‘ट्विटर फाईल्स’ आल्या अन् एलॉन मस्क जीवाला धोका असल्याचं म्हणतोय

मंगळावर राहायला जायची ज्यांना इच्छा आहे, बिनाड्रायव्हर चालणारी गाडी ज्यांनी बनवली, माणसाच्या मेंदूत ज्यांना इलेक्ट्रॉनिक चिप बसवायची आहे असे एलॉन मस्क आता एका गोष्टीला घाबरलेत… अर्थात ती गोष्टही तशी घाबरण्यासारखीच आहे. अगदी, प्रत्येक व्यक्ती या गोष्टीला घाबरतेच… ती गोष्ट म्हणजे, ‘मृत्यू’!

नुकतंच एलॉन मस्क यांनी “माझ्यावर गोळीबार होऊ शकतो” असं वक्तव्य केलंय.

त्यानंतर मस्क यांना कुणापासून धोका आहे या विषयावर जवळपास सर्वच वृत्तवाहिन्यांनी आपापली मतं मांडली… बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की, मस्क यांनी समर्थन केलेल्या ‘ट्विटर फाईल्स’ मुळं हे होऊ शकतं… बघुया नेमकं हे ट्विटर फाईल्स काय प्रकरण आहे…

३ डिसेंबर रोजी एलॉन मस्क यांनी एक ट्वीट केलं. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं,

“ट्विटरद्वारे हंटर बायडेन यांची स्टोरी दडपशाहीचं नेमकं काय झालं ते प्रकाशित केलं जाईल.”

त्यांच्या या ट्वीटनं आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजली. विशेषत: अमेरिकेत या ट्वीटमुळं राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाल्या. याचं कारण म्हणजे, एलॉन मस्क यांच्या ट्वीटमध्ये लिहीलेलं नाव ‘हंटर बायडेन’. हंटर बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे दुसरे सुपूत्र.

पण या ट्वीट मध्ये तसा काही धक्कादायक खुलासा एलॉन मस्क यांनी केला नाही. मग, या ट्वीटमध्ये इतकं काय दडलंय?

बघुया मस्क यांच्या या ट्वीटमागे नेमकं काय दडलेलं…

लेखक मॅट तैब्बी यांनी केलेल्या ट्विटनुसार, २०२० मध्ये ट्विटर कंपनीनं बायडेन यांच्या टीमनं विनंती केल्यानंतर न्यूयॉर्क पोस्टच्या एका बातमीवर कारवाई केली होती. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क पोस्टनं ‘हंटर बायडेन लॅपटॉप स्टोरी’ बाबत एक लेख प्रसिद्ध केला होता. हा लेख दडपण्यासाठी बायडेन यांच्याकडून दबाव आल्यानंतर ट्वीटरनं आपल्या प्लॅटफॉर्मवरून या बातमीची लिंक काढून तर टाकलीच वर डायरेक्ट मेसेज करून ही लिंक शेअर करण्यावरही बंदी आणली. मुळात ही कारवाई अतिशय गंभीर अश्या चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या कंटेंटसंदर्भात केली जाते. मात्र, या बातमीचा आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीचा काही संबंध नसताना ही कारवाई करण्यात आली होती.

असं काय होतं न्यू यॉर्क पोस्टच्या त्या बातमीत?

ही बातमी २०२० च्या निवडणुकांच्या आधी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीमध्ये हंटर बायडेन यांच्या ई-मेलचा संदर्भ देऊन असं म्हटलं होतं की, १७ एप्रिल २०१५ रोजी बुरिस्मा कंपनीचे सल्लागार वदायम पोझार्सकी यांनी हंटर बायडेन यांना एक मेल केला होता… या मेलमध्ये त्यांनी म्हटलंय, “प्रिय हंटर, मला वॉशिंग्टन डीसी येथे आमंत्रित केल्याबद्दल आणि मला तुझ्या वडिलांना भेटण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत वेळ घालवला, हा खरोखरच माझ्यासाठी सन्मान आहे.” आता यात गैर काही नाही पण, त्यावेळी जो बायडेन हे अमेरिकेचे उपाध्यक्ष होते आणि ही भेट हंटर बायडेन यांच्या बिझनेससंदर्भातली होती असा दावा न्यू यॉर्क पोस्टनं केला होता.

आता या प्रकरणात ट्वीटरमध्ये नेमकं काय घडलं? हे जर एलॉन मस्क बाहेर आणणार असतील तर, अमेरिकेतील राजकीय क्षेत्रात खळबळ होणं हे सहाजिकच होतं.

“माझ्या जीवाला धोका आहे”- एलॉन मस्क

हे सगळं घडल्यानंतर ‘फ्री स्पीच’ या विषयाबद्दल विस्तृत चर्चा करताना मस्क म्हणाले, “मी कधीही ओपन-एअर कार परेडचं आयोजन करणार नाहीत. खरं सांगायचं तर माझ्यासोबत काहीतरी वाईट घडण्याचा, एवढंच नाही तर माझ्यावर गोळीबार होण्याचा धोका आहे.” पुढे बोलताना एलॉन मस्क म्हणाले, “कुणी ठरवलं तर, मला मारणं फार अवघड नाहीये, त्यामुळं आशा आहे की ते तसं करणार नाहीत” असं वक्तव्य जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती एलॉन मस्क यांनी केलंय.

मस्क यांच्या वक्तव्यात कुठंही बायडेन यांचा उल्लेख नाही तरी, चर्चांमध्ये बायडेन यांचं नाव येतंय.

एलॉन मस्क यांनी आपल्या वक्तव्यामध्ये कुठेही आपल्याला कुणामुळे धोका आहे किंवा, आपल्यावर कोण गोळीबार करु शकतं हे म्हटलेलं नाहीय. पण, मागच्या काही दिवसात एलॉन मस्क यांनी घेतलेले मोठे निर्णय जसं की, ट्विटर मधली नोकर कपात, ट्विटरवरील अनेक फेक अकाऊंट्स डिलीट करणं आणि आताचा हा ट्विटर फाईल्सचा मुद्दा… या सर्व मुद्द्यांमध्ये सर्वात मोठा आणि वादग्रस्त मुद्दा हा ट्विटर फाईल्स अर्थात हंटर बायडेन आणि पर्यायानं जो बायडेन यांच्या राजकारणाविषयी होता. त्यामुळं, मस्क यांच्या जीवाला धोका निर्माण होण्यामागे ‘ट्विटर फाईल्स’ आहे का असा सवाल अनेकांच्या मनात येतोय.

हे ही वाच भिडू:

युपीच्या आकाशात UFO दिसले..तसं नाही हे कांड तर इलॉन मस्क करतोय…

एलॉन मस्कचं एक ट्विट आणि भारतातल्या राज्यांमध्ये आमंत्रणाची रेस सुरु झालीये

मोदींची मर्सिडीज मेबॅक आणि बायडेन भाऊंची द बीस्ट, कुणाची गाडी भारी आहे भिडू…

Leave A Reply

Your email address will not be published.