हत्ती जगवायचा की राजकारण ते एकदाच ठरवा….

तो 2 ऑक्टोबर 1949 चा नेहमीप्रमाणे साधारण दिवस होता. पंतप्रधान नेहरूंनी आपल्या सवयीप्रमाणे पत्रे वाचण्यास सुरवात केली.

ते एक पत्र उघडतात आणि जपानहुन आलेले ते पत्र वाचून आश्चर्यचकित होतात. ते जपान मधील शाळकरी मुलाने लिहिलेले असते. पत्र वाचत असताना आनंदित होतात.

नेहरू आनंदित होण्यामागील कारण असते ते म्हणजे त्या शाळकरी मुलाने केलेली अद्भुत विनंती.

जपानी मुलाने नेहरूंकडे भेट म्हणून हत्तीची मागणी केलेली असते. युद्धामध्ये तेथील प्राणीसंग्रहालयातील दोन्ही हत्ती मृत पावल्याने आता तेथे एकही हत्ती नसल्याने त्या मुलांना दुःख होत असल्याने त्या शाळकरी मुलाने नेहरूंजी कडे हत्तीची मागणी केलेली असते.

नेहरुजी देखील जपानसाठी तात्काळ हत्तीचा शोध सुरू करतात आणि एक पंधरा वर्षीय हत्तीण जिचं नाव त्यांनी स्वतःच्या मुलीच्या नावावरून ठेवलेलं असते ती हत्तीण ते जपानला पाठवतात.
जेव्हा नेहरुजी ‘इंदिराला’ जपानला पाठवता त्यासोबत तेथील मुलांना पत्र लिहितात. त्या पत्रात नेहरुजी लिहितात,
“इंदिराला माझ्याकडून नव्हे तर भारतातील मुलांकडून जपानच्या मुलांना भेट समजून त्याप्रमाणे काळजी घ्या.
हत्ती हा एक उदात्त प्राणी आहे. आमच्या भारतात हत्तीवर खूप प्रेम केलं जातं. हत्ती हे शहाणे, संयमशील, सामर्थ्यवान आणि सौम्य असतात.मी आशा करतो की आपण सर्व देखील हे गुण अंगींकारू”.
इंदिरा ला टोकियोमधील उयोनो (Ueno) प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात आले.  इंदिरा हत्तीण शांतता दूत तसेच जपान आणि भारत यांच्यातील मैत्रीचे प्रतीक ठरले.
DCF3D59A F13D 4236 9203 AE9F98BA0A0D
जपानमध्ये इंदिराला पाठवल्यांनातर नेहरूंनी भारतामधील मुलांना एक पत्र लिहिले. त्या पत्राचा मतितार्थ असा होता की,
‘लवकर मोठे होऊ नका…
मोठं झाल्यावर दुभाजकं निर्माण होत जाते..
संववेदनशीलता कमी होते’

केरळातील क्रूर घटना समजल्यावर सगळ्यात आधी डोळ्यापुढे नेहरूंचे वाक्य आले…

भारतीय उपखंडात हत्तीचं पालन केल्याचे, त्याला माणसाळवल्याचे दाखले ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकापासून आढळतात.
आत्ता मरण पावलेली हत्तीण ही सायलेंट व्हॅली अर्थात सैरंध्रीवन राष्ट्रीय उद्यानातून मानवी वस्तीत आल्याचं सांगितलं जात असलं तरी सायलेंट व्हॅलीच्या बफर झोन मध्ये आतपर्यंत बेकायदेशीररीत्या शेती केली जाते, पलक्कडचे धनाढ्य रबर व्यापारी मजूर लावून बफर झोनच्या आत अशी शेती करतात. (त्या तुलनेत पारंबीकुलम व्याघ्रप्रकल्पातले आदिवासी वन्यजीवांना डिस्टर्ब न करता केळी आणि उसाचं उत्पादन घेतात).
सैरंध्रीवन हे आधीपासूनच वादाचं केंद्र राहीलं आहे, धरण आणि वीजनिर्मिती प्रकल्पासाठी केरळ सरकार हे अख्खं जंगल पाण्याखाली घालणार होतं मात्र विख्यात शास्त्रज्ञ सी व्ही सुब्रमण्यम यांनी इंदिरा गांधींना इथले वन्यजीव वाचवण्याचं आवाहन केलं, त्याबद्दल सखोल अभ्यास करून एक रिपोर्ट दिला, त्यानंतर इंदिराजींनी सैरंध्रीवन एक राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलं.

सायलेंट व्हॅली अर्थात सैरंध्रीवन हे निलगिरी बायोस्फिअरचा सर्वात महत्वाचा भाग आहे, भारतातला शेवटचा मानवी हस्तक्षेपरहित सदाहरित वनांचा पट्टा म्हणून हे राष्ट्रीय उद्यान ओळखलं जातं.

