कोरोना व्हायरसची लस १५ ऑगस्ट रोजी मार्केटमध्ये येवू शकते का ? 

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी १५ ऑगस्ट रोजी जगाला खुषखबर देणार. जगात पहिल्यांदा कोरोना व्हायरसची लस तयार झाल्याचं डिक्लेर करणार आणि आपण टिव्हीवर जिलेबी खात खात नव्या भारताची स्वप्न बघणार. 

हे शक्य आहे का ? 

अर्थात राजकिय पार्टीचे लोक सोडून सर्वजण अशक्य असल्याचं सांगत आहेत. आत्ता कोरोना व्हायरसची लस १५ ऑगस्ट किंवा त्या अगोदर मार्केटमध्ये येवू शकत नाही म्हणणाऱ्यांची काही नावे बघा. 

वायरोलॉजिस्ट डॉ. जेकब टी जॉन म्हणतात, उद्देश चांगला आहे पण अवास्तविक आहे. तर बायोथिक्स एक्सपर्ट डॉ. आनंग भान म्हणतात, हे होणं अशक्य आहे. फक्त कोवॅक्सिनच नाही तर कोणतिही कोरोनाची लस १५ ऑगस्टपर्यन्त मार्केटमध्ये येवू शकत नाही. दिल्लीच्या एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया म्हणातत, हे प्रचंड अवघड आहे कारण मार्केटमध्ये लस आणण्यापूर्वी आपल्याला त्यांचे परिणाम आणि सुरेक्षेचा पुर्ण अभ्यास असायला हवा, तर वायरोलॉजिस्ट चीफ एग्जीक्युटिव्ह शाहिद जमील म्हणतात, आपण गडबडीत अशी लस आणली तर जगभरातले वैज्ञानिक आपल्यावर हसतील. 

आत्ता हाय का, म्हणजे जे जे अभ्यासक आहेत ते सांगत आहेत की भारत बायोटेक ने बनवलेली कोव्हॅक्सिन असो किंवा इतर कोणतिही लस असो मार्केटमध्ये इतक्यात येवू शकत नाही. 

इतकच कशाला तर ज्या भारत बायोटेकने ही लस बनवली आहे त्याचे प्रमुख  डॉ. कृष्णा एला देखील सांगत आहेत की ही लस २०२१ पर्यन्त येणं अशक्य आहे. 

मग नेमकी भानगड काय आहे,

तर २९ जून रोजी माध्यमातून COVAXIN बद्दल माहिती मिळाली. भारत बायोटेक, ICMR आणि पुण्याच्या नॅशनल इस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने एकत्र येवून ही लस बनवली आहे. पहिल्या टप्यात करण्यात आलेल्या ॲनिमल ट्रायलमध्ये या लसीने चांगले रिपोर्ट दिले आहेत. त्यामुळे आत्ता ती मानवी परिक्षणासाठी तयार असल्याची ही माहिती देण्यात आली होती.

त्यानंतर ह्यूमन ट्रायल अर्थात मानवी परिक्षण करण्यासाठी फेज एक आणि फेज दोन साठी कोव्हॅक्सिनला परवानगी मिळाली. आत्ता एकंदरित २९ जून ते १५ ऑगस्टचे दिवस मोजले तरया ४५ दिवसात लस मार्केटमध्ये येणं अशक्य असल्याचं सांगण्यात येतं. 

मग नेमकी भानगड कुणाची आहे. 

या प्रश्नाचं उत्तर ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पत्रांमधून मिळतं. 

२९ जूनच्या बातम्यानंतर ICMR ने ज्या १२ हॉस्पीटलांना मानवी परिक्षणाची परवानगी दिली त्यांना हे पत्र देण्यात आलं. त्यामध्ये कोव्हॅक्सिनची लस १५ ऑगस्ट या संभाव्य तारखेला लॉन्च केली जाईल त्यापुर्वी दिलेली टाईमलाईन स्ट्रिक्टपणे फॉलो करण्यासंबधित निर्देश देण्यात आले. तसेच या संपुर्ण प्रोजेक्टवर प्राथमिक पातळ्यांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. 

या तारखेमुळेच सरकार १५ ऑगस्ट रोजी लस लॉन्च तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून ICMR व मोदी सरकारवरती टिका होवू लागल्यानंतर ICMR ने ४ जूलै रोजी प्रेस रिलीज काढून फिडबॅकचे स्वागत असेल पण आमच्या हेतूवर शंका उपस्थित करू नये अस सांगितलं. 

यावरून ICMR १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून घोषणा करण्याच्या दबावात असल्याची टिका करण्यात आली. 

आत्ता मुख्य मुद्दा ही लस १५ ऑगस्ट पर्यन्त मार्केटमध्ये येवू शकते का  ? 

तर नाही. फेज वन व टू च्या परिक्षणासाठीच साधारणपणे ऑगस्टचा संपुर्ण महिना लागू शकतो. त्यानंतरची फेज ३ ही तितकीच अवघड असून त्यासाठी कित्येक व्हॉलेंटियरची आवश्यकता असल्याची माहिती देण्यात येते. यावरून कोव्हॅक्सिन कितीही योग्य असले तरी ते येण्यासाठी २०२० हे संपुर्ण वर्ष जावू शकत अस तज्ञ सांगतात. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.