रिलायन्सपासून भारत पेट्रोलियम पर्यंतच्या कंपन्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी पुढे आल्या आहेत.
देशात सध्या आरोग्य आणीबाणी सोबतच ऑक्सिजन आणीबाणी निर्माण झाल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, दिल्ली अशा प्रमुख राज्यांमध्ये सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रातील अहमदनगरसारख्या जिल्ह्यांमध्ये तर अगदी तासावर पुरेल असा ऑक्सिजन शिल्लक आहे. त्यावर उपाय म्हणून विशाखापट्टणम मधून महाराष्ट्रात ऑक्सिजन आणण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेसची तरतूद करण्यात आली.
आरोग्य व्यवस्थेमधील ही तातडीची निकड ओळखून आता देशातील विविध उद्योगपती आणि त्यांच्या कंपन्या पुढे आल्या आहेत. पेट्रोलियम आणि स्टील कंपन्यांमध्ये लागणाऱ्या आणि तयार होणाऱ्या औद्योगिक ऑक्सिजनला या कंपन्यांनी आता मेडीकल ऑक्सिजनमध्ये रूपांतरित करून राज्यांना मोफत पुरवठा करायला सुरुवात केली आहे.
१. रिलायन्स इंडस्ट्रीज :
४ दिवसांपूर्वीच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या जामनगरच्या ऑईल रिफायनरीमधून कोरोनाची परिस्थिती गंभीर असलेल्या राज्यांना प्रत्येक दिवशी तब्बल ७०० टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा मोफत केला जाणार असल्याचं सांगितलं आहे.
त्यासाठी दररोज १०० टन असणार ऑक्सिजनच उत्पादन ७०० टनापर्यंत वाढवण्यात येणार आहे. आणि हा ऑक्सिजन गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश अशा राज्यांमधील मृत्यूशी झुंज देत असलेल्या ७० हजार रुग्णांना पुरवण्यात येणार आहे.
रिलायन्सच्या जामनगरच्या रिफायनरीमध्ये याआधी केवळ क्रूड ऑइलला डिझेल, पेट्रोल आणि विमान इंधन तयार करण्यासाठी लागणार औद्योगिक ऑक्सिजन तयार केला जात होता. मेडिकलसाठी लागणार ऑक्सिजन इथं उत्पादित होत नव्हता. मात्र देशाची गरज लक्षात घेऊन रिलायन्सने इथं मेडिकल ऑक्सिजनसाठी लागणारे यंत्रणा बसवून उत्पादन सुरु केलं आहे.
आता हे ७०० टनांवर असलेलं उत्पादन १ हजार टनांपर्यंत वाढवण्याचं कंपनीचं नियोजन आहे. तसचं या सगळ्यासाठी येणार खर्च हा कंपनीच्या सामाजिक जबाबदारी निधीतून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
२. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन
सरकारच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन देखील मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी पुढाकार घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दररोज १५० टन ऑक्सिजन दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या राज्यांसाठी मोफत पुरवला जाणार आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या ऑईल रिफायनरीमध्ये अगदी मर्यादित प्रमाणात औद्योगिक ऑक्सिजनच उत्पादन होत असते. मात्र आता कंपनीने यंत्रणा उभी करून ९९.९ टक्के शुद्ध मेडिकल ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात केली आहे.
३. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
आणखी एक ऑइल कंपनी असलेली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने देखील दिवसाला १०० टन मोफत ऑक्सिजन पुरवठा करणार असल्याचं सांगितलं आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची कमतरता बघता हे आमचं सामाजिक कर्तव्य असल्याचं या कंपनीनं सांगितलं आहे.
४. वेदांता ग्रुप
वेदांता ग्रुपने तामिळनाडूच्या तुतिकोरिनमधल्या आपल्या बंद पडलेल्या कॉपर प्लांटमधून दिवसाला १००० टन ऑक्सिजन पुरवण्याची तयार दर्शवली आहे. २०१८ मध्ये तामिळनाडूतील लोकांच्या विरोधामुळे वेदांता ग्रुपला आपला स्टेरलाईट कॉपर प्लांट बंद करावा लागला होता.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज कुमार यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीसामी यांना पत्र लिहून तामिळनाडू आणि इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.
