जगातलं सगळ्यात ब्रँडेड गाव. इथंच मर्सिडीज ते पोर्शे सगळ्या ब्रॅंडचा जन्म झालाय…
स्टुटगार्टचं नाव पहिल्यांदा ऐकलं ते २००६ च्या फिफा वर्ल्डकपला. ही जर्मनीच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्याची राजधानी आणि जर्मनीमधले ६ वे सर्वात मोठे शहर म्ह्णून त्याची ओळख आहेच. पण याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे गाड्यांचं माहेरघर.
जगातील सर्वात पहिली गाडी याच शहरात बनवली गेली होती.
आज रस्त्यावर चालणाऱ्या बहुतांश गाड्या आणि त्यांचे पार्ट या शहरातून येतात. अख्ख्या युरोप खंडातीलसगळ्यात महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून या शहराचं नाव घेतलं जातं.
या शहराचं आणि गाड्यांचं नातं सुरुवातीपासून आहे. म्हणजे अगदी शहर सुरु झालं तेव्हापासून.
शहराचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून सुरु होतो. त्या काळी मध्ययुगातील रोमन सम्राट ओटो याची घोड्यांची मोठी पागा या शहरात होती. त्यामुळे या शहराचे नाव स्टुटगार्ट असे पडले.
हा भाग जर्मनीमधे ‘श्वाबिश’ प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जर्मन भाषेप्रमाणेच येथील स्थानिक लोक ‘श्वेबिश’ ही बोली भाषा बोलतात. त्यामुळं या भागातल्या लोकांनी आपली वेगळी संस्कृती जपण्याचा हट्ट केला. म्ह्णून या भागाला स्वतःचा असा वेगळा झेंडाही देण्यात आला. हाच झेंडा पोर्शे कंपनी सध्या लोगो म्ह्णून वापरते.
आज जगभर क्रेझ असणारे गाड्यांचे मोठमोठे ब्रँड या शहराने दिले आहेत.
त्यातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे मर्सिडीझ. जगातल्या प्रत्येक माणसाच्या तोंडी या गाडीचं नाव आडव्यातिडव्या का होईना, दर स्वरूपात असतंच. कार्ल बेंझ हा इंजिनियर इथं काम करायचा. त्याचा अजून एक मित्र गोटलिब डाइमलर हा सुद्धा त्याच्या सोबत होता.
त्या दोघांनी मिळून जगातली पहिली ऑटोमोबाईल म्हणता येईल अशी गाडी बनवली. ती म्हणजे मर्सिडीझ. त्याची सर्व पायाभरणी या शहरातच झाली.
कशीबशी धावणाऱ्या साध्या बॉक्सर इंजिनाच्या वेलो गाड्यांपासून ते मुळशी पॅटर्नच्या हिरोने गळ्यात घातलेल्या लोगोपर्यंत मर्सिडिझला घडवण्यात हेच शहर पुढं आले.
या वेळी कार्ल बेंझ यांच्यासोबाबत असणाऱ्या मित्राच्या नावावरून अजून एक दुसरी कंपनी येथेच सुरु झाली. मर्सेडिज बेंझ या जगप्रसिद्ध स्वरूपात हि कंपनी आल्यानंतर हा नवा ब्रॅण्डही लोकांच्या पसंतीस उतरला.
सुरुवातीच्या काळानंतर या दोघांच्यात अनेक मतभेद झाले. स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या पहिल्या कंपनीचा कर्ताधर्ता गोटलिब डाइमलर याच्या नावाने हि कंपनी सुरु झाली. डाइमलर हे तिचे नाव. आजही गोटलिब डाइमलर यांनी बनवलेल्या या कंपनीचे मुख्यालय याच शहरात आहे.
डिझेलचा शोध ज्या माणसाच्या नावावरून लागला तो माणूस पण याच शहरातला. आपल्या लहानशा खोलीत तो इथंच काम करायचा. १९व्या शतकात त्या माणसाने एक नवे इंजिन बनवलं. वाफेच्या इंजिनापेक्षा हे इंजिन अतिशय वेगळं होते. त्याला फ्युल पंपाने दाबून त्याचं इंधन आत सोडलं जायचं. त्याने हे इंजिन पेट घेत असे.
त्या माणसाचं नाव होतं रूडॉल्फ डिझेल. त्याने लावलेल्या अनेक शोधांचे हे शहर साक्षी आहे.
