जसं हिंदूंसाठी काशीचं महत्व तसंच जैन धर्मीयांसाठी श्री सम्मेद शिखरजी महत्वाचं आहे

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील अनेक शहरांमध्ये जैनधर्मीय लोकांनी आंदोलन सुरु केलं आहे. जैन व्यापाऱ्यांकडून वेगवगेळ्या शहरातील व्यापारी पेठा बंद ठेऊन, हातावर पांढऱ्या पट्ट्या बांधून झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध केला जात आहे. पुण्यातील जैन व्यापाऱ्यांनी देखील काल दुकानं बंद ठेऊन झारखंड सरकारने स्वतःचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर जैन धर्मीय लोक विरोध करत आहेत असा कोणता निर्णय घेतला झारखंड सरकारने घेतलाय ?

तर जैन धर्मियांचं सर्वात पवित्र तीर्थस्थान श्री सम्मेद शिखरजी हे झारखंड राज्याच्या पारसनाथ हिल्स अभयारण्यात आहे. झारखंड सरकारने त्याच अभयारण्याच्या काही भागाला इको ट्यूरिज्म घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये झारखंड सरकारने केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे.

राज्यात पर्यटन वाढवण्यासाठी झारखंड सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र देशभरातील जैन समुदाय हा निर्णय रद्द करण्याची मागणी करत आहे.

जैन धर्मियांचं म्हणणं आहे की, जर पारसनाथ हिल्सला पर्यटन क्षेत्र घोषित केल्यास त्या ठिकाणी येणारे पर्यटक मांसाहार आणि मद्यपान करतील. यामुळे श्री सम्मेद शिखरजीचं पावित्र्य नष्ट होईल, यामुळे अहिंसक जैन धर्मीय लोकांच्या श्रद्धेला आणि उपासनेला धक्का बसेल. त्यामुळे पारसनाथ हिल्सला पर्यटन स्थळ घोषित करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा.

पारसनाथ हिल्स तब्बल १२ हजार ५०० एकरवर पसरलेलं आहे, तरी देखील याच्या एका भागात इको पर्यटन सुरु करण्याला जैन धर्मीय विरोध करत आहेत. याचं कारण आहे या पारसनाथ हिल्सवर असलेलं श्री सम्मेद शिखरजी या जैन धर्मियांच्या सगळ्यात पवित्र तीर्थस्थळाचं महत्व. जसं हिंदूंसाठी काशी, मथुरा, अयोध्या ही तीर्थस्थळं महत्वाची आहेत त्याचप्रमाणे जैन धर्मीयांसाठी श्री सम्मेद शिखरजी महत्वाचं आहे. 

श्री सम्मेद शिखरजीचं महत्व सुरु होतं जैन धर्माच्या स्थापनेपासून…

जैन धर्माचे संस्थापक ऋषभ देव यांच्यानंतर अजितनाथजी हे जय धर्माचे तीर्थंकर झाले. त्यांनी दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी श्री सम्मेद शिखरजीवर तपस्या केली. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि शेवटी याच शिखरावर त्यांना मोक्ष प्राप्त झालं.

अजितनाथ जी यांच्यासह एकूण २० तीर्थंकरांनी याच सम्मेद शिखरावर दिव्य ज्ञानाची प्राप्ती करून मोक्ष प्राप्त केला. याला अपवाद फक्त जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव, १२ वे तीर्थंकर वासुपूज्य जी, २२ वे तीर्थंकर अरिष्ठनेमीजी आणि २४ वे तीर्थंकर वर्धमान महावीर या चार तीर्थंकरांचा अपवाद वगळला तर सर्व तीर्थंकरांनी श्री सम्मेद शिखरजीवर मोक्ष प्राप्त केलं आहे. यात २३ वे तीर्थंकर पारसनाथ यांचा देखील समावेश आहे.

जैन धर्मातील आख्यायिकांनुसार श्री सम्मेद शिखराचं महत्व फार मोठं आहे. 

जैन वाङ्मयानुसार जगाच्या निर्मितीनंतर  सर्वात आधी दोन ठिकाण अस्तित्वात आले होते त्यात पहिलं ठिकाण म्हणजे श्री सम्मेद शिखरजी आणि दुसरं ठिकाण म्हणजे अयोध्या. श्री सम्मेद शिखरजीची यात्रा केल्यास माणसाला पशु योनी प्राप्त होतं नाही. पुढची ४९ जन्म माणूस सांसारिक कर्मबंधनांच्या फेऱ्यापासून मुक्त राहतो असं सांगितलं जातं. 

जैन तीर्थंकरांसोबत अनेक जैन मुनींनी याच ठिकाणी दिव्य ज्ञान प्राप्त केलं आणि मोक्ष प्राप्त केलं. त्यामुळे या ठिकाणी २० तीर्थंकरांची मंदिरं बांधण्यात आलेली आहेत. त्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने जैन धर्मीय व्यक्ती श्री सम्मेद शिखरजीला भेट देतात आणि या शिखराच्या सभोवताल २७ किमी लांब प्रदक्षिणा करतात. 

जैन धर्मियांची मान्यता आहे की, तीर्थंकरांच्या प्रभावामुळे वाघ, अस्वल यांसारख्या हिंस्त्र पशूंचा व्यवहार श्री सम्मेद शिखरजीवर शांत होतो. यामुळे या ठिकाणचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. 

जैन समाज हा भारतातील प्रमुख व्यापारी समाजांपैकी एक आहे. व्यापारासोबतच राजकारण आणि समाजकारण क्षेत्रात देखील जैन धर्मियांचा प्रभाव आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील जैन धर्मियच आहेत. 

जैन धर्मीय लोक काटेकोरपणे शाकाहाराचे नियम पाळतात. यासाठी पर्यषुन काळात वेगवगेळ्या शहरांमध्ये मांसाहाराची दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली जाते. अगदी घरासमोर मांसाहाराच्या जाहिराती असल्यावर देखील जैन धर्मीय लोक त्याला कोर्टात आव्हान देत असल्याचे दिसते. परंतु आता थेट जैन धर्मियांच्या सर्वात पवित्र तीर्थस्थळाजवळच मांसाहार आणि मद्यपान होण्याची शक्यता असल्यामुळे जैन समाजाकडून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.