कोलकात्याच्या एका सामान्य पोरानं तब्बल १२०० कोटींचा घोटाळा केला होता….

१९९६ च्या मे महिन्यात एक भयंकर मोठा घोटाळा बाहेर आला. हर्षद मेहताने गाजवलेल्या १९९२ च्या घोटाळ्यातून देश सावरतच होता कि अजून एक घोटाळा झाला होता. या घोटाळ्याची किंमत होती १२०० कोटी. या घोटाळ्याचा सूत्रधार होता चेनरूप भन्साळी.

चेनरूप भन्साळी हा कोलकात्यामधील मध्यमवर्गीय व्यापारी कुटुंबातला होता. त्याने वाणिज्य शाखेची पदवी घेतलेली होती. १९८० मध्ये त्याने चार्टर्ड अकौंटन्सी पूर्ण केली. चार्टर्ड अकौंटन्सी पूर्ण केल्यावर त्याने सीआरबी कन्सल्टन्सी नावाने एक संस्था सुरु केली. चेनरूप भन्साळीच्या विविध क्षेत्रांमधील लोकांसोबत भरपूर ओळखी होत्या. कारण कोलकात्यामधील काही नामांकित कंपन्यांना इश्यू मॅनेजमेंट सेवा तो पुरवत असे.

सीआरबी कन्सल्टन्सी हे नाव सीआरबी कॅपिटलमध्ये बदली झाले आणि १९९२ मध्ये ती पब्लिक लिमिटेड कंपनी बनली. १९९२ ते १९९६ या वर्षांमध्ये चेनरूप भन्साळी सीआरबी कॅपिटल मार्केट्स, सीआरबी म्युच्युअल फ़ंड आणि सीबीआय शेअर कस्टोडिअल सर्व्हिसेस सारख्या अनेक आर्थिक कंपन्या चालवत होते. भन्साळीने अनेक आकर्षक योजना आणि सार्वजनिक आणि मोठ्या संस्थांना सीआरबीमध्ये गुंतवूणक करायला लावली.

सीआरबी कॅप या कंपनीने जानेवारी १९९५ मध्ये १७६ कोटी रुपये उभे केले होते आणि सोबतच ठेवीदारांना भरपूर इन्सेंटिव्हज देऊन आकर्षितही केलं. सीआरबीने १३३ बनावट कंपन्या स्थापन केल्या व ठेवीदारांकडून जमा केलेला हा पैसा बनावट कंपन्यांना दिला जात असे. सीआरबी कंपनीने मे १९९६ मध्ये स्टेट बँकेच्या मुंबईतल्या मुख्य शाखेत खातं उघडलं. या बँकेच्या शाखांमधून व्याज आणि लाभांश वितरित करण्याची सोयही करण्यात आली. कंपनीचे धनादेश बँकेच्या शाखांनी डिमांड DRAFT सारखे समजून तात्काळ पैसे देण्याची व्यवस्था केली.

मात्र या वेळी मुंबईच्या मुख्य खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचं बँकेच्या लक्षात आलं. १९९७ च्या मे महिन्यात हा सारा प्रकार उघडकीस आला. सीआरबीच्या ठेवीदारांना रकमा मिळेनाशा झाल्या. पाहता पाहता सीआरबीचा डोलारा काही दिवसातच कोसळला आणि लाखो गुंतवणूकदार फसवले गेले. या घोटाळ्याने देशभर खळबळ माजली.

भन्साळीने यातून भरपूर पैसा छापला होता. सीबीआर कॅपिटल मार्केटद्वारे त्याने १७६ कोटी जमा केले, सीआरबी म्युच्युअल फ़ंड २३० कोटी आणि मुदत ठेवींसाठी त्याला सुमारे १८० कोटी रुपये मिळाले होते.

अशा अनेक सोर्सेसकडून चेनरूप भंसाळीकडे ९०० कोटी सहजपणे आलेले होते. १९९५ मध्ये शेअर बाजार कोसळला तेव्हा भन्साळीच्या वित्तीय संस्थांवर त्याचा परिणाम झाला. यातून जिथून पैसे मिळतील तिथे हात मारायला सुरवात केली आणि भन्साळीने १२०० कोटीची रक्कम लुटली.

१९९२ मध्ये भंसाळीकडे भांडवल २ कोटी रुपये होते पण १९९६ मध्ये अचानक ते ४३० कोटी झालं तेव्हा शंकांचा पूर वाहू लागला. मीडियाने हे प्रकरण लावून धरलं. गुंतवणूकदारांचे पैसे वापरून भन्साळी कोट्याधीश होत होता. हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा चेनरूप भन्साळी आपली पत्नी मंजुळा, आई-वडील, बहीण आणि आपल्या दोन मुलांसोबत हॉंगकॉंगमध्ये पळून गेला.

पण काही दिवसातच भन्साळीला अटक करण्यात आली. ठेवीदारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली होती. सीबीआयने सीआरबीच्या कार्यालयाला टाळा ठोकला आणि चार संचालकांसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे १६ ठिकाणी धाडी घातल्या गेल्या आणि कंपनीची खाती गोठवली गेली.

कंपनीच्या मालकीची मालमत्ता विकणे अथवा हस्तांतरित करणं, त्याचप्रमाणे नव्याने ठेवी स्वीकारण्यावरही सीबीआयने बंदी आणली. पण सीआरबीच्या ठेवीदारांच्या ठेवी मात्र परत न मिळाल्याने त्यांचं फार मोठं नुकसान झालं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.