छत्तीसगढी अस्मितेला पुढे आणण्यामध्ये वर्ध्यातल्या या व्यक्तीचं योगदान होतं.

महाराष्ट्र कर्नाटक असो की महाराष्ट्र गुजरात. राज्याचे हे दोन्ही सीमाभाग कायम भाषिक अस्मितेच्या नावाखाली धगधतेच आहेत. कर्नाटकातील सीमाप्रश्न भिजत पडलाय तर मुंबईत गुजराती भाषिकांचा प्रश्न आहे. 

पण या सगळ्या भाषिक वादांमध्ये महाराष्ट्राच्या शेजारी एक असं सुद्धा राज्य आहे ज्याची भाषिक अस्मिता ही एका महाराष्ट्रीयन माणसाने निर्माण केलीय.  

अरपा पैरी के धार, महानदी हैं अपार, इंद्रावती ह पखारे तोर पईया…

महूँ पावें परों तोर भुईयां, जय हो जय हो छत्तीसगढ मइया…. 

हे गाणं महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या छत्तीसगढ राज्याचं राज्यगीत आहे. छत्तीसगढमध्ये दररोज सरकारी शाळा, महाविद्यालयामध्ये राष्ट्रगीताबरोबर हे गाणं गायलं जातं. पण हे गाणं जरी छत्तीसगढ मध्ये गायलं जात असलं तरी या गीताचे गीतकार डॉ. नरेंद्र देव वर्मा हे महाराष्ट्रीयन होते. 

डॉ. नरेंद्र देव वर्मा यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात असलेल्या सेवाग्राम आश्रमात झाला होता.

दांडी यात्रेच्या करावासातून मुक्त झाल्यानंतर महात्मा गांधींनी नागपूरजवळ वर्ध्याला सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली. तत्कालीन मध्य प्रांतात असलेल्या या आश्रमात राज्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक सेवा देत होते. त्यातच धनीराम वर्मा नावाचे शिक्षक आश्रमात दाखल झाले. 

सेवाग्राममध्ये शिक्षकाची नोकरी करणाऱ्या धनीराम वर्मा यांना ५ अपत्य झाली. यात पहिले तुलेंद्र, नरेंद्र, देवेंद्र, राजेंद्र आणि शेवटचे ओमप्रकाश. धनीराम जरी गांधीवादी असले तरी त्यांचा मोठा मुलगा तुलेंद्र मात्र स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर सिश्वास ठेवत होता. स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या तुलेंद्र याने सन्यास घेतला आणि स्वामीविवेकानंदांनी सुरु केलेल्या रामकृष्ण मिशनमध्ये स्वतःला झोकून दिलं. 

Narendra Dev Verma Family

तुलेंद्रने सन्यास घेतल्यामुळे बाकी ४ मुलं सुद्धा मोठ्या भावाच्या प्रभावाने संन्यास घेऊ नयेत, यासाठी  धनीरामांनी नरेंद्र आणि राजेंद्र या दोघांचा अल्पवयातच विवाह ठरवून टाकला. 

सुरुवातीला दोघेही लग्नासाठी तयार झाले मात्र अचानक राजेंद्र यांनी लग्नाच्या वरातीतून काढता पाय घेतला आणि मोठ्या भावाकडे जाऊन संन्यासाची दीक्षा घेतली. तर नरेंद्र यांनी लग्न करून वैवाहिक जीवन सुरु केलं. लग्नानंतर सुद्धा नरेंद्र वर्मांनी स्वतःचं शिक्षण सुरूच ठेवलं. १९६६ मध्ये त्यांनी मध्य प्रदेशाच्या सागर विद्यापीठातून प्रयोगशील काव्य आणि साहित्यावर चिंतन या विषयात पीएचडी पूर्ण केली. 

सागर विद्यापीठात शिक्षण घेतांना नरेंद्र वर्मांच्या वक्तृत्वाने पंडित जवाहरलाल नेहरु सुद्धा प्रभावित झाले होते. 

झालं असं की, १९६१ मध्ये राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर इंटर युनिव्हर्सिटी युथ फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं. या फेस्टिवलचाच भाग म्हणून एक वादविवाद स्पर्धा घेण्यात आली होती. 

स्पर्धेचा विषय होता – शक्तिशाली अण्वस्त्रांनी जागतिक शांतता प्रस्थापित करणे शक्य आहे का? 

यावर विषयावर बोलण्यासाठी बनारस हिंदू विद्यापीठाचे डॉ. विष्णू प्रसाद पांडे हे तागडे व्याख्याते तिथे आले होते. तर सागर विद्यापीठातून नरेंद्र वर्मा यांची निवड करण्यात आली होती. विष्णूप्रसाद पांडे यांनी अण्वस्त्रांचा विरोध केला तर नरेंद्र वर्मा यांनी अण्वस्त्रांची गरज लक्षात आणून दिली. शेवटी काट्याची टक्कर झालेल्या या वादविवादात नरेंद्र वर्मा यांनी बाजी मारली. 

