पहिली भारतीय मिस वर्ल्ड, जी सिनेमांच्या ऑफर नाकारून डॉक्टर झाली

मॉडेलिंग किंवा फॅशनच्या क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की मिस इंडिया, मिस वर्ल्ड या भव्य ब्युटी स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं. मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सहभागी होण्याची संधी मिळणं, हीच फार मोठी गोष्ट म्हणता येईल.

या स्पर्धांचं विजेतेपद जिंकणं म्हणजे शब्दात मांडता न येणारा आनंद. मिस वर्ल्ड ही मोठी स्पर्धा जिंकून देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचवणं, ही प्रत्येक मुलीसाठी निश्चितच एक अभिमानाची गोष्ट आहे. आजवर सहा भारतीय सौंदर्यवतींनी मिस वर्ल्डच्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं आहे.

१९६६ साली इतका अनुभव गाठीशी नसताना सुद्धा एका भारतीय सौंदर्यवतीने पहिल्यांदा मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता.

त्यांचं नाव डॉ. रिटा फारिया.

तुम्हाला नाव वाचून मनात प्रश्न आला असेल की, रिटा फारीया डॉक्टर होत्या ? याचं उत्तर असं आहे, मिस वर्ल्ड हा जागतिक किताब जिंकल्यानंतर रिटा फारीयांना सिनेमांच्या, जाहिरातींच्या अनेक ऑफर्स आल्या.

परंतू त्यांनी या सर्व ऑफर्स नाकारून स्वतःचं डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण केलं. आणि पुढील आयुष्यात रुग्णांची सेवा केली.

रिटा फारिया राहायला मुंबईत. मूळच्या गोव्याच्या असल्याने घरी गोवन संस्कृती आणि परंपरा होती. रिटा मेडिकलचं शिक्षण घेत होती. सावळा वर्ण, उंच असलेल्या रिटाने मैत्रीण आणि बहिणीच्या आग्रहाखातर गंमत म्हणून Eve’s मॅगझिनच्या साैंदर्य स्पर्धेत भाग घेतला. आश्चर्य म्हणजे रिटा ही स्पर्धा जिंकली. रिटाचा आत्मविश्वास वाढला.

१९६६ साली मिस इंडिया स्पर्धेत रिटाने भाग घेतला. या स्पर्धेत सुद्धा रिटा विजयी झाली. याच वर्षी रिटा मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी लंडनला गेली.

लंडनला गेल्यानंतर मात्र रिटाला खरा संघर्ष करावा लागला. इतर देशांतून या स्पर्धेसाठी ५१ मुली आल्या होत्या. त्यांचं राहणीमान, त्यांनी परिधान केलेले कपडे अशा गोष्टी बघून रिटा गोंधळून गेली. प्रत्येक मुलीला त्यांच्या देशातील दुतावासाकडून जेवणाचं वैगरे आमंत्रण होतं.

परंतु भारतीय दुतावासाकडून रिटाला कोणत्याही प्रकारचं आमंत्रण देण्यात आलं नाही.

लंडनला यायच्या आधी काही दिवसांपूर्वी रिटाला कळालं की, मिस वर्ल्ड स्पर्धेत स्विमिंग कॉस्च्युम फेरी असते. तसेच एका फेरीमध्ये स्पर्धकांना गुडघ्यापर्यंत साडी वर उचलून पाय दाखवावे लागतात.

त्यावेळी मुंबईत राहणाऱ्या मॉडेल पर्सिस खंबाटा यांनी रिटाला त्यांचा स्विमिंग ड्रेस दिला. आणि बऱ्यापैकी फॅशनेबल राहणाऱ्या काही स्त्रियांकडून रिटाने त्यांच्या साड्या मिळवल्या.

हे सर्व सोबत घेऊन रिटा लंडनला आली होती.

५१ स्पर्धकांमध्ये सुद्धा इतक्या मोठ्या व्यासपीठावर असलेला आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण वावर यामुळे पहिल्या २५ स्पर्धकांमध्ये रिटाची निवड झाली. यानंतर काहीच दिवसांमध्ये स्विमिंग कॉस्च्युम राऊंड असणार होता.

