स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ब्रिटिशांच्या गुलामीच्या खुणा या कारणांमुळे राहिल्यात

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथे आयएनएस विक्रांत आणि भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचं अनावरण केलं. भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजामुळे जुन्या ध्वजात असलेल्या  पारतंत्र्याच्या खुणा पुसण्यात आल्या आहेत असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी नरेंद्र मोदींनी नौदलाच्या ध्वजातून पारतंत्र्याची खूण पुसून काढली असे सांगितले जातेय. मात्र मोदींनी नौदलाच्या ध्वजातून पारतंत्र्याची खूण तर पुसली मात्र भारतीय आर्मी आणि भारतीय वायुसेनेच्या ध्वजाचं काय? असा प्रश्न निर्माण होतो.

शिवाय नेव्हीप्रमाणेच भारतीय सैन्याच्या बाकी तुकड्यांमध्ये सुद्धा ब्रिटिश सैन्याचे चिन्ह तसेच आहेत.

ज्याप्रमाणे भारतीय नेव्हीच्या ध्वजात सेंट जॉर्ज क्रॉस अस्तित्वात होतं. त्याचप्रमाणे भारतीय आर्मीच्या  ध्वजात सुद्धा ब्रिटिश आर्मीच्या ध्वजातील तलवारी जश्याच्या तशा आहेत. फक्त त्या ध्वजात असलेले ब्रिटिश मुकुट काढून त्याजागी त्रिमुखी सिंहाची मुद्रा टाकण्यात आलीय.

आर्मीच्या ध्वजाप्रमाणेच वायुसेनेच्या ध्वजात सुद्धा फक्त युनियन जॅक आणि तीन रंग बदलले आहेत. मात्र झेंड्यातील आकाशी रंगासोबतच जुना फॉरमॅट अगदी तसाच आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर सुद्धा भारतीय सैन्यातील चिन्ह आणि झेंडे थोड्या फार फरकाने ब्रिटिशांच्या झेंड्यासारखेच दिसतात.

मग भारत स्वतंत्र झाल्यावर भारतीय सैन्याचे चिन्ह, ध्वज, बॅज आणि गणवेशात बदल का करण्यात आला नाही?

तर भारत १९४७ ला स्वतंत्र झाला परंतु भारत रिपब्लिक झाला नव्हता त्यामुळे आर्मीची जुनी व्यवस्था कायम ठेवण्यात आली होती. पण जेव्हा भारताचे संविधान पूर्ण व्हायला लागले होते, तेव्हा बाकी गोष्टींप्रमाणे सैन्यातील ध्वज आणि खुणांमध्ये बदल करण्याची तयारी सुरु झाली होती.

त्याच दरम्यान मे १९४९ मध्ये भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबेटन यांची लंडनमध्ये भेट झाली. त्या भेटीदरम्यान माउंटबेटन यांनी पंडित नेहरूंना एक ६ पानांची चिट्ठी दिली. त्या चिट्ठीमध्ये भारतीय सैन्याचे ध्वज, चिन्ह, बॅज आणि गणवेशात कोणता बदल करायचा याबद्दल माहिती दिली होती.

ते पत्र पंडित नेहरूंनी तत्कालीन संरक्षण मंत्री बलदेव सिंग आणि भारताचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांना पाठवले आणि माउंटबेटनने केलेल्या शिफारशीनुसार भारतीय सैन्याच्या चिन्हांमध्ये आणि ध्वजामध्ये बदल करण्यात आले.

लॉर्ड माउंटबेटन हे भारताचे व्हाइसरॉय होण्यापूर्वी ब्रिटिश सैन्यात होते. ब्रिटिश सैन्यात काम केल्यामुळे त्यांना आंतराष्ट्रीय स्तरावरील सैन्याच्या चिन्हांची आणि नियमांची जाणकारी होती. तसेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिश कॉमनवेल्थ संघाचा सदस्य झालेला होता. त्यामुळे भारतीय सैनिक आणि इतर कॉमनवेल्थ देशांचे सैनिक यांच्यात फारसा फरक नसावा यासाठी माउंटबेटनने सूचना केल्या होत्या.

लॉर्ड माउंटबेटन यांनी भारतीय सैन्याच्या चिन्हांमध्ये महत्वाचे बदल वगळता फार मोठे बदल करू नयेत अशी सूचना केली होती. भारतीय सैनिकांचा गणवेश आणि बॅजची रँक बदलण्यात येऊ नये कारण आंतराष्ट्रीय स्तरावर याच पद्धतीचे गणवेश आणि बॅज वापरले जातात, असं माउंटबेटन यांनी सांगितलं होतं.