स्पर्धेत विजयी झालेले २२ वर्षाचे नरेंद्र वर्मा यांची जेव्हा पंडित नेहरूंशी भेट झाली. तेव्हा स्वतः पंडित नेहरू सुद्धा नरेंद्र वर्मा यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते.  

Narendra Dev Verma With Neh

पीएचडी पूर्ण झाल्यानंतर रायपूरमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या नरेंद्र वर्मा यांनी लेखन करण्याला सुरुवात केली.

रायपूरमध्ये नोकरी करतांनाच त्यांच्या मनात छत्तीसगढी भाषेबद्दल आकर्षण निर्माण झालं. त्यांनी स्वतःच्या हिंदी लेखनाबरोबरच छत्तीसगडी भाषेमध्ये सुद्धा लेखन करण्याला सुरुवात केली. त्यांची ‘सुबह की तलाश’ नावाची कादंबरी आणि ‘अपूर्व’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या या कादंबरीमधूनच छत्तीसगढच्या अस्मितेची बीजं रोवली गेली होती.

सुबह की तलाश या कादंबरीचं जेव्हा छत्तीसगडी भाषेत अनुवाद करण्यात आलं तेव्हा या कादंबरीने छत्तीसगढचं संपूर्ण रंगमंच आपल्या ताब्यात घेतलं.  

सुबह की तलाश छत्तीसगढीत ‘सोनहा बिहान’ या नावाने अनुवादित झाल्यानंतर, छत्तीसगढी लोकनाट्याचे पितामह दाऊ महासिंग चंद्राकार यांनी ‘सोनहा बिहान’ नावाची कंपनी स्थापन केली आणि गावोगावी या कादंबरीच्या नाटकाचे प्रयोग केले. छत्तीसगढच्या लोकजीवनावर आधारलेलं हे नाटक लवकरच नावाजलं गेलं.

त्यातूनच नरेंद्र वर्मा यांना छत्तीसगढी भाषेवर संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. १९७३ साली त्यांनी पंडित रविशंकर शुक्ल विद्यापीठातून ‘छत्तीसगडी भाषेचा उदय आणि विकास’ या विषयावर प्रबंध लिहिला. या प्रबंधासाठी त्यांना दुसऱ्यांदा पीएचडी बहाल करण्यात आली.

छत्तीसगढी भाषेचा पुन्हा एकदा जागृत करणाऱ्या नरेंद्र वर्मांनी छत्तीसगढचं वर्णन करणाऱ्या अनेक कविता लिहिल्या. त्या कविता ‘छत्तीसगढ महिमा’ या कवितासंग्रहातून प्रकाशित झाल्या. “अरपा पैरी के धार” ही याच कवितांपैकीच एक कविता आहे.. 

नरेंद्र वर्मा यांनी स्वतःच्या प्रबंधातून छत्तीसगढच्या अस्मितेला पुन्हा एकदा गौरवाची सुवर्णकिनार दिली.

संपूर्ण भारतात आदिवासी आणि मागासलेली संस्कृती म्हणून हिनवली जाणारी छत्तीसगडी संस्कृती किती वैविध्यपूर्ण आणि उत्तम आहे याबद्दल नरेंद्र वर्मा यांनी लेखन केलं. सोबतच हिंदी भाषेचा पगडा झुगारून लावत छत्तीसगढी ही स्वतंत्र भाषा आहे याची जाणीव सुद्धा त्यांनी छत्तीसगढी लोकांना करून दिली. त्यांच्या लेखनामुळेच आज छत्तीसगढी भाषेला स्वतंत्र भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जातेय.

छत्तीसगढ आणि छत्तीसगडी भाषा हे पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत पण नरेंद्र वर्मांच्या लेखनामुळे स्वतंत्र छत्तीसगढ राज्याच्या मागणीला उभारी आली. राज्याच्या निर्मितीनंतर छत्तीसगढची सांस्कृतिक वाटचाल करण्यात सुद्धा नरेंद्र वर्मा यांच्या लेखनाला महत्वाचा दस्तऐवज मानलं जातं. याचीच जाणीव ठेऊन ३ नोव्हेंबर २०१९ रोजी छत्तीसगढ सरकारने ‘अरपा पैरी के धार’ या गीताला राज्यगीत घोषित केलं. महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात जन्मलेल्या नरेंद्र वर्मा यांनी छत्तीसगढ राज्याला स्वतःची अस्मिता पुन्हा अभिमानाने सांगण्यासाठी मदत केली.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.