जेवणात जशी मिठाला किंमत आहे तशीच जादू विजू खोटेंच्या रोलची आहे.

असं म्हणतात की शोलेसारखा सिनेमा परत होणार नाही. त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर आता इतिहास बनून गेलंय. सगळ्यात मोठा झाला तो व्हिलन गब्बरसिंग आणि त्याचा तो डायलॉग,

” कितने आदमी थे?”

हा डायलॉग तो ज्याला मारतो तो थरथर कापणारा कालिया म्हणजे विजू खोटे. आयुष्यात कधी हिरोचा रोल केला नाही पण तीन चार असे रोल केले की लोक त्यांना कधीच विसरू शकणार नाहीत. 

विजू खोटेंचे वडील नंदू खोटे हे सुद्धा अॅक्टिंग क्षेत्रातले. त्यांनी काही सिनेमात काम केलं होतं. नाटकात काम करत होते. तिथे त्याचं चांगल नाव होतं. विजू खोटेंची काकू म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतील पहिल्या पिढीची हिरोईन दुर्गा खोटे. मोठी बहिण शुभा खोटे हिंदी सिनेमातली ओळखीचा चेहरा. विजू खोटे शाळेत हुशार होते. त्यांना फिल्ममध्ये येऊ द्यायचं नाही असं घरच्यांनी ठरवलेलं. त्यांना एक प्रिंटींग प्रेस सुरु करून दिली होती.

पण अॅक्टिंग त्यांच्या रक्तातून वाहात होतं. वडिलांच्या एका सिनेमात छोटा रोल करता करता करता विजू खोटेनी देखील सिनेमातच एंट्री केली. मिळतील ते छोटे मोठे रोल विजुजी करत होते.त्यांना जाणवलं की हेच आपल आयुष्य आहे. कधीही त्यांचा स्ट्रगल थाबला नाही.

सिनेमाबरोबर नाटकंसुद्धा  केली. त्यातच अमजद खान बरोबर त्यांची मैत्री झाली. विजू एका नाटकात अमजदच्या वडिलांचा रोल करत होते. तोंडाला काळं फासून निग्रो फॅमिलीचा रोल त्यांनी केला होता. याच नाटकात सलीम खाननी पाहिल्यामुळे अमजदला शोलेमध्ये गब्बरसिंगचा रोल मिळाला. खर तर कालियाचा रोल एक स्टंट करणारा ज्युनियर करणार होता. शुटींगसुद्धा झालेल पण तो सीन जमला नव्हता. अखेर अमजद खानने रमेश सिप्पीना सांगितलं की,

“विजूला बोलवा, तो हा सीन चांगला केलं. “

खरतर एका सीनसाठी मुंबईहून कलाकार मागवण सिप्पीना परवडणार नव्हत. आधीच सिनेमाच बजेट वाढल होतं. पण तरी अमजद खान म्हणतोय म्हणून विजुजींना जी.पी.सिप्पींच्या ऑफिसमधून ऑडिशनसाठी बोलवण्यात आल.

त्याला माहित होतं की सीता और गीता बनवणारे रमेश सिप्पी बेंगलोरमध्ये शोले नावाचा नवीन सिनेमा बनवत आहेत. अमजद त्यात व्हिलनचा रोल करतोय. ऑफिसमध्ये आत जाताना त्यांना अमजद खान भेटला तो विजू खोटेना फक्त एकच वाक्य म्हणाला,

“अच्छा रोल है. हां बोल देना.”

विजू खोटेनी तो सल्ला मानला. रोल काय आहे किती आहे याची काळजी न करता त्यांनी हो म्हणून सांगितलं. नंतर कळाल अमजद खान गब्बरसिंगच्या मुख्य व्हिलनच्या रोल मध्ये आहेच पण हिरो तीन आहेत, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि संजीव कुमार. गब्बरसिंगच्या गँगमधल्या एका डाकुचा छोटासा रोल विजू खोटेना मिळालाय.

सिनेमाच शुटींग सुरु होतं तेव्हाच लक्षात आलेल की एका अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्टचा आपण भाग झालो आहोत. पण हा सिनेमा सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे हे कोणाला ठाऊक नव्हत. विजू खोटेंच आयुष्य त्या एका डायलॉगने बदलणार होतं. 

