म्हणून मंगोलियाने राजनाथ सिंग यांना घोडा गिफ्ट केलाय…

भारतात जेव्हा परदेशी पाहुणे येतात तेव्हा त्यांना गिफ्ट म्हणून अनेक वेगवेगळ्या गोष्टी दिल्या जातात ज्या भारताच्या संस्कृतीचं, परंपरेचं प्रतीक असतात. ताजमहालची प्रतिकृती, भगवतगीता, काश्मिरी शाल अशा गोष्टींचा त्यात समावेश असल्याचं बोललं जातं. मात्र पंतप्रधान नक्की कोणतं गिफ्ट देतात हे ऑफिशियली काही सांगितलं जात नाही.

असं का? हे विचारल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलंय की, ही माहिती उघड केली तर भारताचे संबंधित देशांशी जे संबंध आहेत त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

मात्र इतर देशांनी भारताच्या मंत्र्यांना कोणते गिफ्ट दिले आहेत याची यादी परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर डिक्लेअर केली जाते. शिवाय इतर देशांचे अधिकारीही ते स्वतः डिस्क्लोज करतात. हे सांगण्याचं कारण ठरलंय भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मंगोलियाने दिलेली भेट. 

राजनाथ सिंह मंगोलियाच्या दौऱ्यावर गेले असताना मंगोलियाचे राष्ट्रपती उखनागिन खुरेलसुख यांनी त्यांना घोडा गिफ्ट केला आहे. पांढऱ्या रंगाच्या या घोड्याचं नाव आहे ‘तेजस’. पण आकर्षणाचं कारण घोडा भेट दिलाय हे नाहीये तर मंगोलियाला आजवर ज्यांनी भेट दिलीये त्यांना घोडाच गिफ्ट म्हणून दिला गेलाय, हे आहे. 

आजपासून ७ वर्षांआधी २०१५ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाला भेट दिली होती तेव्हा त्यांना तपकिरी रंगाचा ‘कंठक’ नावाचा घोडा देण्यात आला होता. तर १९५८ मध्ये जेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू मंगोलियाच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हाही ३ घोडे मंगोलियन सरकारने गिफ्ट स्वरूपात दिले होते.

‘मंगोलियन’ या विशिष्ठ जातीचे हे घोडे असतात. 

नेहरूंचे घोडे भारतात आणले गेले होते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांना भेट म्हणून दिलेले घोडे केवळ प्रतीकात्मक आहेत, ते भारतात आणता येणार नाहीये, हा देखील मुद्दा सगळ्यांचं लक्ष या घटनेकडे वेधतोय. 

म्हणून मंगोलिया त्यांच्या पाहुण्यांना घोडे का गिफ्ट म्हणून देतो? आणि ते भारतात का आणता येत नाही? हा प्रश्न कोड्यात पडतोय… 

अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीनुसार मंगोलियाला घोड्यांचा देश म्हणून ओळखलं जातं. मंगोलियात ३० लाखांहून जास्त घोडे आहेत, त्यामुळे घोड्यांची लोकसंख्या या देशाच्या लोकांच्या संख्येएवढी झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मंगोलियात घोडे असण्यामागे या लोकांची घोड्यावर आधारलेली संस्कृती आणि परंपरा कारणीभूत ठरते. 

मंगोलियाचा इतिहास घोड्यांनी समृद्ध केला आहे.

इतिहासात डोकावलं तर समजतं मंगोलियाचे लोक ४००० वर्षांपूर्वी देखील त्यांच्या दैनंदिन जीवनात घोडे वापरत होते. ४ ते साडे ४ फूट उंचीच्या या घोड्यांचे पाय खूप मजबूत असतात. वाळवंट, डोंगर यावर ते सरासर चढतात. महागड्या देखभालीची त्यांना गरज नसते म्हणून इतके लोक मालवाहतुकीपासून ते प्रवासापर्यंत याच घोड्यांचा वापर करायचे. 

२२५ ते २७५ किलो वजनाचे हे घोडे कमी आहार दिला तरी मैदानावर अगदी मजबुतीने उभे राहतात. तर दिवसभरात १२८ किलोमीटर अंतर ते कापू शकतात. या घोड्यांचं हेच वैशिष्ट्य बघता मंगोलियाचा जगप्रसिद्ध शासक ‘चंगेज खान’ याने देखील युद्धासाठी या घोड्यांची निवड केली होती आणि ११७५ मध्ये याच घोड्यांवर बसून जगाच्या २२% भूभागावर वर्चस्व मिळवलं होतं. 

१२२३ मध्ये तर ता घोड्यांची कमालच केली होती. मंगोलियन सैन्यापुढे रशियाचं सैन्य उभं होतं. संख्या होती २० हजार मंगोलियांसमोर ८० हजार रशियन. या युद्धच नेतृत्व चंगेज खानचे दोन लेफ्टनंट करत होते. चारपट जास्त सैन्य समोर उभं असलेलं बघूनही मंगोलियन सैनिक घाबरले नाही कारण त्यांना त्यांच्या घोड्यावर पूर्ण विश्वास होता. 

