कॅनडाच्या ११ मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टर्स पैकी ९ जण भारतीय वंशाचे आहेत

भारतातील प्रसिद्ध पंजाबी गायक, हिपहॉप स्टार सिद्धू मुसेवालाचा मृत्यू झाला तेव्हा देशातील गँगस्टर लोकांची धडाधड नावं समोर यायला लागली. गॅंगवॉरचं जाळं भारतात कसं खोलवर रुजलं गेलंय याची प्रचिती या घटनेतून आली होती कारण याच गॅंगवॉरच्या वैरातून सिद्धू मुसेवेलाची हत्या झाल्याचं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं.

सिद्धू मुसेवालाची हत्या पंजाबमध्ये झाली मात्र सगळी सूत्र कॅनडामधून हलवली गेल्याचं देखील समोर आलं होतं. तेव्हा कॅनडा आणि पंजाबमधील गँगवॉर जगाच्या समोर आलं.

पंजाबमधील लोकांना कॅनडामध्ये जाऊन स्थायिक होण्याचं, तिथे काम करण्याचं खुळ सर्वांना माहितेय. मात्र यातील अनेक जण कॅनडात जाऊन गॅंगस्टर होतायेत, हे सत्य सिद्धूच्या मृत्यूने प्रकर्षाने समोर आलं. याची साक्ष देणारी अजून एक बातमी सध्या समोर आली आहे… 

कॅनडाच्या ‘मोस्ट वॉन्टेड गँगस्टर्स’च्या यादीत ११ पैकी ९ लोक भारतीय वंशाचे असल्याचं समोर आलं आहे.

कॅनडातील व्हँकुव्हर पोलिस विभाग आणि ब्रिटिश कोलंबिया पोलिस एजन्सीने  ३ ऑगस्ट रोजी पब्लिक सेफ्टी वॉर्निंग जारी केली आहे.  ११ लोकांचा फोटो आणि नाव आहे असलेल्या या वार्निंगवर लिहिलंय की, “या लोकांचा टोळी युद्धामध्ये आणि वेगवेगळ्या हिंसेच्या घटनांमध्ये समावेश असल्याने सार्वजनिक सुरक्षेस धोका निर्माण करू शकतात.”

शिवाय तिथल्या जनतेला या लोकांपासून दूर राहण्याचं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

या अकरा जणांपैकी नऊ जण भारतीय वंशाचे असल्याचं देखील कॅनडा पोलिसांनी सांगितलं आहे.

शकील बसरा (२८), अमरप्रीत समरा (२८), जगदीप चीमा (३०), रवेंद्र सरमा (३५) बरिंदर धालीवाल (३९) अँडी सेंट पियर (४०) गुरप्रीत धालीवाल (३५) रिचर्ड जोसेफ व्हिटलॉक (४०), अमररूप गिल (२९), सुखदीप पानसल (३३) आणि सुमदीश गिल (२८) अशी या यादीतील लोकांची नावं आहेत.

यातील नऊ नावं पंजाबी असल्याचं दिसतं. सगळ्यांचं वय २८ ते ४० च्याच आत आहे. 

सीएफएसईयूचे सहाय्यक कमांडर मॅनी मान यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत या लोकांबद्दल माहिती दिली आहे. कॅनडातील टोळी युद्धाची परिस्थिती बघता यादीतील ११ जणांना केव्हाही त्यांच्या प्रतिस्पर्धी गॅंगमधील लोक ठार करू शकतात. त्यामुळे या ११ जणांचे मित्र, कुटुंब आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर देखील धोक्याची तलवार आहे. 

मान त्यांच्या नेतृत्वाखाली या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे ज्यात त्यांच्या वाहनांसह त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा समावेश आहे. याने गँगस्टर लोकांच्या कामाला काही प्रमाणात आळा बसेल, असं सांगण्यात आलंय. 

ही यादी का सादर करण्यात आली आहे?

