केइएम हॉस्पिटल मोठं करणाऱ्या डॉ. बानुबाई कोयाजींना पुणेकर कधीच विसरू शकणार नाहीत…

भारतात ओरिजिनल समाजसेवक हे पाय जमिनीवर ठेवून शांतपणे आपलं काम करत असतात. आपल्या कामातूनच ते जगभरात प्रसिद्ध होतात ना कुठला स्टंट करता. समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून ते अहोरात्र झटत राहतात. आजचा किस्सा अशाच एका व्यक्तीचा आहे ज्यांच्यामुळे भारताच्या पदरात रेमन मॅगसेसे पुरस्कार पडला आणि जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली होती.

७ सप्टेंबर १९१७ रोजी मुंबईमध्ये बानू कोयाजी यांचा जन्म झाला. पुढे याच बानू कोयाजी पुढे पदमभूषण डॉ. बानुबाई कोयाजी म्हणून प्रसिद्धीस आल्या. बानुबाई यांचे वडील पेस्तनजी कापडिया हे एम.डी. होते. १९४६ मध्ये बानुबाई मुंबईच्या नावाजलेल्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम.डी. झाल्या. पुढची काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केलं. 

बानुबाई कोयाजी या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्राच्या तज्ञ् होत्या. शिकवत बसत राहण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष रुग्णांची सेवा करायला आवडायचं. बानुबाई या कायम सकारात्मक आणि उच्च विचार करणाऱ्या प्रवृत्तीच्या होत्या. बानू कोयाजी यांचे लग्न जहांगीर कोयाजी यांच्याशी झाले. त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी हे गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत.

त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी यांचं काम बघून बानुबाईंना एक कळून चुकलं होतं कि

वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्त्वाचे आहे.

आपल्या समाजात स्त्रियांचे प्रश्न महत्वाचे आहेत. भारतीय समाजाला स्त्रीतज्ञ आणि प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ  आहे, हे ध्येय त्यांनी आपल्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ केला.

पहिल्या सहा महिन्यांसाठी बानुबाई फक्त काय काम चालत हे बघण्यासाठी पुण्याच्या के इ एम रुग्णालयात आल्या आणि कायमच्याच के इ एमच्या झाल्या.  पुण्यातील के.ई.एम. म्हणजे डॉ.बानू कोयाजी असे समीकरणच तयार झाले.

१९४० मध्ये केवळ ४० खाटा असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी १९९९ मध्ये ५५० खाटा टप्प्याटप्प्याने वाढवीत नेले. के.इ.एम हॉस्पिटलसोबत त्या ५५ वर्षे कार्यरत होत्या.

बानुबाईंनी आपलं काम फक्त के. इ. एम पुरतं मर्यादित ठेवलं नाही तर त्याचं स्वरूप मोठं करून त्या सगळ्या क्षेत्रात काम करत राहिल्या. आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यातील समस्या याविषयी त्यांना अचूक भान होते. सन १९७८ पासून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली.

डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम प्रतिकूल परिस्थितीत केले. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला. ६०० हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. कुटुंबनियोजनाचा प्रसार केला. तब्बल ३०० गावांमध्ये त्यांनी  कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण भागातल्या स्त्रियांना रोजगार मिळेल यासाठी सुद्धा त्यांनी काम केलं. 

डाॅ. बानू कोयाजी यांनी स्त्रियांसाठी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेची स्थापना केली. याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या. अनेक कामांमध्ये डॉ.बानूबाई पटाईत होत्या.

त्यांनी त्यांच्या कामाव्यतिरिक्त एक महत्वाचं आणि वेगळं काम केलं होतं. सकाळ वृत्तपत्र समूहात त्यांनी केलेले काम. ‘सकाळ’ चे संपादक डॉ. ना.भि. परुळेकर यांच्या विनंतीवरून डॉ. कोयाजी १९५५ पासून ‘सकाळ’ च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी ‘सकाळ’च्या संचालक झाल्या. ‘सकाळ’ चे इंडिया फाऊंडेशनसारखे सर्व उपक्रम व सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बानूबाईंनी डॉ. परुळेकरांनंतर चालू ठेवले.

आपल्या कामामुळे त्या भारताच्या स्वास्थ्य सल्लागार समितीच्या सदस्य होत्या. जागतिक पातळीवर मॅगसेसे अवॉर्डमुळे प्रसिद्ध होत्या. त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पदमभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. के इ एम म्हणजे बानू कोयाजी हे सेगमेंट अगदी फिट्ट झालं होतं.

१५ जुलै २००४ ला डॉ.बानुबाई कोयाजी यांचं  निधन झालं पण आपल्या कामामुळे त्यांनी भारताला जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख दिली. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.