कितने आदमी थे म्हणताना जो जोश गब्बरच्या थंड खुनशीपणात आहे तीच ताकद कालियाच्या डोळ्यासमोर मृत्यू दिसत असल्यामुळे घामेघूम झालेल्या अभिनयात आहे. मोठ्या पडद्यावर हे बघताना आपल्या अंगावर काटा उभा राहतो. यामागे अमजद आणि विजूजींची केमिस्ट्री म्हणायचं की आणखी काही माहित नाही. जर तो धिप्पाड कालिया त्या डायलॉगला थरथरला नसता तर गब्बरचा डायलॉग अगदीच मिळमिळीत वाटला असता.

अमजदच्या डायलॉगने शोलेला ओळख मिळवून दिली. रमेश सिप्पीना देखील फक्त एवढ्या छोट्या रोल साठी एक तयारीचा अभिनेता खास मुंबईवरून बेंगलोरला बोलवला याच वाईट वाटल नाही.

मराठी अभिनेते हिंदीमध्ये यशस्वी होऊ शकत नाही ही समजूत विजूजीनी खोटी ठरवली. याच क्रेडीट ते आपल्या बायकोला निम्मीला द्यायचे. तिच्यामुळे माझ हिंदी उच्चार सुधारले असं त्याचं म्हणन होतं. वरून ते स्वतः म्हणायचे की

“मी खूप मोठा अभिनेता नाही पण दिग्दर्शकाने दिलेले काम मी एन्जॉय करत केलं, मेहनत केली , जीव ओतला म्हणून माझे रोल गाजले.”

त्यांचा सच्चेपणा त्यांच्या रोलबरोबर त्यांच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा डोकावयाचा.

एखाद्या पहिलवानाप्रमाणे तगडी तब्येत, ताडमाड उंची यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाच एक वेगळच वजन पडायचं. मग व्हिलनचा रोल असो किंवा कॉमेडी, हिंदी असो की मराठी विजुंचा स्पेशल टच दिसून यायचा. त्यांची खास शैलीतली डायलॉग डिलिव्हरी यातून त्यांनी जे स्थान मिळवल ते हिरोचा रोल करणाऱ्यानां मिळत नाही.

शोले मध्ये घड्याळ लावून मोजून बघितल तर त्यांची भूमिका सात मिनिटाच्या वर नाही. पण पट्टीच्या अॅक्टर्सना फक्त काही सेकंदाचा चान्स जरी मिळाला तरी ते त्याच सोनं करतात. विजू खोटेंनी तसच केलं. 

आणि एकदा नाही तर बऱ्याचदा करून दाखवलं.

अंदाज अपना अपना मधला गलतीसे मिस्टेक करणारा रॉबर्ट असू दे नाही तर अशी ही बनवा बनवी मध्ये लक्ष्याला सारखं सारखं त्याच झाडावर नेणारा खलनायक बल्ली, आयत्या घरात घरोबा मधले गोपाळराव किर्तीकर किंवा आता परवा आलेल्या व्हेन्टीलेटरमधील शिरीष अप्पा. विजू खोटेंच्या शिवाय या सिनेमांचा विचार देखील करू शकत नाही.

विजू खोटेंनी ज्या सिनेमात काम केल त्या सिनेमांनी इतिहास घडवला.

अगदी छोटे छोटे असे म्हणत येतील असे हे रोल पण जेवणात जशी मिठाला किंमत आहे तशीच किंमत विजू खोटेंच्या रोलला आहे. ते जर त्या रोल मध्ये नसतील तर अख्खा सिनेमा अळणी वाटेल.

गेले काही दिवस त्यांचं पडद्यावर दर्शन दुर्लभ झालं होतं. काही दिवसापूर्वी आलेल्या अतिथी कब जाओगे मध्ये त्यांच्या कालियावर एक अख्खा सीन लिहिललाय. परेश रावल आणि त्यांचा हा सीन जुन्या आठवणी तर जागवतोच पण कॉमेडी बरोबर नकळत डोळ्यात अश्रू देखील उभे करतो.

विजू खोटेंचे रोल विसरावे म्हटल तरी विसरत नाहीत. आजही चूक झाल्यावर बॉसपुढे खाली मान घातल्यावर “हमने आपका नमक खाया है सरकार” हा डायलॉग तोंडात येतो. जीभ चावून “गलती से मिस्टेक” आठवते, बहिणीने खोडी काढल्यावर “तुला बघून घेईन  भवाने” म्हणावस वाटत यातच विजू खोटेंच यश सामावलेलं आहे. 

आज सकाळी बातमी आली की त्यांचा मृत्यू झाला. खरच वाटल नाही. फक्त नावापुरता खोटेपणा असलेले विजू खोटे खरंच सगळ्यांना सोडून निघून गेले होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.