्प सुरु असल्याचं सांगितलं जातं. सोबतचं गतवर्षी पर्यंत ते वरळीतील SRA प्रकल्पाचा भाग असलेल्या Oasis Realty या कंपनीमधील प्रमुख गुंतवणूकदार होते.

सोबतचं ते काही वर्षापूर्वी डान्स बार इंडस्ट्रीजमध्ये देखील होते. मात्र २००५ साली तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्स बार बंदी कायदा आणल्या नंतर त्यांना बार बंद करायला लागला होता.

पुढे त्यांनी बांधकाम व्यवसायामध्ये प्रवेश केल्यानंतर या बारला योगासन सेंटरमध्ये बदललं असल्याचं देखील सांगितलं गेलं होतं. आता ही गोष्ट किती खरी किती खोटी हे त्यांनाच माहीत.

शेट्टी यांनी काही वर्षांपूर्वी एक मराठी वृत्तवाहिनीदेखील सुरू केली होती. मात्र काही महिन्यांआधी त्या वाहिनीची अर्धी मालकी विकली असल्याची चर्चा होती.

सुधाकर शेट्टी यांच्यावर छापे का पडले होते?

गतवर्षी जानेवारीमध्ये डीएचएफएलच्या वाधवान बंधूंची चौकशी चालू होती. त्यावेळी कंपनीच्या लोन बुकमध्ये एक लाख कोटी रकमेचा उल्लेख होता. मात्र त्यापैकी २० हजार कोटी रुपयांचा सोर्स कळत नसल्याचं अकाउंट रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं.

याशिवाय १२ हजार ७७३ कोटी रुपयांचा देखील हिशोब ईडीला लागत नव्हता. त्यापैकी काही रक्कम अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार आणि मुंबई बॉम्बस्फोटातील फरार आरोपी इक्बाल मिरचीच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला होता.

सोबतचं ६ अशा कंपन्या होत्या, ज्यात ३ हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. या ६ कंपन्याचा कंट्रोल सुधाकर शेट्टी यांच्याकडे असल्याचा आणि या कंपन्यांवर कपिल व त्यांचे बंधू धीरज वाधवान हे संचालक होते असं त्यावेळच्या माध्यमांतील बातम्यांमध्ये सांगण्यात आलं होतं. 

याच सगळ्या तपासासाठी ईडीने जानेवारी २०२० च्या शेवटच्या आठवड्यात सुधाकर शेट्टी यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. पण ज्या वेगानं हे प्रकरण माध्यमांमध्ये त्यावेळी चर्चेत आलं त्याचं वेगानं गायब देखील झालं. ‘एकदम धुवे के माफीक’. सध्या या सगळ्याचा तपास अजून सुरु असल्याचा दावा केला जातो.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.