सैरंध्रीवन गांजाच्या शेतीसाठीही प्रसिद्ध आहे, इथं पिकलेला गांजा जगभरात त्याच्या उच्च दर्जा आणि किक साठी प्रसिद्ध आहे, गांजा पिकवणं बेकायदेशीर असल्याने बफर झोन मध्ये घुसून जंगल जाळून गांजा लावला जातो.
49580DAC CC45 46D3 8C45 70862F169533
18 ते 22 महिन्याच्या गर्भधारणेचा कालखंड असलेला हत्ती हा कौटुंबिक युनिट्स बनवून राहणारा प्राणी आहे, सहसा गर्भवती आणि लहान पिल्लं असलेल्या हत्तीणी ह्या कळपातल्या एखाद्या मोठ्या हत्तीणीच्या नेतृत्वात एकत्र राहत असतात,
असं असताना या एकाच गर्भवती हत्तींनीच एकटं आढळणे आश्चर्यच आहे.
एक हत्ती हा परिसंस्थेतला अत्यंत महत्वाचा घटक असतो, हत्ती चरताना मोठ्या भूखंडावरचं वनस्पतिजीवन फस्त करतो, त्यामुळे झाडांच्या नवीन जातींना रुजायला जमीन उपलब्ध होते, हत्तीच्या विष्ठेतूनच ज्यांचं पुनरुत्पादन होऊ शकतं अश्या अनेक वृक्षांच्या जाती आहेत, एका भागातील वृक्षांच्या फांद्या, बिया खाऊन जंगलातल्या दुसऱ्या भागात विष्ठेतून त्या बिया पोहोचवून हत्ती एकप्रकारे जैवविविधतेचं संरक्षण करत असतात.

केवळ हत्तीच्या पचनसंस्थेतून गेल्यावरच रुजतील अश्या प्रकारच्या बिया असलेल्याही काही प्रजाती आहेत, ज्या जंगलात हत्ती नसतात तिथे ह्या वनस्पती आढळत नाहीत.

प्रत्येक जंगल हे कार्बनच्या स्थिरीकरणाचं कार्य करत असतं, हे काम थांबलं तर ग्लोबल वॉर्मिंग मुळे जगभरात प्रलयंकारी परिणाम होतील, जागतिक तापमानवाढ झाल्यास तृणवर्गीय जातींचा वाढीचा दर वाढेल, त्यामुळे तणांच प्रमाण वाढून शेती ही तोट्यात येईल.
तणनाशकांना दाद न देणाऱ्या सुपर विड्सचं वाढतं प्रमाण शेती ही संकल्पनाच संपुष्टात आणण्याचा धोका आपल्या समोर आहेच.

मुळात हत्ती जगवायचा की माणूस? शेती ठेवायची की जंगल राखायचं असे प्रश्न शहरी मेंदूनाच जास्त पडतात..

रानडुकरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांना गोळी घालून मारण्याचे परवाने केरळ सरकार देतं, वरून 500 रुपये इनामही देतं,

मात्र बफर झोनच्या आत घुसून शेती केली जात असेल, रानडुक्कर, हत्ती यांच्या अन्नस्रोतावर हल्ला केला जात असेल तर ते प्राणी गावात शेतात घुसणार यात नवल नाही.

शेती, जंगल आणि जंगली प्राणी हे परस्परपूरक संस्था आहेत, नत्र, कर्ब आणि इतर घटकांचं स्थिरीकरण असेल, किंवा ऋतुचक्र नियमित ठेवणं असेल, जंगलच हे काम करू शकतं. रानडुकरांना आळा घालण्यासाठी, गुलाल, मानवी केस सोलर वर चालणारी विजेचा नॉन लिथल झटका देणारी कुंपण पण वापरता येतील.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी मानवी केस, चर वापरून रानडुकरांचा बंदोबस्त केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी यावर काम करायला पुरेसा वाव आहे.
जाता जाता…
गौतम बुद्ध यांना पांढरे कमळाचे फुल आवडत होते असा उल्लेख जातक कथांत आहे. बुद्ध अनुयायी अवलोकीतेश्वर बुद्धांचे प्रवचन ऐकण्यास जेतवनात निघाला तेंव्हा त्याने पाहीले की, एका डोहात एक हत्तीण पडली आहे आणि खूप प्रयत्न करूनही बाहेर पडू शकत नाही. बुद्धाचे प्रवचन सोडून त्याने त्या हत्तीणीस बाहेर काढले.

त्यावर आनंदी होऊन त्या कृतज्ञ हत्तीणीने त्यास एक पांढरे कमळ भेंट दिले.

3016DE19 28B6 47F3 8957 AD0B7B26B568
तो जेतवनात पोचला तोंवर प्रवचन संपले होते.पण त्यांने जेतवनात जाताच बुद्धास नमस्कार करून ते कमलपुष्प अर्पण केले. प्रवचनास उपस्थित राहू शकला नाही म्हणून त्यास वाईट वाटले पण हत्तीणीबाबत माहीत समजताच बुद्ध प्रचंड आनंदी झाले आणि त्यांनी ते कमळाचे फुल त्यास त्याच्या भुतदयेचे व परोपकारी वृत्तीचे प्रतिक म्हणून सदैव जवळ बाळगण्यास सांगीतले!
तोच अवलोकीतेश्वर पुढे ‘बोधीसत्व पद्मपाणी’ म्हणून ओळखला जाऊ लागला, अशी एक कथा आहे. अजिंठ्यातील भित्तीचित्र याच कथेवर आधारीत आहे.
प्राचीन भारतीय संस्कृतीत हे ‘कमलपुष्प’ भुतदया आणि परोपकारीतेचे प्रतिक आहे. पण कमळाबद्दल अभिमान असणारा प्रत्येक भारतीय भुतदया, परोपकारी वृत्तीचा असेलच असे नाही, हे आपण हल्ली पाहत आलो आहोत.
नेहरू आणि बुद्धांची संवेदनशीलता या घटनेआडून एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या बुद्धिजीवींच्या, नेत्यांच्या, सरकारांच्या अंगी येवो..
Leave A Reply

Your email address will not be published.