१९३२ च्या काळात जेव्हा सर्वसामान्य माणसांना फक्त दुचाकींच परवडत असायची त्या काळात पीपल्स कार हा प्रकल्प जर्मनीत सुरु झाला. जर्मन लेबर फ्रंट या कामगारांच्या पक्षाने लोकांसाठी म्हणून नव्या गाड्या बांधायचं स्वप्न बघितलं.
लोकांची म्हणजे फोक्स यांची आपली गाडी म्हणजे वॅगन म्हणून या गाडीला फोक्सवॅगन हे नाव देण्यात आले.
आपण जिला वोल्क्सवॅगन म्हणतो तीच हि गाडी. हि गाडी बनवायची पहिली सुरुवातसुद्धा याच शहरात झाली.
हि गाडी आज जगभर सुप्रसिद्ध आहे. जगातल्या विविध देशांमध्ये जाऊन या गाडीने नवनवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत.
यासारखाच अजून एक जगभरातल्या लोकांच्या तोंडी रुळलेला शब्द म्हणजे पोर्शे. फर्डिनांड पोर्शे नावाच्या एका इंजिनियरने १९३१ मध्ये हि गाडी बनवली. सुरुवातीला तो फक्त गाड्या दुरुस्त करायचा.
पण त्याच्याकडं एकदा फोल्क्सवॅगन कंपनीने एक छोटी गाडी बनवायला दिली. ती गाडी आजरोजी जगातली सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात जास्त वापरली गेलेली गाडी आहे. ती म्हणजे बीटल. आपल्या ‘एक गाडी बाकी अनाडी’ मध्ये लक्ष्या ज्या गाडीत असतो तीच ही.
तेव्हापासून पोर्शेने नवनवीन गाड्या तयार करायला सुरुवात केली. आजरोजी लोकांच्या मनातला पण काही गर्भश्रीमंत लोकांनाच परवडणारा असा हा गाड्यांचा ब्रँड समजला जातो.
जर्मनीची अजून एक खासियत म्हणजे डोंगर. वाहन उद्योगाकरता प्रसिद्ध असूनही या शहराच्या आजूबाजूला निसर्गरम्य टेकड्या आणि डोंगर आहेत. बाडेन-व्युर्टेनबर्ग या राज्याची राजधानी असूनही या शहराला स्वायत्त शहराचा दर्जा आहे. बाडेन-व्युर्टेनबर्ग या राज्याची विधानसभा इथेच भरते.
या शहराला धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. येथे प्रोटेस्टंट तसेच कॅथोलिक ख्रिश्चन धर्मांची अनेक प्रमुख चर्चे बघायला मिळतात.
युरोपियन युनियन झाल्यावर इतर प्रमुख शहरांशी स्टुटगार्टचे दळणवळण वाढले. ते नियंत्रित करायला शहराने ‘स्टुटगार्ट २१’ या प्रकल्पाखाली या शहराने आपला कायापालट केला. त्यालाच ‘दास न्यॉय हेर्झ युरोपास’ या नावाने ओळखले जाते. म्हणून हे शहर हातात युरोपाचे नवे हृदय म्हणून अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे.
सध्याचे डायमलर कंपनीचे मुख्यालय व पोर्शे या अतिजलद स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या कंपनीचे मुख्यालय दोन्ही स्टुटगार्टमध्येच आहेत. तसेच बाँश नावाची सुटे भाग बनवणारी कंपनी इथेच आहे.
बेहेर हि इंजिनच्या गाड्यांना लागणारे रेडिएटर आणि एसीची सिस्टीम बनवणारी कंपनी इथलीच आहे. माह्-ले हि चारचाकी वाहनांच्या सुट्या भागांची निर्मितीकरणारी कंपनी सुद्धा याच शहरात सुरू झाली होती.
जवळपास १,५०,००० लहान-मोठे कारखाने या शहरात आहेत. जगातल्या विविध जगप्रसिद्ध कंपन्यांची मोठमोठी कार्यालये आणि हेडक्वार्टर्स या शहरात आहेत. त्यामुळं हि मेकॅनिकल इंजिनियर लोकांची पंढरी समजली जाते.
इथल्या इंजिनियर्स लोकांचा आवडता डींकेलकर हा बियरचा ब्रॅण्डही इथलाच आहे.
हे हि वाच भिडू:
- आज तर माहिती करून घ्या, डुक्कर गाडी कोणत्या कंपनीची होती ?
- शक्तीच्या खटारा गाडीला मर्सिडीजने ठोकलं. पण हा ॲक्सिडेंट त्याच्यासाठी लकी ठरला.
- अल कपोन हा असा डॉन होता ज्याला अटक झाल्यानंतर त्याच्या गाडीवर राष्ट्राध्यक्षांनी डल्ला मारला