एक काळ होता जेव्हा अंडरवर्ल्ड परमबीर सिंग यांच्या भीतीनं दुबईला पळायचं…

शिंदे फडणवीस सरकारनं नुकताच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन मागे घ्यायचा आदेश दिला. परमबीर सिंग यांच्यावर केलेले आरोपही मागे घेतले सोबतच त्यांचा निलंबनाचा काळ ऑन ड्युटी असल्याचं मान्य करावं असंही या आदेशात म्हणलं आहे.      

परमबीर सिंग यांना अँटिलिया स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने समन्स बजावलं होतं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळेही परमबीर सिंग चांगलेच चर्चेत आले होते.

पण एक काळ असा होता की, मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या टोळ्या परमबीर सिंगांना घाबरून शहरातूनच पळून जायची.

१९८२ च्या आधी पोलीस एन्काऊंटर होत नव्हते. पोलिसांवर अनेक कडक नियम असायचे. त्यांची बंदूक शोभेपुरती उरली आहे की काय अशी शंका वाटू लागली होती. अशा वेळी गोळीला गोळीनेच उत्तर दिले जाणार अशी भूमिका ज्यूलिओ रिबेरो यांनी घेतली. त्यानंतर मात्र एन्काउंटर हा अंडरवर्ल्डच्या उपद्रवावर सर्रास वापरला जाणारा उपाय होता.

ज्यूलिओ रिबेरो यांच्यानंतर बरेच अधिकारी येऊन गेले पण अंडरवर्ल्डचा उपद्रव काय कमी होता होईना. त्यात आणि मानवी हक्क संघटनांनी एन्काउंटर विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे थोड्या काळासाठी एन्काउंटरच प्रमाण कमी झालं होत. पण यामुळे या टोळीवाल्यांचा आत्मविश्वास वाढला.

९० च्या दशकात तर मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळी युद्धांनी ऊत आणला होता. त्याकाळात अरुण गवळी आणि छोटा शकील यांच्यात सतत चकमकी होऊ लागल्या. आणि त्यामुळेच छोटा शकील आणि अरुण गवळी हे मुंबई पोलिसांच्या हिटलिस्टवर होते.

मुंबई पोलिसांनी या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपली कंबर कसली. हे युद्ध रक्तरंजित असणार हे १०० टक्के फिक्स होत कारण तेव्हा मुंबईचे पोलीस कमिशनर होते, रॉनी मेंडोन्सा. जर आपल्या ढिलेपणामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचणार असेल तर आपण बुलेट फॉर बुलेट उत्तर देऊ असं त्यांनी सांगितलं.

त्यांची गुन्हेगारांच्या आश्रयस्थानावर छापे घालण्याची योजना ही खरोखरच एक आक्रमक खेळी होती.

यात त्यांनी ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस डॉ. सत्यपाल सिंग आणि परमबीर सिंग यांच्यावर शहरातील गुन्हेगारांचे संपूर्ण जग निपटून काढण्याच्या कामाची जबाबदारी टाकली. दोन्ही सिंग मंडळींमध्ये सुसंवाद असल्यानं त्यांनाही संपूर्ण मुंबई शहर हे गुंडांच्या टोळीच्या धाकापासून मुक्त करण्याचं ठरवलं.

त्यातल्या त्यात परमबीर सिंगांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेल. ते १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी. पोलीस दलातील एक कार्यक्षम व धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख. विविध ठिकाणच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावण्यात त्यांना यश आलं होत.

या दोघांनी चकमकी पार पाडू शकणाऱ्या तीन खास तुकड्या तयार केल्या. त्या तुकड्यांचे प्रमुख इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले आणि विजय साळसकर हे धाडसी अधिकारी होते. हे तिघेही १९८३ च्या बॅचमधले होते आणि त्यांच्यात अंडरवर्ल्ड संपवून टाकण्याची सुप्त उमेद होती.

या सगळ्यात महत्वाचं होत ते म्हणजे खबऱ्यांच जाळ. परमबीर सिंग यांचे खबरी मोठ्या प्रमाणावर होते. याचा उपयोग या तीन टीमला होत होता. प्रदीप शर्मा हे सत्यपाल सिंग यांच्या अंडर काम करत होते, तर भोसले आणि साळसकर हे परमबीर सिंग यांच्या अंडर काम करत होते.

त्या तीन चकमक करणाऱ्या तुकड्या या एकाच ध्येयायाने झपाटल्या होत्या. ते म्हणजे, शकील आणि गवळीच्या टोळीला नामशेष करून टाकायचं.

साळसकर आणि भोसले हे गवळीच्या मागावार होते तर शर्मांनी शकीलची टोळी घेतली. या तिन्ही तुकड्यानी सुमारे ३०० पेक्षा जास्त टोळीवाले संपवले.

या पथकाने मुंबई पोलिसांच्या इतिहासात सर्वात जास्त एन्काउंटर केल्याचा रेकॉर्ड असल्याचं बोललं जात. तेव्हा परमबीर सिंग यांच्या नेतृत्वात असणाऱ्या विशेष पथकाने म्हणजेच साळसकर आणि भोसले यांनी कुख्यात गुंड अरुण गवळीच्या दगडी चाळीत अनेक कारवाया केल्या होत्या. त्यामुळे अंडरवर्ल्डशी खडानखडा माहिती असणारे अधिकारी अशी परमबीर सिंग यांची ओळख बनली.

परमबीर सिंग यांच्या अंडर काम करणाऱ्या साळस्करानी गवळीच्या टोळीतल्या माणसांना सळो की पळो करून सोडलं होत. त्या टोळीतले काही शार्प शुटर मारले गेले तर काही पळून गेले. त्यामुळे असं बोललं गेलं की परमबीरसिंगांनी कडक ऍक्शन घेतली म्हणूनच अंडरवर्ल्डवाले मुंबई सोडून दुबईला पळत राहिले…

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.