भारतच नाही इंग्लंडमध्येसुद्धा हवा करणाऱ्या ब्रिटानियाचा इतिहास १३० वर्षे जुनाय. 

टायगर, गुड डे, ५०-५०, मारिगोल्ड आणि बॉरबन या पैकी कुठल्यातरी बिस्किटांची चव तुम्ही चाखलीच असेल किंवा बऱ्याच लोकांच्या घरात यापैकी एखादा तरी बिस्कीटपुडा असतोच. आजचा किस्सा आहे या सगळ्या बिस्किटांच्या बापाचा अर्थातच ब्रिटानिया कंपनीचा. एका खोलीतून सुरु झालेली हि कंपनी जवळपास ६० देशांमध्ये आपल्या ब्रँडची हवा करत आहे.

इतकी दशकं उलटून गेली पण ब्रिटानिया आजही डेरी प्रोडक्ट आणि बिस्किटांच्या दुनियेत कायम टॉपला असते. १८९२ मध्ये बिस्कीट बनवण्याचं काम सुरु झालं कोलकाताच्या एका छोट्याश्या खोलीतून. 

२५० रुपय भांडवल गुंतवून इंग्रजांच्या एका ग्रुपने या व्यवसायाची सुरवात केली. कंपनीचे मालक म्हणून इंग्रजांनी ५ वर्ष काम बघितलं. १८९७ मध्ये गुप्ता ब्रदर्सने हि कंपनी विकत घेतली. यात प्रमुख होते नलीन चंद्र गुप्ता त्यांनी व्ही.के.ब्रदर्स म्हणून या कंपनीला पुढे चालवण्याचं ठरवलं. बराच काळ त्यांनी हि कंपनी चालवली.

१९१८ मध्ये एक ब्रिटिश व्यापारी होते सी.एच.होम्स त्यांना नलीन चंद्र गुप्ता यांनी व्यवसायात पार्टनर करून घेतलं. याच वर्षी कंपनीचं नाव ठेवण्यात आलं ब्रिटानिया बिस्कीट कंपनी लिमिटेड. यानंतर मात्र कंपनीने मागे वळून पाहिलंच नाही. नवीन प्रोडक्ट आणि नवनवीन प्रयोगांसहित ब्रिटानिया ब्रँड मार्केटमध्ये कायम हवा करत राहिला. 

१९२१ मध्ये जेव्हा कंपनीने इंडस्ट्रियल गॅस ओव्हन आयात केला तेव्हा कंपनीचं प्रोडक्शन डबल ट्रिपल वाढीस लागलं. यामुळे १९२४ मध्ये ब्रिटानिया कंपनीने अजून एक शाखा सुरु केली तेही मुंबईत. याच काळात ब्रिटानिया peekfreans नावाच्या कंपनीची भागीदारही झाली. पिक्फ्रेंस कंपनी हि त्याकाळात बिस्कीट इंडस्ट्रीमधली बादशहा मानली जाणारी कंपनी होती. या कंपनीचा फायदा मोठ्या प्रमाणावर ब्रिटानियाला झाला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बिस्किटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. या महायुद्धातल्या सैनिकांना भरभरून बिस्कीट पुरवले जात होते.

याचा फायदा उचलत ब्रिटानियानी आपल्या प्रोडक्शन पैकी ९५% माल हा थेट विश्वयुद्धात पाठवण्यास सुरवात केली. यामुळे संपूर्ण देशभरातून ब्रिटानियाचं चांगलंच कौतुक झालं.

१९५४ मध्ये कंपनीने ब्रेड सुद्धा बाजारपेठेत आणला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी भारतातला पहिला प्रीमियम बिस्कीट म्हणजे बॉरबनचा सुद्धा बाजारपेठेत उगम झाला. १९६३ मध्ये ब्रिटानिया केक आला. चांगली गुणवत्ता, स्वच्छता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी किंमत यामुळे ब्रिटानिया भारतभर प्रसिद्ध झाला होता. यामुळे चांगली कमाईसुद्धा ब्रिटानियाला करता आली.

१९७८ मध्ये ब्रिटानिया शेअर मार्केटमध्ये उतरला. यातले ६२% शेअर हे भारतातल्या लोकांनी खरेदी केले आणि उरलेले ३८ % शेअर हे ब्रिटिश कंपनी असोसिएट बिस्कीट इंटरनॅशनल लिमिटेड [ ABIL ] ने खरेदी केले. १९७९ मध्ये कंपनीने ब्रिटानिया बिस्कीट कंपनी लिमिटेड या नावावरून ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड केलं. 

१९८१ मध्ये एंट्री झाली ती केरळच्या राजन पिलय्यीची जे सिंगापूरच्या ओले या चिप्स कंपनीचे पार्टनर होते. त्यांनी भारतात येऊन ब्रिटानियामध्ये गुंतवणूक केली आणि सोबतच ABIL मध्ये सुद्धा गुंतवणूक केली. हा तो काळ होता जेव्हा कंपनी आणि गुंतवणूकदार दोघेही सुपात होते.

पुढे वाडिया ग्रुप हा ब्रिटानिया कंपनीचा अर्धा भाग झाले होते. आजही चेअरमन म्हणून वाडियाच काम बघतात. ब्रिटानियाची खुर्ची मिळवण्यासाठी अनेक राजकारण झाली पण ब्रिटानियाने गुणवत्तेत काहीही बदल केला नाही. १९९६ मध्ये गुड दे, लिटिल हार्ट्स, ५०-५० असे नवीन प्रोडक्ट लॉन्च केले जेणेकरून ब्रिटानिया कायम नफा कमवत राहिली.

२००६ साली आलेला टायगर बिस्कीट हा कोण विसरू शकले. २०१० आणि आजही टायगर बिस्कीट ब्रँड मानला जातो.

या एकट्या टायगर बिस्किटामुळे ब्रिटानिया कंपनीने ११५ मिलियन डॉलरचा सेल केला होता. भारतच नाही तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सुद्धा टायगर बिस्किटाने  हवा केली होती.

आज घडीला ब्रिटानिया सगळ्यात विश्वासू ब्रॅण्डपैकी एक आहे. ५० लाखांपेक्षा जास्त रिटेलर लोकांकडे ब्रिटानिया ब्रँड आहे. २ करोडपेक्षा जास्त रोज बिस्कीट बनवले जातात. ६० पेक्षा जास्त देशांमध्ये व्यापार विस्तारला आहे. १० हजार करोडपेक्षा मोठी उलाढाल ब्रिटानियाची आहे. ५ हजार लोकांना रोजगार ब्रिटानियामुळे मिळत आहे.

ब्रिटानिया म्हणल्यावर दोन गोष्टी चटकन डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे टायगर बिस्कीट आणि राहुल द्रविडच्या बॅटवरच ब्रिटानिया स्टिकर. इतक्या वर्षांपासून हा ब्रँड लोकांच्या मनावर राज्य गाजवत आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.