भुजबळांनी बॉलिवूडवाल्यांना वचन दिलेलं , “मला फक्त सहा महिन्याचा वेळ द्या”

दोन हजार साल उजाडलं तेच 2K चं टेन्शन घेऊन. “देखो २००० जमाना आ गया” गाण म्हणत आमीर खानचा ‘मेला ‘ जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात रिलीज झाला. स्वतःच्या धाकट्या भावाला लॉंच करण्यासाठी आमीरने काढलेला पिक्चर म्हणून त्याच्याकडे सगळ्यांचे डोळे होते. पिक्चर सुपरफ्लॉप झाला.

दुसरा खान शाहरुख त्याचा होम प्रोडक्शनचा पिक्चर फिर भी दिल है हिंदुस्तानी दोन आठवडे गॅप टाकून रिलीज होणार होता. स्वतःच्या ड्रीम्स अनलिमिटेड या कंपनीचा हा पहिलाच पिक्चर म्हणून शाहरुखच्या त्याच्या कडून खूप अपेक्षा होत्या. पिक्चर गाजण्यासाठी लागणारे सगळे मसाले त्यात होते.

पण त्याच्या आधीच्या आठवड्यात एक पिक्चर रिलीज झाला.

संक्रांतीचा दिवस होता. कहो ना प्यार है नावाचा तो पिक्चर. ओळखीचा हिरो हिरोईन नाही म्हणून लोक थिएटर मध्ये जाऊन बघायला घाबरत होते. पण गाणी सुरवातीपासून हिट होती. काही दिवसातच माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर पिक्चर चालू लागला. नुसता चालला नाही तर त्याच्या वादळात सुपरस्टार शाहरुख खानचा फिर भी दिल ही हिंदुस्तानी वाहून गेला.

लोक बोलले शाहरुख संपला.

फिल्म इंडस्ट्रीला नवा अमिताभ बच्चन मिळाला. रातोरात सुपरस्टार होणे म्हणजे काय याची प्रचिती ह्रितिक रोशनला आली होती. त्याच्या पेक्षाही त्याचे वडील प्रचंड खुश होते.

राकेश रोशन देखील एकेकाळचे हिरो पण त्यांना कधी म्हणावी तशी प्रसिद्धी मिळालीच नाही. फिल्म इंडस्ट्रीमधील एक दुय्यम फळीचा नट यापुढे मजल त्यांना मारता आली नाही. आपली अधुरी राहिलेली स्वप्न ह्रितिक पूर्ण करेल म्हणत त्यांनी कहो ना प्यार है बनवला आणि खरंच ह्रितिकने त्यांचा विश्वास पूर्ण करत बॉलिवूडमध्ये झेंडा गाडला.

कहो ना प्यार है बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत होता. राकेश रोशन स्वतः निर्माता दिगदर्शक असल्यामुळे त्यांची सगळी बोटे तुपात होती. त्यांच्या तर ऑफिसचा आणि घरचा फोन दिवसभर खणखणत होता. कधी कोणी निर्माता ह्रितिकला साइन करायसाठी फोन करत होता तर कधी कोणी अवॉर्ड देण्यासाठी. इतर मोठे स्टार देखील कौतुक करण्यासाठी फोन करत होते.

अशातच आलेला एक फोन राकेश रोशन यांना अचंबित करणारा होता. आधी तर त्यांना वाटलं कि कोणी तरी फॅन आहे पण समोरची व्यक्ती धमक्या आणि शिवीगाळ करत होती. त्याने भली मोठी खंडणी देखील मागितली. पण राकेश रोशन यांनी त्या कडे दुर्लक्ष केलं आणि फोन ठेवून दिला.