ते पत्रात म्हणाले होते,
तुतिकोरिन इथल्या स्टेरलाईट कॉपर प्लांटमध्ये दिवसाला १ हजार टन ऑक्सिजन उत्पादन करणारे २ प्लांट आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये फी फॅक्टरी जरी बंद असली तरी तिथला ऑक्सिजन प्लँटचा उपयोग देशासाठी होऊ शकतो, आणि वेदांता ग्रुपला देखील अडचणीत असलेल्या देशाला मदत करण्यात आनंदच होईल.
त्यामुळे सरकाराने जर परवानगी दिली तर लवकरच इथून ऑक्सिजनचा पुरवठा सुरु होऊ शकले.
५. टाटा स्टील
टाटा स्टीलने देखील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिवसाला ३०० टन ऑक्सिजन राज्यांना आणि हॉस्पिटल्सना पुरवण्याची घोषणा केली आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन हा रुग्णांच्या उपचारातील एक अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो.
देशाची गरज लक्षात घेऊन आम्ही देखील या लढाईत उतरत असून, एकत्र लढू आणि एकत्र जिंकू असं टाटा स्टीलने सांगितलं आहे.
६. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड
जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडने देखील दिवसाला १०० टन ऑक्सिजन पुरवण्याची घोषणा केली आहे. ओडिशामधील अंगुल आणि छत्तीसगड मधील रायघर इथं ऑक्सिजन उत्पादनाची सुविधा उपलब्ध असून तिथून आपण ऑक्सिजन पुरवठा करणार असल्याचं सांगितलं आहे.
७. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
देशातील सर्वात मोठी स्टील कंपनी असलेली एसएआयएल या कंपनीने ट्विट करून सांगितलं आहे कि आता पर्यंत आम्ही ३३ हजार ३०० टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यशस्वी ठरलो आहोत. इथून पुढे देखील हे काम सुरु राहणार आहे.
.@SAILsteel supplied more than 33,300 Tonnes of Liquid Medical Oxygen (#LMO) of 99.7% purity of #Oxygen for #COVIDRelief from its Intergrated Steel Plants #Bokaro (#Jharkhand), #Bhilai (#Chhattisgarh), #Rourkela (#Odisha), #Durgapur and #Burnpur (#WestBengal). #Unite2FightCorona pic.twitter.com/IvyISdhIq8
— SAIL (@SAILsteel) April 17, 2021
कंपनीने आपल्या बोकारो, भिलाई, रुरकेला, दुर्गापूर आणी बुर्नापूर इथून ९९.७ टक्के शुद्ध मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केल्याचा दावा केला आहे.
८. आर्सेलर मित्तल निप्पन स्टील
आर्सेलर मित्तल निप्पल स्टीलने देखील दररोज २०० टन ऑक्सिजन गुजरात राज्याला पुरवणार असल्याची घोषणा केली आहे. हाजीरा इथल्या ऑक्सिजन प्लांटमधून आणीबाणीच्या स्थितीत ऑक्सिजन पुरवण्यासाठी हि कंपनी पुढे आली आहे.
सोबतच देशातील इतर छोट्या – मोठ्या स्टील कंपन्यांमध्ये जवळपास २८ ऑक्सिजन प्लांट आहेत, तिथून देखील १५०० टन ऑक्सिजन पुरवठा करण शक्य असल्याचं पेट्रोलियम आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं आहे. सोबतच इतर १०० अशा कंपन्या आहेत जिथं ऑक्सिजन वापरला जातो आणि तयार होतो. या सगळ्या कंपन्यांची मदत आता सरकार घेणार आहे.
हे हि वाच भिडू.
- कोरोनाच्या लढाईत सर्वात महत्वाचा ठरलेला मेडिकल ऑक्सिजन नेमका कसा तयार करतात?
- अवघ्या २५ दिवसात महाराष्ट्र लॉकडाऊनच्या स्थितीपर्यंत येवून पोहचला
- टाटांच्या सक्सेस स्टोरीची सुरवात मुंबईत नाही तर नागपूर मध्ये झाली..