आर्यन खानचं सोडा फरदिन खान कोकेनसोबत रंगेहाथ सापडून थोडक्यात सुटला होता…

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं नुकतंच मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकत ८ जणांना अटक केली. यात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी दिली आहे. मात्र एनसीबीच्या या कारवाईनं अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

गतवर्षी सुशांतसिंगच्या आत्महतेचा तपास देखील ड्रग्ज सेवन तपासापर्यंत येवून पोहचला होता. यात रिया चक्रवर्तीपासून रकुल प्रित सिंग, दिपीका पादुकोन, श्रद्धा कपुर, सारा अली खान अशा सगळ्यांची नाव आली होती.

त्यावेळी अभिनेत्री कंगना रनोतच्या मते ९०% लोक ड्रग्ज घेतात, तर रियाने इंड्रस्ट्रीतील ८०% लोक ड्रग्ज घेत असल्याचे म्हटले होते.

मात्र बॉलिवूडच्या या चंदेरी दुनियेतील ही काळी बाजू आज पहिल्यांदाच समोर आली आहे असे नाही. तर ८० च्या दशकात संजय दत्तच्या रुपाने प्रकर्षाने जाणवली होती. पुढे २००१ मध्ये फरदीन खानमुळे बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचे हे समिकरण किती खोलवर रुजलय याचा अंदाज आला होता.

मात्र ड्रग्जच्या घटनेत रंगेहाथ सापडून देखील तो यातुन शिक्षा न होता सहीसलामत सुटला होता…

काय झालं होत फरदीन खान सोबत ?

५ मे २००१. सुप्रसिद्ध अभिनेता फिरोज खान याचा मुलगा अभिनेता फरदीन खान जुहू-तारा रोडवरील एका एटीएमबाहेर उभा होता. यावेळी नाशिकमध्ये ड्रग सप्लाय करणारा नासिर शेख हा ड्रग पेडलर त्याच्या सोबत होता. त्याच्याकडे असलेल्या १५ ग्रॅम कोकेन मधील १ ग्रॅम कोकेन यावेळी फरदीन खान याने खरेदी केले. आणि त्याच वेळी पोलिसांनी दोघांनाही रंगेहाथ अटक केली. (पोलिसांनी न्यायालयात सांगितलेल्या माहितीनुसार)

यानंतर चौकशी दरम्यान नासिरने दिलेल्या जवाबात हे १५ ग्रॅम कोकेन त्याने टॉनी गोम्स याच्याकडून खरेदी केले असल्याचे सांगितले. आणि पोलिसांनी गोम्सला देखील अटक केली. या तिघांवरही कलम २१ ए (कमी मात्रेमध्ये अमली पदार्थ खरेदी करणे) आणि कलम २८ सी अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला होता.

संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. ड्रगचे मोठे रॅकेट उघड होणार अस बोललं जातं होतं. जॅकी श्रॉफ पासून ते डिंपल कपाडिया हे ड्रग घेतात अशी चर्चा होती.

पुढे जवळपास ११ वर्ष ही केस चालली.

यात फरदीनने सुरुवातीचा काही काळ तुरुंगात देखील घालवाल. कोणत्याही सामान्य कैद्याप्रमाणे त्याने हा काळ घालवला. यादरम्यान त्याने नो एन्ट्री, हे बेबी या सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण २०१२ फरदीनने स्वतःचा गुन्हा मान्य केला आणि त्याची या गुन्ह्यातून सुटका करण्यात आली.

‘नारकोटिक ड्रग्स एंड साइकोट्रॉपिक सब्सटांसेज (एनडीपीएस)’ त्याची सुटका करताना स्पष्ट केलं की,

जर फरदीनला पुन्हा या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली तर त्याला दिलेली ही सूट काढून घेण्यात येईल.

तर फेब्रुवारी २०१८ मध्ये नासिर खान आणि टॉनी गोम्स यांची सबळ पुराव्या आभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.

यानंतर न्यायालयाच्या सांगण्यावरुन फरदीनला काही काळासाठी रिहॅबमध्ये (व्यसनमुक्त केंद्र) पाठवण्यात आले होते.

अस म्हणतात की अभिनेता फिरोज खानने आपल्या राजकीय ओळखी वजन वापरून पोराला सोडवून आणले. फक्त फरदिनच नाही तर ज्यांची ज्यांची नावे समोर आली होती त्या कोणावरही कारवाई झाली नाही.

ही चूक फरदीनला मात्र चांगलीच महागात पडली. या घटनेनंतर फरदीनचं करिअर थांबल्यासारखे झाले.

२०१० नंतर त्याला काम देखील मिळणे बंद झाले आणि तो चित्रपटांपासून लांब गेला.

सध्या तो सिनेमांपासून दूर असूनही तो वडिलांची संपत्ती सांभाळत आहे. फिरोज खान यांची बंगळुरू येथे १०० एकरपेक्षाही जास्त जमीन आहे. तिथे त्यांचं एक फार्महाउसही आहे. एका मुलाखतीत फरदीन म्हणाला होता की, सध्या तो स्क्रिप्ट वाचत असून लवकरच तो दिग्दर्शक किंवा निर्मात्याच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.