गेल्या वर्षी देखील अशीच ११ जणांची यादी देण्यात आली होती. तेव्हाच्या यादीत असलेल्या मनिंदर धालीवाल नावाच्या एका गँगस्टरची गेल्या महिन्याच्या अखेरीस व्हिसलरमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सतर्कतेचा इशारा देण्यासाठी नवीन यादी जारी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिंदरचा भाऊ हरप्रीत याला देखील गेल्या वर्षी व्हँकुव्हरच्या कोल हार्बर परिसरात गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. याच दोघांचा आणखी एक भाऊ गुरप्रीत धालीवाल यंदाच्या यादीत आहे.

व्हँकुव्हर पोलिसांच्या एक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या परिसरातील सर्वात मोठा पोलिस विभाग या टोळी युद्धाच्या समस्येचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. हे काम अगदी गुप्त पद्धतीने सुरु आहे. हे गँगस्टर्स वेगवेगळ्या अड्यांवरून त्यांचं काम करतात म्हणून विविध पोलिस यंत्रणांसोबत काम करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. 

जून २०२१ मध्ये जेव्हा टोरोंटो पोलिसांनी ब्रॅम्प्टनमधील इंटरनॅशनल ड्रॅग रॅकेट समोर आणलं होतं तेव्हा पहिल्यांदा कॅनडा आणि पंजाबमधील क्राइम संबंध जागतिक तपासणीच्या अंतर्गत आले होते. ६१ दशलक्ष डॉलर्स किंमतीचे १,००० किलो ड्रग्स, ४८ बंदुका, १ दशलक्ष डॉलर्स रोख त्या छाप्यात सापडले होते.   

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २८ जणांपैकी बहुतांश जण भारतीय वंशाचे होते. 

मेट्रो व्हँकुव्हर क्राइम स्टॉपर्सच्या कार्यकारी संचालक लिंडा अंनिस यांनी मागे सांगितलं होतं की, ब्रिटिश कोलंबियामध्ये २०२१ मध्ये टोळीशी संबंधित १२३ गोळीबार झाले होते.

यावर्षी १० फेब्रुवारला या ड्रॅग प्रकरणातील आरोपी सरबजितसिंग सँडर याची गॅंगवॉर मध्येच कॅनडातील लँगली इथे हत्या करण्यात आली होती. सँडर ड्रग्जच्या वाहतुकीसाठी कुरिअरची व्यवस्था करायचा, असं सांगितलं जातं. टोळी तयार करत भारतीय लोक चुकीच्या मार्गाने जात असल्याचं तेव्हा पोलिसांनी म्हटलं होतं.

टोळीयुद्धाचा फटका अनेकदा इंडो-कॅनेडियन लोकांना देखील बसतो. मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत अशा टोळी युद्धादरम्यान एका पोलिस अधिकाऱ्यासह चार इंडो-कॅनेडियन ठार झाले होते. त्यानंतर सीएफएसईयूने ११ लोकांचे फोटो जारी केले होते.

हे लोक गुन्हेगारीकडे का वळत आहेत? यावर कॅनडातील एका पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली होती.

“ते तरुण सामान्यत: सभ्य कुटुंबांमधून येतात. त्यांच्याकडे यशस्वी होण्यासाठी संसाधने असतात परंतु त्यांना पैसा कमावण्याचा सोपा मार्ग हवा असतो. धमकावणे, नियंत्रण ठेवणं त्यांना आवडतं. याच मानसिकतेमुळे त्यांना माफियांचा भाग होतात” 

असं अधिकाऱ्याने सांगितलं होतं.

पंजाबी लोकांचं टोळी युद्ध किती मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, हे नुकत्याच समोर आलेल्या ११ मोस्ट वॉन्टेड लिस्टमधून दिसत आहे. या माहितीने कॅनडामध्ये राहणारे भारतीय वंशाचे लोक कोणत्या मार्गाने जात आहेत, याची प्रचिती येते आहे. पंजाबी तरुण गॅंगस्टर्स होण्याच्या दिशेने खेचला जातोय, हे समजून येतंय.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.