परंतु ऐनवेळी रिटाच्या लक्षात आलं की, पर्सीस खंबाटा यांनी दिलेला स्विमिंग ड्रेस त्यांना छोटा पडतोय.

तसेच स्पर्धेच्या नियमानुसार त्यांनी घातलेल्या पायातल्या चपला नियमबाह्य होत्या. या अडचणींवर मात करण्याची त्यांना तातडीने गरज होती. भारतीय दूतावासाने रिटाला मदत करण्यास नकार दिला. लंडनला येताना जे काही पैसे सोबत आणले होते, ते रिटाने या गोष्टींसाठी खर्च केले.

१७ नोव्हेंबरची रात्र. व्यक्तिमत्व फेरीमध्ये रिटाला प्रश्न विचारण्यात आला.

“तुला डॉक्टर का व्हायचं आहे?”

यावर रिटा म्हणाली,

“भारतात लोकसंख्या वाढीला नियंत्रण बसण्यासाठी स्त्रियांना शिक्षण आणि मार्गदर्शन करण्याची गरज आहे. म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे.”

रिटाने दिलेलं हे उत्तर ऐकून उपस्थित परीक्षक आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ९ जणांपैकी ७ परीक्षकांनी तिच्या बाजूने मत दिलं.

आणि तो क्षण आला… रिटा फारियाने मिस वर्ल्ड हा किताब जिंकला.

याआधी या स्पर्धेत फक्त गोऱ्या परदेशी मुलींना विजेतेपद दिले जात होते. परंतु रिटाने हा पायंडा मोडीत काढून केवळ भारताची नव्हे तर आशिया खंडातील पहिली मिस वर्ल्ड होण्याचा सन्मान मिळवला.

SAVE 20201004 131029

आयोजकांसोबत असलेल्या करारामुळे रिटाने एक वर्ष जगभर विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. एक वर्षांनंतर अनेक निर्माते, दिग्दर्शक यांनी सिनेमा, जाहिरातींच्या ऑफर्स रिटासमोर ठेवल्या.

परंतु या विश्वसुंदरीने या सर्व ऑफर्स नाकारून, कोणत्याही मोहाला बळी न पडता स्वतःचं मेडिकल शिक्षण पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केलं.

पुढील शिक्षणासाठी लंडन येथील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये रिटा दाखल झाली.

१९७१ साली तिने डेव्हिड पावेलशी प्रेमविवाह केला. पुढे हे दोघे आयर्लंड येथील डब्लिन शहरात स्थायिक झाले. १९७३ पासून त्यांनी स्वतःची मेडिकल प्रॅक्टीस करायला सुरुवात केली.

SAVE 20201004 131016

एका मुलाखतीमध्ये रिटा फारीया यांना प्रश्न विचारण्यात आला,

“इतका मोठा किताब जिंकून सुद्धा तुम्ही प्रसिद्धी, झगमगाटापासून दूर राहणं पसंत केलं. असं का?”

यावर रिटा म्हणाल्या,

“विश्वसुंदरी झाल्यानंतर सुद्धा मला शांत आणि समाधानाने आयुष्य जगता आलं. मला कौटुंबिक जीवन अनुभवता आलं. या गोष्टी प्रसिद्धी मिळाल्यानंतर हरवून गेल्या असत्या.”

इतकं साधं तरीही प्रामाणिक उत्तर रिटा फारियांनी दिलं.

 

मिस वर्ल्ड सारख्या जागतिक व्यासपीठावर भारताचं‌ नाव ज्यांनी पहिल्यांदा झळकवलं अशा डॉ. रिटा फारिया. इतकं अमाप यश मिळूनही अजिबात चलबिचल न होता, ज्यांनी स्वतःचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. रिटा फारियांचं आयुष्य जाणून घेतल्यावर त्यांच्याविषयी आदर आणि अभिमान वाटतो.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Rahul Sonawane says

    विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मिस रिटा बोलल्या की, “भारतात लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी स्रियांनी शिक्षित होणे गरजेचे आहे.” तर मग मिस रिटा यांनी विश्व सुंदरी बनल्यानंतर भारतीय स्रियांसाठी काय योगदान केले?

  2. अभिमानास्पद कृती. याला भारतीय संस्कार म्हणतात.

Leave A Reply

Your email address will not be published.