म्हणून जगातला सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा पुरस्कार पहिल्यांदाच एका भारतीयाला मिळालाय

काल जेष्ठ सिनेअभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्विटरवरून एक बातमी दिली की,

जावेद अख्तर यांना मानाचा रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे.

संपूर्ण भारतभरातून जावेद अख्तर यांचं कौतुक करण्यात आलं. काही जणांना हा पुरस्कार जावेद अख्तर यांच्या गीत लेखनासाठी मिळाला आहे असं वाटलं. पण तसं नाही,

तर हा अवॉर्ड जगभरातून धर्मनिरपेक्षता, तर्कवाद आणि मानवतावादी मूल्यांची जपणूक करणाऱ्या एका व्यक्तीला दिला जातो.

या वर्षी याचे मानकरी ठरले, जावेद अख्तर.

कोण आहेत रिचर्ड डॉकिन्स?

रिचर्ड डॉकिन्स हे एक ब्रिटिश उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ व लेखक आहेत. ते जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते व तिथेच अनेक वर्षे त्यांनी अध्यापन देखील केलं.

चार्ल्स डार्वीन नंतर उत्क्रांती या विषयात योगदान देणाऱ्यांमध्ये रिचर्ड डॉकिन्स हे नाव प्रमुख मानलं जातं.

त्यांनी 1976 साली लिहिलेलं द सेल्फीश जीन हे पुस्तक आजही उत्क्रांतीवाद समजून घेण्यासाठी महत्वाचं मानलं जातं. आज इंटरनेटवर आपण सहज वापरतो तो मिम(meme) हा शब्द देखील रिचर्ड यांनीच तयार केलाय व सेल्फीश जीन या पुस्तकात पहिल्यांदा वापरला.

डॉकिन्स यांची याहूनही महत्वाची ओळख म्हणजे ते नास्तिकवादी आहेत.

म्हणजे वैयक्तिक जीवनात तर ते नास्तिक आहेतच पण जागतिक नास्तिकवादाच्या चळवळीचे ते अग्रणी मानले जातात.

जगभरातील बुद्धिवादी चळवळीमध्ये डॉकिन्स यांचे स्थान मानाचे आहे. देवाच्या अस्तित्वाची भीती दाखवून समाजात माजत असलेले धर्माचे व रूढी परंपरांचे अवडंबर याच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे.

जगातला सर्वात मोठा नास्तिक म्हणून समजल्या जाणाऱ्या डॉकिन्स यांच्या नावाने २००३ सालापासून एक पुरस्कार जाहीर करण्यात आला.

विज्ञान, शिक्षण किंवा मनोरंजन क्षेत्रात वंशभेद, वर्णभेद, धार्मिक भेदभाव या विरोधात काम करणाऱ्याना हा पुरस्कार दिला जातो. बिल मेहर, ख्रिस्तोफर हिचन्स, ज्युलिया स्विनी अशा जागतिक किर्तीच्या व्यक्तींना मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून जावेद अख्तर यांनी CAA कायदा असो किंवा भारतातील वाढत चाललेला धार्मिक भेदभाव, अल्पसंख्याकाविरुद्ध होत असलेले हल्ले या बद्दल बोलण्याचे धाडस दाखवले. सोशल मीडिया असो किंवा न्यूज चॅनेलवरील डिबेट, जावेद अख्तर यांनी आपली भूमिका नरम विनोदी शैलीत पण प्रखर पणे मांडली.

यामुळेच त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

जावेद अख्तर हे स्वतः रिचर्ड डॉकिन्स यांचे मोठे फॅन आहेत. त्यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार कधी आपल्याला मिळेल हे जावेद अख्तर यांनी स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं.

ते म्हणतात की,

या पुरस्कारामुळे जगाला कळेल की भारतातही असे लोक आहेत जे आपले मत जरी लौकिकार्थाने लोकप्रिय नसले तरी स्पष्टपणे मांडतात. आमच्या लोकशाहीने आम्हाला दिलेली ही भेट आहे आणि तिचं आम्ही कायम रक्षण करू.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.