राजपूत राजा असूनही धर्मांतरित आदिवासींना परत हिंदू धर्मात घेणारे दिलीप सिंग ज्यूदेव कोण होते

काल सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्तीसगढच्या जशपूरमध्ये दिलीप सिंग ज्यूदेव यांच्या १२ फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. सरदार वल्लभभाई पटेल, केम्पेगौडा यांच्याप्रमाणेच ज्यूदेव यांचा पुतळा सुद्धा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनीच डिजाईन केला आहे.

दिलीप सिंह ज्यूदेव यांच्या मृत्यूच्या ९ वर्षानंतर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ज्यूदेव यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. ज्यूदेव यांच्या निधनानंतर पुढची ५ वर्ष छत्तीसगढमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र त्या काळात ज्यूदेव यांच्या पुतळ्यासाठी कोणत्याच हालचाली करण्यात आल्या नव्हत्या. 

परंतु वर्षभरानंतर २०२३ मध्ये होणाऱ्या छत्तीसगढ विधानसभांच्या निवडणुकांआधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्यूदेव यांच्या पुतळ्याचं अनावरण केलंय. यामुळे भाजप आगामी निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागला आहे असं सांगितलं जातंय.

पण ज्यांच्या पुतळ्याचं अनावरण थेट मोहन भागवत यांनी केलंय ते दिलीप सिंग ज्यूदेव होते तरी कोण?

तर दिलीप सिंग ज्यूदेव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी कल्याण आश्रमाचे स्वयंसेवक होते. सोबतच ते छत्तीसगढ राज्यातले भाजपचे मोठे नेते होते. मात्र त्यांना सगळ्यात जास्त ओळखलं जातं ते त्यांच्या घरवापसी मोहिमेमुळे.

घरवापसी म्हणजेच सोप्या शब्दात हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्या लोकांना परत हिंदू बनवणे होय. दिलीप सिंग ज्यूदेव यांनी हीच घरवापसी मोहीम छत्तीसगडाच्या धर्मांतरित आदिवासींसाठी राबवली होती. त्यामुळे त्यांना छत्तीसगढमधील घरवापसी मोहिमेचे नेते मानतात. छत्तीसगढमध्ये भाजपचं पाय रोवण्याचं श्रेय सुद्धा ज्यूदेव यांना दिलं जातं. 

मात्र आदिवासींसाठी काम करणाऱ्या ज्यूदेव यांचा जन्म हा सामान्य कुटुंबात किंवा आदिवासी जमातीत झाला नव्हता.

तर ज्यूदेव हे छत्तीसगढच्या जशपूर रियासतीचे राजकुमार होते. जशपूरचे शेवटचे शासक राजा विजय भूषण सिंह देव यांच्या पोटी १९४९ मध्ये दिलीप सिंग ज्यूदेव यांचा जन्म झाला होता. राजपूत कुटुंबात जन्मलेल्या राजकुमार ज्यूदेव यांचं सुरुवातीचं शिक्षण ख्रिश्चन धर्मीय मिशनरी स्कूल मध्ये झालं होतं. 

हिंदुत्ववादी विचार असलेल्या ज्यूदेव यांनी आरएसएस मध्ये वनवासी कल्याण आश्रमासाठी स्वयंसेवक म्हणून काम सुरु केलं. सक्रिय समाजसेवा करतांना १९८९ मध्ये त्यांनी जंजगीर लोक सभा सीटवरून निवडणूक लढवली आणि लोकसभेवर निवडून गेले. मात्र राजकीय अस्थिरतेमुळे अवघ्या दोन वर्षात परत लोकसभा निवडणूक घेण्यात आल्या. १९९२ च्या लोकसभा निवडणुकीत ज्यूदेव यांना स्वतःची सीट राखता आली नाही.

परंतु लोकसभा जरी जिंकता आली नसली तरी ज्यूदेव यांचा मध्य प्रदेशात राजकीय प्रभाव असल्यामुळे त्यांना १९९२ ते २००९ अशी सलग १८ वर्ष राज्यसभेवरून खासदारकी देण्यात आली होती. 

यादरम्यान वाजपेयी सरकारच्या काळात जानेवारी २००३ मध्ये त्यांना केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री पद मिळालं होतं. 

ज्यूदेव यांच्याकडे मंत्रिपद असतांना परदेशातील एक कंपनीला छत्तीसगढ राज्यात खाणीचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात येणार होता. त्या काँट्रॅक्टमध्ये ज्यूदेव हे लाच घेत असल्याचा व्हिडीओ समोर आता होता.  माध्यमांनी हा व्हिडीओ समोर आणून ज्यूदेव यांचा घोटाळा उघडकीस आणला होता. या घोटाळ्यात त्यांचे नाव आल्यामुळे नोव्हेंबर २००३ मध्ये ज्यूदेव यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र राजीनाम्यानंतर सुद्धा त्यांच राज्यसभेच सदस्यत्व कायम होतं.