२१ जानेवारी २०००, राकेश रोशन आपल्या सांताक्रूझच्या ऑफिसला निघाले होते. ते ऑफिसच्या खाली पोचलेच असतील इतक्यात त्यांच्या कारवर गोळीबार सुरु झाला. एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील दोन गोळ्या राकेश रोशन यांना लागल्या. एक गोळी खांद्याला चाटून गेली तर दुसरी छातीत घुसली. त्यांच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून कार तिथून वेगाने बाहेर काढली आणि थेट रुग्णालयात पोहचवलं.

कसबस राकेश रोशन यांचा जीव वाचला. पण या हल्ल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड मध्ये धरणीकंप झाला. ह्रितिक रोशनने तर सिनेमात पुन्हा काम करायचं नाही अशी प्रतिज्ञा घेतली. 

नव्वदच्या दशकात मुंबई भीतीच्या वातावरणाखाली जगत होती. अंडरवर्ल्डच्या गॅंग वॉरनी टोक गाठलं होत. दुबई किंवा पाकिस्तान मधल्या कराची मध्ये बसून मुंबई वर कन्ट्रोल ठेवलं जात होत. ९३ सालच्या बॉम्ब स्फोटानंतर दहशतीच्या जोरावर खंडणी गोळा करून त्यांचा कारभार चालला होता.

यात अंडरवर्ल्डची सर्वात सोपी टार्गेट होती मुंबईची फिल्म इंडस्ट्री.

कोणीही सोम्यागोम्या गुंडाने फिल्मस्टारचा फोन फिरवावा आणि डॉनचं नाव सांगून खोका पेटीसाठी धमकी द्यावी असं चालल होता. दाऊद इब्राहिमची डी कंपनी, छोटा शकील त्यांच्यातूनच बाहेर पडलेला अबू सालेम, छोटा राजन अशा अनेक टोळ्या अंडरवर्ल्ड मध्ये कार्यरत होत्या. खंडणी आणि इतर डीलने त्यांनी बॉलिवूडला घेरलं होतं.

कॅसेट किंग गुलशन कुमारची दिवसाढवळ्या हत्या असो किंवा राकेश रोशन यांच्यावरचा हल्ला,  फक्त फिल्मइंडस्ट्रीच नाही तर पूर्ण देश हादरला.

रोज येणारे खंडणीचे फोन, हल्ले यामुळे हिंदी फिल्म इंडस्ट्री वैतागली होती. मोठमोठे निर्माते दिग्दर्शक एकत्र आले. हे असंच चालू राहिलं तर काम करणे अवघड होऊन बसणार होते. यावर उपाय म्हणून फिल्म इंडस्ट्री मुंबईतून इतरत्र  हलवावी हा विचार समोर आला.

हाच मुद्दा घेऊन बॉलिवूडच्या कलाकारांचं एक शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलं.

तेव्हा सरकार होत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्यांनी या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांची भेट घेण्यास सांगितलं. भुजबळांची या शिष्टमंडळाशी तब्बल तासभर बैठक झाली. त्यांनी या कलाकारांना आश्वासन दिलं,

” तुम्ही फक्त सहा महिने थांबा. परिस्थिती बदलली नाही तर फिल्म इंडस्ट्री इतरत्र हलवण्यासाठी तुमचा मार्ग मोकळा आहे.”

छगन भुजबळ सांगतात ते शिष्टमंडळ मंत्रालयातून बाहेर पडल्या पडल्या मी मुंबईतील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली. गुंडांच्या टोळ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी देखील अत्यंत खंबीरपणे हि मोहीम राबवली. अंडरवर्ल्डचे पाळेमुळे खणून काढण्यात आले. छोटा राजन साठी बँकॉक आणि दाऊद साठी दुबईला पोलीस पथकं पाठवली. 

भुजबळांचा दावा आहे कि मी दिलेला शब्द खरा केला आणि सहा महिन्यात परिस्थिती आटोक्यात आली. अंडरवर्ल्डवर लगाम बसला, खंडणीची प्रकरणे कमी झाली आणि फिल्म इंडस्ट्री मुंबई बाहेर हलवण्याचं संकट टळलं.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.