मिर्झापूरच्या ललितचा स्ट्रगल मृत्यूनंतरही संपला नाही…

भौकाल… तसा हा प्रॉपर हिंदी शब्द. तेही उत्तरप्रदेश, बिहार या बाजूला जास्त वापरला जाणारा. हा शब्द सगळ्या भारतात फेमस होण्यामागचं कारण म्हणजे ‘मिर्झापूर’ नावाची सिरीज. त्यातलं मिर्झापूर हे उत्तर प्रदेशमधलं एक शहर. ज्याचा कारभार चालायचा बंदुकीवर. कालीनभैय्या, बबलू पंडित, गुड्डू पंडित, मुन्नाभैय्या, मकबूल, बीणा भाभी अशी त्यातली अनेक कॅरॅक्टर्स जबरदस्त लोकप्रिय झाली.

या लोकप्रिय कॅरॅक्टर्समध्ये आणखी एक भन्नाट पात्र होतं, तो म्हणजे ललित. मुन्नाभैय्याचा राईट हॅंड ललित. आता मुन्ना भैय्या त्याला ज्या नावानं आवाज द्यायचा, ते काय आम्ही इथं लिहीत नाही, पण तुम्ही इतके वांड आहात की आम्ही न लिहिताच तुम्ही मनातल्या मनात ते वाचलं असणार.

आता या ललितचा रोल काय फार मोठा नव्हता, पण त्याचा अभिनय, कडक डायलॉगबाजी आणि मुन्ना भैय्या म्हणेल ती पूर्वदिशा म्हणत वागण्याची पद्धत लोकांना लय आवडली. ललितसाठी मुन्नाभैय्या सगळं काही होता, मात्र हाच मुन्नाभैय्या जेव्हा गोळी घाल म्हणला. तेव्हा ट्रिगर दाबण्यात भावानं पुढंमागं पाहिलं नाही.

हा ललित सोशल मीडियावर लय हिट झाला. ललितचं खऱ्या आयुष्यातलं नाव ब्रम्हा मिश्रा. ही त्याची लाईफ स्टोरी…

ब्रम्हा मूळचा भोपाळचा. त्याच्या घरातली परिस्थिती तशी सर्वसामान्यच होती. भाऊ वकील असल्यानं, त्यानं ब्रम्हाला कायम पाठिंबा दिला. तेव्हा करिअरमधले ट्रेंड होते मेडिकल आणि इंजिनिअरिंग. पण ब्रम्हाच्या घरच्यांनी त्याला कधीच फोर्स केला नाही. त्याला नाटकात काम करायची गोडी लागली.

मात्र नाटकात त्याला लगेच काम करायची संधी मिळाली नाही. ब्रम्हा सुरुवातीला पाण्याचा माठ भरणे, सगळ्यांना चहा देणे अशी कामं करायचा. यामुळं कधीकधी तो निराश व्हायचा, पण त्यानं हिंमत सोडली नाही. एकदा एका नाटकातला अभिनेता नव्हता, तेव्हा त्याचे गुरू ब्रम्हाला म्हणाले. ‘तू एखादा डायलॉग घेऊन बघ.’ ब्रम्हाचं डायलॉग घेणं त्यांच्या पसंतीस उतरलं आणि त्याला नाटकात काम मिळालं.

त्यापुढची वाट आणखी खडतर होती. पण ब्रम्हाला साथ दिली त्याच्या भावानं. त्यानं ब्रम्हाला पुण्यातल्या एफटीआयआयबद्दल सांगितलं. तिथं अभिनयाचं व्यावसायिक शिक्षण घेता येतं, याची माहिती त्यानं ब्रम्हाला दिली. पुण्यात आल्यावर मात्र ब्रम्हाच्या फ्युजा उडाल्या.

एका मुलाखतीत त्यानं सांगितलं, ‘पुण्यात येणं हा माझ्यासाठी कल्चरल शॉक होता. आपलं आयुष्य जगायचं स्वातंत्र्य काय असतं हे मला कळलं. एफटीआयआयमध्ये नसरुद्दीन शहा, पियुष मिश्रा, रझा मुराद यांसारखे शिक्षक मला मिळाले आणि माझी प्रगती झाली.’

एफटीआयआयमधलं शिक्षण सुरू असताना, आपल्या सिनिअर्सचं नाटक पाहायला तो मुंबईत गेला होता. तेव्हा लोकलमध्ये चढला आणि तिथली गर्दी बघून त्याला काय करावं हेच सुचलं नाही. इतक्या प्रचंड गर्दीत आपण आयुष्यात कधीच येणार नाही, असं त्यानं मनाशी पक्कं केलं. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर तो याच मुंबईत स्थायिक झाला, आपली भीती बाजूला ठेवत लोकलनं प्रवासही करू लागला.

नैनसुख नावाच्या आर्ट फिल्ममध्ये त्यानं पहिल्यांदा काम केलं. ब्रम्हाची पहिली बॉलिवूड फिल्म होती, ‘शुटर.’ ज्यात त्यानं सुनील शेट्टी अण्णासोबत काम केलं. मात्र हा पिक्चर रिलीझ झालाच नाही. पुढं नवाझुद्दीन सिद्दीकीच्या गाजलेल्या मांझी द माऊंटन मॅन पिक्चरमध्ये तो पहिल्यांदा चंदेरी पडद्यावर दिसला. त्यानं टीव्ही सिरिअल्समध्येही काम केलं, मात्र तिथं त्याचं मन फारसं रमलं नाही.

मांझी नंतर केसरी, बद्री की दुल्हनिया अशा चित्रपटांमध्ये तो दिसला. पण त्याची खरी हवा झाली ती मिर्झापूरमुळंच. ब्रम्हानं साकारलेल्या ललितनं त्याची ब्रॅंड व्हॅल्यू वाढवली, त्याला घरोघरी पोहोचवलं. त्यानंतरही तो काही पिक्चरमध्ये दिसला पण ललित ही त्याची ओळखच बनली.

आपल्यासुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना, ब्रम्हानं एक फार भारी वाक्य सांगितलंय, ‘कष्टाचे दिवस सगळ्यांनाच असतात, तसेच मलाही होते. मी देखील प्रचंड मेहनत घेतली, फक्त त्याला स्ट्रगलचं नाव दिलं नाही.’

पण खरं बघायला गेलं, तर त्याचा स्ट्रगल मरणानंतरही संपला नाही… 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.