मात्र भारतीय सैन्याच्या नावातून रॉयल हा शब्द आणि ब्रिटिश मुकुट काढून टाकण्याची सूचना माउंटबेटन यांनी केली होती. तसेच त्या जागी परत रिपब्लिक किंवा स्टेट्स या शब्दाचा वापर करण्यात येऊ नये असेही सांगितले होते. 

तीनही तुकड्यांच्या ध्वजांमध्ये काही बदल माउंटबेटन यांनी सुचवले होते.

माउंटबेटन यांच्या सूचनेनुसार, भारतीय आर्म्ड फोर्सच्या ध्वजातील रंगांच्या पट्ट्या त्याच रंगाच्या ठेवण्यात आल्यात. केवळ मध्यभागी असलेली लाल रंगाची पट्टी वर आणि वर असलेली निळ्या रंगाची पट्टी मध्यभागी ठेवण्यात आली. तसेच त्यातील तलवारी, नांगर आणि गरुडाचे चिन्ह थोड्या वेगळ्या पद्धतीने तसेच ठेवले गेले. फक्त ब्रिटिश क्राउनच्या जागी भारताची राजमुद्रा टाकण्यात आली.

भारतीय नेव्हीच्या ध्वजाचा रंग आणि त्यावरील सेंट जॉर्जचा क्रॉस जसाच्या तसा ठेवण्यात आला. केवळ त्यात असलेला युनियन जॅक काढून त्याजागी भारताचा तिरंगा टाकण्यात आला.

भारतीय आर्मीच्या ध्वजात बदल करतांना लाल रंगाच्या ध्वजात कोपऱ्याला तिरंगा ठेवण्यात आला. तर मध्यभागी असलेल्या दोन क्रॉस तलवारी बाजूला करण्यात आल्या. त्या तलवारीच्या मध्ये असलेलं ब्रिटिश मुकुट काढून त्याजागी भारताची राजमुद्रा ठेवण्यात आली.

भारतीय एअर फोर्सच्या झेंड्यामध्ये आकाशी रंग तसाच ठेवण्यात आला. फक्त त्यातील युनियन जॅक बदलून त्याजागी तिरंगा ठेवण्यात आला. तसेच निळा, पांढरा आणि लाल रंगाच्या तीन वर्तुळांच्या जागी भारताच्या तिरंग्यातले भगवा, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग टाकण्यात आले.

ध्वजासोबत तिन्ही दलांचे चिन्ह आणि आर्मी ऑफिसर्सच्या रँकच्या पट्ट्या आणि बॅजेस या साच्यात करायचे बदल सुद्धा माउंटबेटन यांनी सुचवले होते.

माउंटबेटनच्या सुचनेनुसार भारतीय सैन्याच्या तीनही दलांचे चिन्ह जवळपास ब्रिटिश सैन्याच्या तुकड्यांप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. आर्मीच्या चिन्हातील तलवारी, वायुसेनेच्या चिन्हातील गरुड आणि नेव्हीच्या चिन्हातील नांगर थोड्या फार फरकाने तसाच ठेवण्यात आलाय. केवळ त्यातील ब्रिटिश मुकुटाऐवजी भारताची राजमुद्रा टाकण्यात आलीय.

तसेच तिन्ही दलांच्या ऑफिसर्सना रँकनुसार दिल्या जाणाऱ्या पट्ट्यांमध्ये फार कमी बदल करण्यात आले. केवळ आर्मी ऑफिसर्सच्या पट्ट्यांवर असलेल्या तलवारींमध्ये थोडेफार बदल करण्यात आले. आंतराष्ट्रीय स्तरावर आर्मी ऑफिसर्सना ब्रिटिश आर्मीप्रमाणेच रँक, कॅप बॅज आणि बटन्स दिले जातात त्यामुळे ते तसेच ठेवण्यात आले. तसेच आर्मी ऑफिसर्सचे गणवेश सुद्धा बऱ्याच अंशी तसेच आहेत.

आर्मीच्या चिन्हांमध्ये आणि ध्वजात जास्त बदल करण्यात आले नसले तरी, सैनिकांना देण्यात येणाऱ्या सन्मान चिन्हांमध्ये मात्र मोठे बदल करण्यात आले. सैनिकांना आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या सन्मानचिन्हात भारतीय संस्कृतीनुसार बदल करण्यात आलेय.  

त्यामुळे मोदी एका ध्वजातून क्रॉस काढून पारतंत्र्याची खूण पुसल्याचा दावा करत असले तरी लॉर्ड माउंटबेटन यांनी केलेल्या सूचनांमुळे भारतीय सैन्यातील ध्वज, चिन्ह, रँक पट्टे, बॅज आणि सैनिकांचे गणवेश आजही बऱ्याच अंशी तसेच आहेत.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.