कोळसा नाही म्हणून ऐन दिवाळीत विदर्भातले उद्योग अंधारात?

दिवाळी हा प्रकाशाचा सण. आपण लहान असल्यापासून हे वाचत आलोय. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लागलेले असतात आणि आसमंत उजळून निघतो. यावेळी मात्र विदर्भातल्या कामगारांची दिवाळी मात्र अंधारात जाण्याची शक्यता आहे, आणि यामागचं कारण आहे कोळशाची टंचाई.

भारत हा कोळसा उत्पादनातल्या टॉपच्या देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून देशात कोळशाची टंचाई जाणवतेय. देशातला साठा संपत चाल्लाय, आयात केलेल्या कोळशाच्या किंमती गगनाला भिडल्यात आणि खाण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यानं कोळशाच्या निर्मितीवर संकट ओढावलं आहे.

याचा मोठा फटका वीजनिर्मितीवर बसला होता. त्यामुळे सरकारनं सर्व कोळसा तातडीनं वीज निर्मिती केंद्रांकडे वळवला आणि लोडशेडींग सहन करण्याचं संकट टळलं. यामुळे साहजिकच राज्यातल्या उद्योगांपुढं मोठं संकट निर्माण झालं आहे. 

विदर्भात काय किस्सा झालाय?

अपुऱ्या कोळशामुळं विदर्भातल्या ४०० छोट्या-मध्यम आणि २५ मोठया उद्योगांपुढे पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा निघाला नाही, तर या सव्वाशे उद्योगांमधल्या कामगारांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. सध्या टंचाई असल्यामुळे खुल्या बाजारातले कोळशाचे भाव ७ हजार रूपये टनवरून डायरेक्ट १३ हजारांवर गेले आहेत. भरीस भर म्हणजे कोळशात भेसळही केली जात आहे. स्टील, पेपर, केमिकल, सिमेंट यासारख्या उद्योगांना फरनेस आणि बॉईलरसाठी कोळश्याची गरज असते. राज्य आणि केंद्र सरकारनं यावर तोडगा काढला नाही, तर हे उद्योग ऐन दिवाळीत अंधारात जातील हे नक्की.

उत्पादनात घट असल्यानं सरकारी कंपनीकडून विदर्भात कोळसा दिला जात नाहीये. खुल्या बाजारात असलेले चढे भाव उद्योगांना परवडणारे नाहीत. त्यामुळे उद्योग दोन्ही बाजूंनी कोंडीत सापडले आहेत. 

कोळशाची वाटणी कशी होते?
मध्य भारतात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ही सरकारी कोळसा कंपनी कोळसा उत्खननाचं काम करते. त्यानंतर, यातील ९२ टक्के कोळसा वीज कंपन्यांना आणि उरलेला ८ टक्के कोळसा हा उद्योगांना मिळतो. सध्या कोळशाची टंचाई असल्यानं वीज कंपन्यांना प्राधान्य मिळत आहे.

आता यावर तोडगा निघेपर्यंत विदर्भातले उद्योग अंधारात गेले नाहीत म्हणजे मिळवलं.

हे ही वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.