वास्तवची रियल लाईफ स्टोरी : एका खुनानंतर साधा वेटर मुंबईचा खतरनाक डॉन बनला …

मुंबई अंडरवर्ल्ड ही अशी जागा होती की जिथं कधीही कुठेही हल्ला होऊ शकतो, कितीही माणसं मरू शकतात. इतक्या टोळ्या आणि मुंबईवर सत्ता गाजवण्याचे त्यांचे प्रयत्न आणि त्यातून घडणारा खून खराबा. पण यातल्याच एका वेटरची ही गोष्ट ज्याने फक्त एकच खून केला पण त्याला मुंबईचा डॉन म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

सदानंद नाथु शेट्टी 1952 साली कर्नाटकातल्या उडुपीमध्ये त्याचा जन्म झाला. गावातच तो वाढला आणि 1970 साली कामधंदे बघण्यासाठी तो मुंबईत आला. बऱ्याच ठिकाणी चौकशी,आर्जवा करूनही त्याला काम मिळाली नाहीत. पण काही दिवसांनी चेंबूरच्या एका हॉटेलमध्ये सदानंदला वेटरचं काम मिळालं. तो तिथंच काम करायचा आणि तिथंच झोपायचा. पण त्याने स्वप्नातही असा विचार केला नव्हता की त्याच्यावर खूप मोठं संकट येणार आहे.

एके दिवशी चेंबूरमधील हप्ता वसूल करणारा त्या एरियातला शिवसेनेचा विष्णू डोगळे चव्हाण हा सदानंद जिथं काम करत होता तिथं आला. विष्णू चव्हाणने बळजबरीने जास्तीचा हप्ता मागितला पण जास्तीचा हफ्ता देण्यात मालकाने मनाई केली तेव्हा त्याने थेट मालकाला फटकवायला सुरवात केली. सदानंद गप्प उभा राहून हे बघत होता. पण जेव्हा हे जास्त झालं तेव्हा सदानंदचं डोकं फिरलं आणि तो मालकाला वाचवायला पळाला.

एक लोखंडी रॉड त्याला सापडला आणि सदानंदने त्या रॉडने विष्णू चव्हाणला मारायला सुरुवात केली. त्याचे वार इतके जबरदस्त होते की विष्णू चव्हाण जबर जखमी झाला आणि अतिरक्तस्राव झाल्याने विष्णू चव्हाण जागेवरच मरण पावला. या घटनेने सदानंद शेट्टी लोकांमध्ये पसरू लागला, त्याच्या नावाची चर्चा सगळीकडे होऊ लागली.

असं म्हणतात कि महेश मांजरेकर यांनी आपला वास्तव सिनेमातील संजय दत्तची भूमिका साधू शेट्टीवरून लिहिली आहे.

विष्णू चव्हाणची हत्या केल्याने प्रकाशझोतात आलेल्या सदानंद शेट्टीवर नजर पडली ती तामिळ डॉन वरदाराजन मुदलियारची. त्याने सदानंदला आपल्या टोळीत सामील केलं आणि इथून सदानंद शेट्टीची ऑफिशियल एन्ट्री अंडरवर्ल्डमध्ये झाली.वरदाराजनबरोबर राहून त्याच्या गुन्ह्यांची यादी वाढतच गेली.

विष्णू चव्हाण मेला तरी त्याच्या लोकांना सदानंदला मारून विष्णू चव्हानचा बदला घ्यायचा होता. शेवटी तीन लोकांनी योजना आखली आणि सदानंदवर हल्ला केला. त्या तिघांनी सदानंदला इतकं मारलं की तो पूर्ण रक्तात न्हालेला होता मग त्या तिघांनी सदानंद मेला असं समजून तिथंनं पलायन केलं. व सदानंदला मोठी जखम झाली होती शेवटी त्याला कोणीतरी हॉस्पिटलमध्ये नेलं तिथं तो चार महिने भरती झाला आणि उपचार घेत होता, उपचार घेऊन झाल्यावर तो बाहेर पडला आणि त्या हल्ला करणाऱ्या तिघांना यमसदनी धाडून मगच शांत बसला.

तामिळ डॉन मुदलियारची दहशत कमी होऊ लागली होती आणि मुंबईतून तो पुन्हा तामिळनाडूला जायची तयारी करू लागला होता. मुंबई पोलिसांनी त्याला पळवून लावलं पण सदानंद शेट्टीकडे तो सगळी टोळीची जबाबदारी देऊन गेला आणि सदानंद शेट्टी मुंबईचा डॉन झाला. गँग मधले लोकं त्याला साधू शेट्टी म्हणून ओळखायचे. पुढे बडा राजन आणि छोटा राजन यांच्याशी त्याचा संपर्क आला. बडा राजनच्या हत्येनंतर छोटा राजन आणि साधू शेट्टी जोमाने गँग चालवत होते याच काळात शेट्टीचा छोटा शकीलशी संबंध आला.

1985 पर्यंत साधू शेट्टीने अनेक गुन्हे केले 1992 ला तो आपल्या मूळ गावी गेला आणि तिथं शांतपणे राहू लागला पण तिथेही गोळीबार केल्याने तो पोलिसांच्या नजरेत आला. तिथं तो अपक्ष म्हणूनही निवडणूक लढला होता पण यश काय त्याला मिळालं नाही. मुंबईत जेव्हा तो आला तेव्हा पोलीस त्याच्या मागावर होते. 2002 साली एका चकमकीत एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांनी साधू शेट्टीचा खात्मा केला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.