आजही बस ड्रायव्हर संतोष मानेने बसखाली चिरडल्याच्या आठवणी पुणेकर विसरू शकत नाहीत…

२५ जानेवारी २०१२ चा दिवस. स्वारगेट मधून एसटी ड्रायव्हर संतोष माने याने सकाळी सव्वा आठला बस आपल्या ताब्यात घेतली. यानंतर संतोष मानेने पुण्यामध्ये रक्ताची रंगपंचमी केली होती आणि हे सगळ्यात मोठं हिंसक कृत्य मानलं गेलं.

बस ताब्यात आल्यावर संतोष माने हा शंकरशेठ रस्त्याने महात्मा गांधी रस्ता, सोलापूर बाजार पोलीस चौकी,पुलगेट, नेहरू रस्त्याने डायस प्लॉट, मुकुंदनगर, लक्ष्मी थेटर, मित्रमंडळ चौक, वीर सावरकर चौक ते संतोष भेळ सेंटर या चौदा किलोमीटर मार्गावर अर्ध्या तासात भरधाव वेगाने संतोष मानेने एसटी चालवली. या अर्ध्या तासाच्या प्रवासात जो समोर येईल त्याला उडवत संतोष माने आपल्याच धुंदीत गाडी चालवत होता.

एखादा गेम जसा खेळला जातो अगदी त्याच प्रकारे दिसेल त्याला चिरडत संतोष मानेने तब्बल ९ जणांचा बळी घेतला होता आणि ३७ जणांना जखमी केलं होतं. सरकारी आणि खाजगी मालमत्तेचं प्रचंड नुकसान सोबतच अनेक गाड्यांची मोडतोड  संतोष मानेच्या ड्रायव्हिंगने केली होती. २५ वाहनाचा चक्काचूर झाला होता.

नागिरक, तरुण, एसटी अधिकारी आणि तिथल्या पोलिसांनी संतोष मानेचा जोरदार पाठलाग केला. हा पाठलाग सुरु असताना संतोष माने बेदरकारपणे आपली गाडी पळवत होता. सारसबागेजवळच्या संतोष भेळ सेंटरजवळ बस अडकली आणि पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतलं. संतोष मानेला ताब्यात घेतल्याने पुढला मोठा विध्वंस टळला. अत्यंत हिंसक असलेलं हे कृत्य पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकवणारं ठरलं.

शिवाजीनगर न्यायालयात हे प्रकरण चांगलंच चाललं. संतोष मानेच्या बाजूने सांगण्यात आलं कि तो मनोरुग्ण आहे आणि रागाच्या भरात त्याने हे कृत्य केलं. असंही या केसमध्ये सांगण्यात आलं कि कामावर आणि घरच्या कुरबुरींमुळे संतोष माने हा वैतागला होता आणि हा सगळा राग त्याने अशा पद्धतीने काढला. 

संतोष माने हा मुळचा उत्तर सोलापूर तालुक्यातील कवथळे गावचा होता, ड्रायव्हर म्हणून १३ वर्षांची सेवा झालेला संतोष स्वारगेट डेपोत नियुक्तीवर होता. रागाच्या भरात केलेलं हे कृत्य अनेक निष्पाप लोकांचा जीव घेऊन गेलं होतं.

शिवाजीनगर कोर्टात हे प्रकरण वर्षभर चाललं. ८ एप्रिल २०१३ रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हि घटना दुर्मिळातील दुर्मिळ आणि अतिहिंसक असल्याचं न्यायालयाने सांगितलं होतं. मात्र ही केस हायकोर्टात गेली आणि  हायकोर्टाने मानेला दिलासा देत संतोष मानेचे म्हणणे पुण्यातील सेशन्स कोर्टाने ऐकून घेतलेले नाही. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, असे आदेश देऊन हायकोर्टाने त्याची फाशीची शिक्षा रद्द केली होती. 

घडलेली घटना आणि कृत्य हे आपल्या हातून वेडाच्या भरात घडल्याचं आणि गुन्हे माफ करण्याचं असा बचाव मानेने आधी पुण्याच्या सत्र न्यायालयात व नंतर मुंबई उच्च न्यायालयात केला होता. मात्र सत्र न्यायालयाने मानेचे सगळे दावे फेटाळून लावले आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानेही हेच मत नोंदवलं होतं.

सुप्रीम कोर्टात केस गेल्यावर संतोष मानेची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली. यावरून बरीच टीका टिप्पणी झाली. कुणाचीही पर्वा न करता भरधाव वेगात गाडी चालवून संतोष मानेने केलेली जीवितहानी हि अतिशय भयंकर घटना असल्याचं प्रत्यक्षदर्शी लोकांनी माध्यमांना सांगितलं होतं. इतकं हिंसक कृत्य करून फाशीची शिक्षा रद्द करण्यात आल्याने अनेक लोकांनी टीकेची झोड उठवली होती. 

रस्त्यावर हॅवोक करणारा संतोष माने आता आपली शिक्षा येरवडा जेलमध्ये भोगतोय.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.