बाळासाहेब ठाकरेंचं एक स्वप्न आज एकनाथ शिंदेंच्या रूपात पूर्ण झालं…

राज्यात विधान परिषद निवडणूकांनंतर रंगलेल्या सत्तानाट्याला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पूर्णविराम मिळेल असं वाटत होतं. मात्र राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली.

अनेकांनी फडणवीस नवे मुख्यमंत्री असतील, असं अंदाज व्यक्त केला होता; मात्र तो साफ चुकीचा ठरवत भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांनाच धक्का दिला. या एका निर्णयामुळं राज्यातली राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे.

पण या सगळ्यात एक गोष्ट झाली आहे, ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झालं आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेलं वचनही.

२०१९ च्या निवडणूकीनंतर अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युलावर भाजप आणि सेनेचं एकमत झालं असतं, तर अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा मान एकनाथ शिंदेकडे आला असता. मात्र युती फिस्कटली आणि त्यांचं संभाव्य मुख्यमंत्रीपद हुकलं.

त्यानंतर, महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी देखील मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. परंतु शरद पवारांनी सूत्रं हलवली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद घेण्याचं सुचवलं असं राजकीय वर्तुळात बोललं गेलं. त्याकाळात संजय राऊत आणि शरद पवार यांच्या सतत होणाऱ्या भेटीगाठींनंतर अखेर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद पुन्हा  हुकलं.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला जाताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘तुला माझी जागा घ्यायची आहे,’ असा सूचक इशारा दिला होता, असंही बोललं जातं. पण जवळपास अडीच वर्ष उद्धव ठाकरेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहिले.

एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर, त्यांना परत येण्याचं आवाहन करताना उद्धव ठाकरेंनी ‘मी मुख्यमंत्रीपद सोडतो, एक शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल, तर मला आनंदच आहे.’ असं विधान केलं होतं.

 शिंदे तेव्हा परत आले नाहीत, मात्र जेव्हा परतले तेव्हा भाजपच्या पाठिंब्यावर का होईना मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलीच.

पण या सगळ्यामागे आणखी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेलं वचन…

बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ते म्हणजे, एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवायचं. २०१२ ला बाळासाहेबांचं निधन झालं, त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेना-भाजप युतीचं सरकार राज्यात आलं; मात्र तेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. या सरकारच्या काळात शिवसेना काहीशी बॅकफूटवर गेली, अशीही चर्चा झाली.

२०१९ मध्ये शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी जोरदार प्रयत्न करणार हे निश्चित होतं. त्यात निवडणुकांच्या आधीच एक घटना घडली…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रंगशारदा भवनात शिवसेनेनं राज्यातल्या २८८ मतदारसंघातल्या इच्छुक उमेदवार आणि जिल्हाप्रमुखांचा मेळावा भरवलेला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी विधान केलेलं की,

 

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी एक वचन दिलं आहे. एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवणार. हे वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे. यासाठी मला तुमची साथ हवी आहे, म्हणूनच गाव तिथं शिवसेनेची शाखा आणि घर तिथं शिवसेना पोहोचवायचं काम करायचं आहे.”

यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या रुपानं शिवसेना सत्तेत आली, मुख्यमंत्रीपदाची संधीही मिळाली. शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. तेव्हाही त्यांनी बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करत असल्याची आठवण करुन दिली होती.तेव्हाही सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री कधी होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. 

साध्या शाखाप्रमुखापासून आपला राजकीय प्रवास सुरू करणारे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळं एका अर्थानं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

मात्र या स्वप्नपूर्तीत उद्धव ठाकरेंपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांचा असलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाटा मोठा आहे, हे नाकारता येणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.