२००९ मध्ये ते छत्तीसगढच्या बिलासपूर मतदार संघातून लोकसभेवर निवडून आले, पण हा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

ज्यूदेव भाजप पक्षासोबतच आरएसएसच्या आदिवासी कल्याण आश्रमाचे सक्रिय स्वयंसेवक होते.

यामाध्यमातून ते छत्तीसगढमध्ये मिशनऱ्यांच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या आदिवासींना परत हिंदू धर्मात आणायचे. ते आदिवासी पाड्यांवर जाऊन आदिवासींचे पाय स्वतःच्या हाताने धुवायचे. त्यानंतर धार्मिक विधी करून परत त्यांना हिंदू बनवायचे. यामध्ये भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी रस दाखवला नाही पण टीका सुद्धा केली नाही असं सांगितलं जातं.

या घरवापसी मोहीमेबद्दल ज्यूदेव यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सांगितलं होतं. 

ते म्हणाले होते की, “मी खूप प्रवास करतो. विविध देशांमधील ख्रिश्चन मिशनर्‍यांनी आखलेले डावपेच मला चांगले माहीत आहेत. हे निव्वळ धर्मांतर नाही तर यामुळे देशाचं चरित्र बदलेल. क्रॉस हिंदू मंदिरांजवळ आला आहे. पण व्हॅटिकन सिटीमध्ये कुठेही हनुमानाचं मंदिर बांधता येऊ शकत नाही. मी ख्रिश्चनांच्या विरोधात नाही, फक्त धर्मांतराच्या विरोधात आहे.”

ज्यूदेव यांचा सरगुजा-बिलासपूर पट्ट्यात त्यांचा प्रभाव होता. या दोन भागांमध्ये आदिवासींसाठी राखीव असलेल्या १४ विधानसभा सीट आहेत. २० सीट खुल्या प्रवर्गातील आहेत तर ५ जागा दलितांसाठी राखीव आहेत. ९१ सीट असलेल्या छत्तीसगढ विधानसभेमध्ये हा आकडा फार मोठा आहे असं विश्लेषक सांगतात.

२००३ मध्ये झालेल्या छत्तीसगढ विधानसभा निवडणुकांमध्ये ज्यूदेव हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते.

अपेक्षेप्रमाणे छत्तीसगढमध्ये भाजपला बहुमत सुद्धा मिळालं होतं, पण खाण घोटाळा उघड झाल्यामुळे त्यांच केंद्रीय मंत्रिपद सुद्धा गेलं. सोबतच मुख्यमंत्रीपदावरची दावेदारी सुद्धा त्यांच्या हातातून गेली. तर त्यांच्याऐवजी राजपूत जातीतलेच रमण सिंग छत्तीसगढचे मुख्यमंत्री झाले.

२००३ पासून २०१८ पर्यंत छत्तीसगढमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. परंतु २०११८ च्या निवडणुकीत मोदींचा प्रभाव असतांना सुद्धा छत्तीसगढमध्ये भाजपला परत सत्ता आणता आली नाही. २००३ मध्ये भाजपला ५० जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या होत्या. २००९ मध्ये सुद्धा फक्त  काँग्रेसची एक जागा वाढली होती, बाकी आकडेवारी जशीच्या तशी होती.

२०१३ च्या निवडणुकीत सुद्धा भाजपची एक जागा कमी झाली आणि काँग्रेसची एक जागा वाढली होती. पण २०१६ मध्ये काँग्रेसचे नेते अजित जोगी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. त्यामुळे काँग्रेसचे नेते म्हणून भूपेश बघेल समोर आले.

काँग्रेसने बदललेला चेहरा आणि भूपेश बघेल यांचं ओबीसी समीकरण यामुळे काँग्रेसने छत्तीसगढमध्ये दमदार कमबॅक केलं.

भूपेश बघेल यांची राजकारणात स्वछ प्रतिमा आहे. त्यातच त्यांनी ओबीसीमध्ये प्रमुख असलेल्या कुर्मी-तेली या जातींचं समीकरण बांधलं होतं.  त्यामुळेच २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसने ६८ जागा जिंकल्या तर भाजपच्या हातात फक्त १५ च जागा लागल्या होत्या. १५ वर्ष सत्ता असलेल्या भाजपला इतक्या दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे भाजप परत कमबॅक साठी तयारीला लागलेली आहे असं सांगितलं जातं.

यासाठीच बिलासपूर-सरगुजा भागातील ४९ जागांसाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी भाजपकडून ज्यूदेव यांचा पुतळा उभारण्यात आला असावा असं सांगितलं जातं. कारण या भागात अनेक जण ज्यूदेव यांचा फार सन्मान करतात. अनेक जण नमस्कार ऐवजी जय ज्यूदेव म्हणतात. त्यामुळे या जागांना परत मिळवण्यासाठी भाजप तयारीला लागलीय असं विश्लेषक सांगतात. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.