सत्ता, अपयश, गंडलेले निर्णय… सगळं बघितलेले अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे राज्यपाल होऊ शकतात
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरूषांबाबत अपमानास्पद वक्चव्य केल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण त्यांच्या विरुद्ध चांंगलंच तापलं होतं. आता स्वत: कोश्यारींनी पंतप्रधान मोदींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीये. त्यामुळे, ते लवकरच राज्यपाल पदावरून निघतील असं दिसतंय
मग, आता नवे राज्यपाल कोण? तर, दबक्या आवाजात एका नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग.
अमरिंदर सिंग यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द ही कायम चर्चेत राहिलीये. त्यांच्या निर्णयांमुळे असेल, पक्षविरोधी भुमिकांमुळे असेल किंवा मग त्यांनी आजवर मारलेल्या राजकीय उड्यांमुळे असेल.. पण ते चर्चेत राहिले हे नक्की.
बघुया त्यांचा इतिहास, पार्श्वभुमी आणि राजकीय कारकीर्द कशी होती.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जन्म 1942 मध्ये पंजाबमधील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठ्या जमीनदारांपैकी एक असलेल्या पतियाळा राजघराण्यात झाला.
अमरिंदर यांचे आई वडील यादविंद्र सिंग आणि मोहिंदर कौर यांचे काँग्रेसशी जवळचे संबंध होते आणि राजघराण्यातून राजकारणात प्रवेश करणारे ते पहिलेच दांपत्य होते. मोहिंदर कौर यांना पहिल्यांदा 1962 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राज्यसभेवर नामांकित केले होते.
अमरिंदर यांचे वडील यादवींद्र सिंग यांनी 1967 मध्ये पंजाब विधानसभेची निवडणूक पतियाळाला लागून असलेल्या डकाला येथून लढली होती. त्याच वर्षी त्यांची आई देखील 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पटियाला लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आली.
तथापि यादवींद्र यांनी राजकारणात प्रवेश केला नाही आणि राजदूत म्हणून नेदरलँडला रवाना झाले. अमरिंदर यांनी यादरम्यान डेहरादूनच्या दून स्कूलमधून जिथं गांधी घरण्याचीही सगळी पोरं शिकली आहेत तिथून आपले शिक्षण पूर्ण केले आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मधून लष्करी प्रशिक्षणही पूर्ण केले.
यानंतर 1963 मध्ये अमरिंदर सिंग भारतीय सैन्यात सामील झाले आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते शीख रेजिमेंटचा भाग होते.
1969 मध्ये ते आर्मीमधून बाहेर पडले. त्यांचे वडील आणि आजोबा देखील सैन्यात होते आणि “सैन्य नेहमीच माझे पहिले प्रेम असेल” असे अनेक वेळा त्यांनी सांगितले. आतापर्यंत त्यांनी आपले आजोबा आणि वडील जे करत होते तेच फॉलो केलं. इथून पुढं मात्र त्यांनी राजकरणात आपल्या बापजाद्यांपेक्षाही मोठी झेप घेतली.
आर्मी सोडल्यानंतर जवळपास १५ वर्षांनी अमरिंदर राजकारणात आले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून अमरिंदर सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसला पंजाबमध्ये चेहऱ्याची गरज होती आणि कॅप्टनलाही जोरदार सुरुवात हवी होती. अशा परिस्थितीत राजीव गांधींनी आपला ‘मित्र’ अमरिंदरवर विश्वास व्यक्त केला आणि अमरिंदरने तो विश्वास कायमचा जिंकून घेतला.
पण त्यानंतर चार वर्षांनंतर म्हणजेच १९८४ मध्ये ऑपेरेशन ब्लू स्टार झालं त्याअंतर्गत सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाई झाली तेव्हा कॅप्टन काँग्रेसवरच चिडले.
त्यांचा राग एवढा होता की त्यांनी एका झटक्यात काँग्रेस पक्ष सोडला आणि अकाली दलात प्रवेश केला. सप्टेंबर 1985 मध्ये सुरजित सिंग बर्नाला यांच्या सरकारमध्ये ते मंत्री देखील बनले. मात्र सात महिन्यांतच बर्नाला यांच्या आदेशानुसार पोलिसांनी दरबार साहिबमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी विरोध म्हणून ते मंत्रिमंडळ सोडले. दोन वेळा शिखांसाठी सत्ता लाथाडल्यामुळे अमरिंदर सिंग शिखांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले.
1992 मध्ये अमरिंदर सिंग यांनी स्वतःचा पक्षच काढण्याचा निर्णय घेतला आणि शिरोमणी अकाली दल (पंथिक) ची स्थापना केली.
पहिल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे तीन आमदार निवडून आले मात्र सहा वर्षांनंतर 1998 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आल. १९९८च्या निवडणुकीत अमरिंदर सिंग यांना केवळ ८५६ मतं मिळाली होती.
त्यामुळे त्यांनी आपली कारकीर्द वाचवण्यासाठी अमरिंदर सिंग यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये केला. आज जवळपास २४ वर्षांनी अमरिंदर सिंग हाच इतिहास रिपीट करतील जेव्हा ते आपला पक्ष भाजपात विलीन करतील.
1999 मध्ये त्यांची पंजाब काँग्रेसचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिल्यानंतर अमरिंदर सिंग 2002 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री झाले. पुढे 2014 मध्ये त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे दिग्गज अरुण जेटली यांचा सामना केला आणि प्रतिष्ठित अमृतसर लोकसभा मतदारसंघातून 102,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. त्यांनी प्रताप सिंग बाजवा यांच्याकडून पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही खेचून घेतले.
2017 मध्ये, त्यांनी काँग्रेसला पंजाबमध्ये जबरदस्त विजय मिळवून दिला आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळवले.
मुख्यमंत्रिपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या गटाशी त्यांचा संघर्ष झाला. काँग्रेसच्या आमदारांना ते भेटत नसल्याचीही टीका केली होती. अखेर सप्टेंबर 2021 मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि पक्षही सोडला.
काँग्रेस सोडल्याच्या एका महिन्यानंतर कॅप्टन अमरिंदर यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाब लोक काँग्रेस हा स्वतःचा पक्ष सुरू केला.
भाजपसोबत युती करण्याची घोषणाही त्यांनी केली. मात्र या निवडणुकीतत्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. स्वतः अमरिंदर सिंग यांनाही आम आदमी पार्टीचे अजित पाल कोहली यांच्याकडून 13,000 हून अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला.
यावेळी 80 वर्षांच्या अमरिंदर सिंग यांच्यापुढे त्यांच्या भविष्यापेक्षा त्यांच्या मुलाच्या आणि नातवाच्या राजकीय भविष्याची चर्चा आहे आणि त्यासाठीच अमरिंदर सिंग यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केल्याचं सांगण्यात आलं होतं.
आता हेच अमरिंदर सिंग महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून येतील अशी शक्यता वर्तवली जातेय.
हे ही वाच भिडू:
- या लाजिरवाण्या पराभवानंतर अमरिंदर सिंग काँग्रेस मध्ये परतले होते
- अमरिंदर सिंग यांनी आपल्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडच्या व्हिसासाठी अर्ज केला होता
- राज्य सरकार राज्यपालांना चॅन्सलर पदावरून काढू शकतं का ?