विस्टन चर्चिल हिंदूंचा तिरस्कार करायचा आणि मुसलमानांना चांगलं मानायचा ?

ब्रिटनचा पंतप्रधान चर्चिलबद्दल भारतीयांची मतं फारशी चांगली नाहीत. कारण चर्चिलने नेहमी भारताला स्वातंत्र्य देण्याला विरोधच केला होता. कारण भारतीय लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता नाही असं त्याला वाटत होतं.

भारतीयांचा विरोध करण्यासोबतच १९४२ मध्ये बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळामध्ये ४०-४५ लाख लोकांच्या मृत्यूचं खापर सुद्धा अनेकांनी चर्चिलच्याच माथ्यावर फोडलंय. 

चर्चिल भारतीयांचा तिरस्कार करायचा हे सगळ्यांना माहितेय, पण चर्चिल हिंदूंचा द्वेष करणारा आणि मुसलमानांना मानणारा होता.

इतिहासतज्ज्ञ पॅट्रिक फ्रेंच यांनी त्यांच्या ‘लिबर्टी ऑर डेथ इंडियन्स जर्नी टू इंडिपेन्डेन्स अँड डिव्हिजन’ या पुस्तकात याबद्दल लिहिलंय. चर्चिलने सोव्हियत युनियनचे राजदूत जीवन मिखाईल मस्की यांच्याशी बोलतांना हिंदूंना कमी लेख होतं. 

चर्चिल म्हणाला की, “इंग्रजांना भारत सोडायला पाहिजे, कारण इंग्रजांच्या नंतर भारताची सत्ता मुसलमानांच्या हाती येईल आणि ते भारताचे राजकीय प्रमुख होतील. कारण मुस्लिम हे युद्ध करणारे योद्धे आहेत तर हिंदू निव्वळ हवेवरच्या गोष्टी करणारे लोक आहेत. त्यांना केवळ व्यवस्थित भाषण करणे आणि हवेवरचे महाल बांधता येतात.”

चर्चिल जेव्हा ब्रिटिश आर्मीत काम करत होता, तेव्हा त्याने भारत-अफगाणिस्तान म्हणजेच आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरच्या स्वात घाटातील लढायांमध्ये भाग घेतला होता. त्याच युद्धात भगतसिंग तलवार हे भारतीय गुप्तहेर सुद्धा सिल्वर या नावाने काम करत होते.

या लढाईच्या दरम्यान चर्चिलने हिंदूंबद्दल जे मत मांडले होते ते भगतसिंग तलवार यांनी नोंद करून ठेवलेत.

युद्ध झाल्यानंतर चर्चिल म्हणाला होता की, 

“स्वात घाटातील पठाणांमध्ये कमालीचं साहस, लढण्याचं कौशल्य आहे, ते निशाणेबाजीत तरबेज आहेत. त्यांच्या या कौशल्यांना नाकारणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच होय. त्यांनी युद्धात निश्चित असं काही दिसत नसतांना सुद्धा वीरांप्रमाणे युद्ध केलं. स्वात घाटातले पठाण एक बहादुरांची जात आहे.”

पठाणांच्या शौर्याबद्दल यापूर्वीच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे लिहून ठेवलं होतं त्या नोंदी सुद्धा चर्चिलने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितल्या होत्या 

१८०८ मध्ये स्वात घाटात युद्ध करतांना माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन नावाच्या हुशार ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहून ठेवलं होतं. 

“पठाणांमध्ये कुतूहल आहे पण उदासीनतेमुळे ते मागे आहेत. मी भारतात असा एकही व्यक्ती पाहिलेला नाही ज्याच्यात एकही दुर्गुण नाही. जो भ्रष्टाचार किंवा लफडेबाजी करत नाही. या पठाणांपैकी कुणालाही आधुनिक शिक्षण घ्यायचं नाही किंवा सुसंस्कृत व्हायचं नाहीय. बाकी ब्रिटिश मूल्य स्वीकारण्याचा तर प्रश्नच येत नाही.”

१९१२ मध्ये प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक बिटरेस वेब आणि त्यांचे पती सिडनी वेब यांनी स्वात घाटाच्या प्रदेशाला भेट दिली होती. त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून पाहिलेल्या पठाणांमधील निरक्षरतेच्या नोंदी केल्या होत्या.

ते लिहितात, “आम्ही या भागात राहणाऱ्या रानटी पठाणांची ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेली स्तुती ऐकून खुश आहोत. काही जण म्हणतात की, पठाण हिंदूंपेक्षा चांगले आहेत. तर कोणी म्हणतो की, ते चांगले जोडीदार आहेत. पण खरं सांगायचं तर असं नाहीच. पठाण क्रूर, विश्वासघाती, गुन्हेगार आणि लफडेबाज आहेत. पठाणांमध्ये लुटपाट आणि मारकाट इतकी सामान्य गोष्ट आहे की त्याला अपराध समजलं जाऊ शकत नाही.”

त्या पुढे लिहितात की, “शेती आणि बकऱ्या सांभाळण्याची जबाबदारी महिला आणि मुलं सांभाळतात, तर पुरुष कोणतेही कामधंदे न करता गोळीबारी करत असतात. पण तरी सुद्धा ब्रिटिश अधिकारी पठाणांना पसंत करतात. कारण काय तर, पठाण ब्रिटिशांची स्तुती करतात, ब्रिटिशांना चांगलं सैनिक बनण्यासाठी मदत करतात आणि ते ब्रिटिशांसोबत कोणतीच स्पर्धा करत नाहीत म्हणून यांना ते आवडतात.”

यासोबतच चर्चिल याने आणखी एका पार्टीत हिंदूंबद्दल द्वेषपूर्ण वाक्य बोलले होते.

१९४५ मध्ये फ्रॅंकलिन रुझल्वेट, जोसेफ स्टॅलीन, जॉन कॅल्व्हिन आणि आर्थर हॅरिस यांना पार्टी दिली होती. तेव्हा त्याने हिंदूंबद्दल अपमानजनक वाक्य बोलले होते.

चर्चिल म्हणाला,”हिंदू एक चुकीची जात आहे. ते फक्त स्वतःच्या नशिबामुळे सुरक्षित आहे. त्यांचा नाश करण्यासाठी बॉम्बरने अधिकचे बॉम्ब पाठवायला पाहिजेत.”

चर्चिलने हिंदूंना कमी लेखण्यासाठी बोललेल्या वाक्यांपैकी फक्त काहींच्याच नोंदी करून ठेवण्यात आल्या आहेत. नोंदींच्या पलीकडे चर्चिल हिंदूंचा किती द्वेष करायचा याबद्दल कुणालाच पूर्ण माहिती नाही. पण एकीकडे समाजशास्त्रज्ञांनी पठाणांचे सामाजिक नियम अतिशय खालच्या दर्जाचे आहेत असं सांगत होते, तर दुसरीकडे त्याच पठाणांना बघून चर्चिल हिंदूंचा द्वेष करायचा आणि पठाणांना अतिशय शूरवीर मानायचा.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.