याच विश्वासामुळे त्यांनी घोडयांना टाप दिली आणि थेट ८० हजार रशियन सैन्यावर तुटून पडले. 

युद्धात घोडे टिकून राहिले आणि त्यांच्या चपळतेला साथ देत मंगोलियन घोडेस्वारांनी देखील तेवढ्याच कौशल्याने धनुष्य आणि भले फिरवत रशियन सैन्याचा नायनाट केला होता. मुख्यतः आशिया आणि युरोपबद्दल सांगायचं तर याच घोड्यांच्या जीवावर चंगेज खानाने ९० लाख वर्ग किलोमीटर इतक्या भूभागावर आपली सत्ता स्थापन केली होती. 

युद्ध आणि प्रवासात मजबुतीने सैन्याला साथ देणारे हे घोडे खुद्द सैनिकांना मजबूत करण्यातही महत्वाची भूमिका बजावयाचे असं सांगितलं जातं. कसं? तर यामागे कारण आहे या मंगोलियन घोडीचं दूध. 

मंगोलियन घोडीच्या दुधाला स्थानिक भाषेत ‘ऐराग’ किंवा ‘कुमिस’ असं देखील म्हटलं जातं. या दुधाची खासियत म्हणजे यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि खनिज असतात. म्हणून सैनिकांना मजबूत लागली की ते या घोडींचं दूध प्यायचे. त्यातही इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे या घोडीच्या दुधात २% अल्कोहोल असतं. त्यामुळे सैनिकांचा थकवा घालवायला देखील याची मदत व्हायची. 

मंगोलियन घोडीच्या दुधाच्या याच वैशिष्ट्यांना बघून त्याला ‘राष्ट्रीय पेय’ म्हणून मंगोलियन सरकारने घोषित केलं आहे. 

युद्धामध्ये या घोड्यांच्या वापराबद्दल अजून एक फॅक्ट असा सांगण्यात येतो की याच घोडयांवर बसून जेव्हा मंगोलियन सैन्याने चिनी सैन्यावर आक्रमण केलं होतं तेव्हा भिऊन चीनचे प्रथम सम्राट शी हुआंग यांनी सुमारे २२०० वर्षांपूर्वी ६४०० किलोमीटर लांबीची भिंत बांधली होती. 

असा मंगोलियन प्रजातीच्या घोड्यांचा वैभवशाली इतिहास आहे. याच इतिहासाला जपत आजही इथले लोक या घोड्यांचा सांभाळ करतात. या मंगोल जातीचे घोडे ज्यांच्याकडे आहेत त्या लोकांना मंगोलियात धनवान मानलं जातं. शिवाय ज्यांच्याकडे घोडा नाही अशांसाठी ‘घोडा नसलेला मंगोल म्हणजे पंख नसलेला पक्षी’ अशी म्हण देखील वापरली जाते. 

म्हणून इथले लोक आवर्जून मंगोल घोडा पाळतातच. इथल्या प्रत्येक घरात मंगोल घोडा असल्याने देशाचं अर्थकारण देखील या घोड्यांनी संभाळल्याचं दिसतं. ओईसी डॉट वर्ल्डनुसार, मंगोलियातून दुसऱ्या देशांत ज्या गोष्टी निर्यात केल्या जातात त्यात टॉपच्या पाच वस्तूंमध्ये घोड्यांच्या केसांचा समावेश आहे. २०२० मध्ये मंगोलियाने घोड्यांच्या केसांच्या निर्यातीतून सुमारे १ हजार ८६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. 

याशिवाय या घोड्यांच्या मांसाचीही निर्यात केली जाते. यातून २०२० मध्ये २६३ कोटींची कमाई देशाने केली होती. तर दररोजच्या कमी अंतराच्या प्रवासासाठी या घोड्यांचा वापर होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलचा वापरही इथल्या लोकांकडून कमी होतो, ज्यामुळे अजूनच पैशांची बचत होते. 

अशाप्रकारे आजही मंगोलियाचं आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय चक्र घोडयांभोवतीच फिरतं आणि म्हणूनच इथे येणाऱ्या पाहुण्यांना घोडा भेट देण्याची परंपरा आहे.

पण मग गिफ्ट म्हणून दिलेले घोडे बाहेरच्या देशात का नेऊ दिले जात नाही?

याचं कारण आहे मंगोलियाचा कायदा. २००५ मध्ये मंगोलियाच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने असा कायदा केला आहे की भेट म्हणून पशूंच्या देवाण-घेवाणीवर बंदी असेल. 

म्हणून पंतप्रधान मोदींना जेव्हा २०१५ मध्ये हा घोडा भेट म्हणून दिला तेव्हा तो भारतात आणता आला नाही, मात्र तो मंगोलियातील भारतीय दुतावासात ठेवण्यात आला. आताही राजनाथ सिंह यांना जो घोडा मिळाला आहे तो याच कारणाने भारतात येणार नाही.  

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.