शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नका, त्यांनी एकत्र येऊन अमेरिकेलाही हरवलं होतं

दोनच वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, या आंदोलनात बरेच राडे झाले, पण शेतकरी झुकले नाहीत, अखेर सरकारला कृषी विधेयकं मागे घ्यावी लागलीच. पण हे एकच उदाहरण नाही शेतकऱ्यांनी आपली ताकद वापरून मोठमोठ्या सरकारांना पाणी पाजलं आहे. अनेक महासत्तांना उधळून लावलं आहे.

याची सुरुवात झाली व्हिएतनाममध्ये. तिथं अमेरिकेनं आपलं सैन्य उतरवलं होतं. पण या सैन्याला तिथल्या शेतकऱ्यांनी धडा शिकवला.

याला दुसरं इंडोचायना युद्ध म्हंटलं जातं.

झालं असं की,

व्हिएतनामवर पश्चिमेच्या अनेक देशांचा डोळा होता. हा प्रदेश म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीची खाण समजला जायचा. यावर राज्य अबाधित ठेवण्यासाठी पश्चिमेचे देश एकत्र आले. त्यांनी व्हिएतनामचे दोन तुकडे पाडले. इथल्या शेतकऱ्यांना गुलाम करून त्यांना वापरून  घेतलं. उत्तरेत फ्रान्स आणि दक्षिणेत अमेरिकेने आपलं राज्य स्थापित केलं.

पण शेतकऱ्यांनी याविरुद्ध आवाज उठवला.

१९५५ पासूनच त्यांच्या या संघर्षाला सुरुवात झाली.

फ्रान्सच्या ताब्यात असणारा उत्तर भागाकडचा काही हिस्सा स्वतंत्र झाला होता. त्यांचा नेता होता हो ची मिन्ह…

त्याने १९४१ सालापासून व्हियेत मिन्ह ही स्वातंत्र्य चळवळ सुरु केली होती. ही चळवळ मुख्यत्वे उत्तरेत होती. फ्रेंच इंडोचीनपासून उत्तर भागाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. त्याच्या नेतृत्वाखाली व्हियेत मिन्हने फ्रान्सचा पहिल्या इंडोचीन युद्धात पराभव केला. १९५४ साली जिनिव्हा करारानंतर हो चि मिन्हने उत्तर व्हियेतनाममध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन केले.

दक्षिणेत अजूनही अमेरिकेचे राज्य होते.

त्यासाठी व्हियेत काँग ही संस्था सुरु करण्यात आली. म्हणून मग अमेरिकेने दक्षिणेत त्याचं एक कळसूत्री सरकार बनवलं.

कुणीही चांगला माणूस बाहुला म्हणून त्यांना सापडेना म्हणून त्यातल्या त्यात बऱ्या अशा ‘गो डीन डियम’ नावाच्या माणसाला तिथला राष्ट्राध्यक्ष बनवून टाकलं. त्याचा वापर करून व्हिएतनामला लुटत राहायचं असा त्यांचा डाव होता.  

शेतकऱ्यांना मिळणारी जमीन वाढवायला आणि लादलेले कर कमी करायला उत्तरेच्या सरकारने अनेक जमीनसुधारणा कायदे आणले होते. डियमने आल्या-आल्या शेतीचे कायदे बदलले. जनता या गोष्टीच्या विरोधात होती पण त्या विरोधाला अजिबात जुमानले गेले नाही.

या कामासाठी अमेरिकेने त्याची पाठ थोपटली. १९५७ साली मे महिन्यात त्याला रीतसर पाहुणचारासाठी अमेरिकेत बोलावण्यात आलं. १० दिवसांच्या या दौऱ्यात केलेल्या कामांसाठी त्याची न्यू यॉर्कमधून मोठी रॅली काढण्यात आली. अनेक गव्हर्नर आणि अधिकारी याला उपस्थित राहिले.

पण तिकडं शेतकऱ्यांच्या मनात संघर्ष पेटला होता. त्यांनी आधी सनदशीर मार्गाने आपलं म्हणणं डियम सायबापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गावातली लोकं एकत्र येत होती. उत्तरेकडच्या लोकांप्रमाणे आमचा टॅक्स कमी करावा आणि इतर सवलती द्याव्यात म्हणून त्यांनी आंदोलन सुरु केले.

कालपर्यँत आपल्या असलेल्या जमिनीवर त्यांना आता भाडे आणि कर द्यावा लागत होता.  

डियम याने या गावांमध्ये जमीनदारांना कामाला लावले. त्यांना शेतकऱ्यांकडून जास्तीचे काम करून घ्यायला सांगितलं. यातली बहुतांश लोकं भात लावणारी गरीब जनता होती. त्यांच्यावर या जमीनदारांनी प्रचंड अत्याचार केले. अमेरिकेतून या जमीनदारांना मोठा निधी आणि पाठिंबा मिळत असे.

म्हणून शेतकऱ्यांनी याविरुद्ध स्वतःच लढायचे ठरवले. त्यांनी उत्तरेतील सरकारशी संवाद साधला.

बहुतांश शेतकरी मिन्ह यांना मनातून नेता मानत होते. त्यामुळेच त्यांनी आता सशस्त्र मार्गाने डियमच्या फौजांशी लढायला सुरुवात केली.

ही खबर मिळताच अमेरिकेचे चॉकलेट बॉय राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी चवताळून उठले. त्यांनी १९६१ मध्येच क्युबावर ताबा मिळवायचा प्रयत्न केला होता. तो फेल गेल्यामुळं त्यांची नाचक्की झाली होती. त्यामुळं आपली प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या भावाने मिळून व्हिएतनामला ताब्यात घेण्याची योजना आखली.

सुरुवातीला त्यांनी एकही अमेरिकन माणूस तिथं पाठवायला नकार दिला. जगाला आपण तिथं आहोत हे कळू देऊ नये असा त्यांचा प्रयत्न होता. पण पडद्यामागून अमेरिकाच हे सरकार चालवत होती.

पण शेतकऱ्यांनी हळूहळू आपल्या टोळ्या उभारल्या. महिलांना घेऊनही त्यांनी तुकड्या बनवल्या. गनिमी कावा तंत्राचा वापर सुरु करून त्यांनी शत्रूला जेरीस आणले.

त्यामुळं १९६२ च्या एप्रिलपासून तिथं अमेरिकन सैनिकांना उतरवण्यास सुरुवात झाली. जवळपास १६,००० अमेरिकन सैनिक आणि युद्धाची सामग्री अमेरिकेतून एका छोट्या गरीब देशावर चालून गेली. शेतकऱ्यांना या सगळ्याला लढा द्यायचा होता.

त्यांनी एक मोठी आयडिया लढवली. हे शेतकरी आपल्या शेतांमध्ये बोगदे खणण्यात वाकबगार होते. अगदी A ४ कागदाएवढे छोटे तोंड असलेले बोगदे त्यांनी खणून ठेवले.

अमेरिकन सैनिक आले की ते त्या बोगद्यांमध्ये लपून बसत. अमेरिकेच्या एकाही सैनिकाला या बोगद्यांमध्ये उतरता येत नव्हते.

२ जानेवारी १९६३ ला त्यांचा असाच मुकाबला झाला. अमेरिकन सैन्याकडे बॉम्ब, विमाने आणि हेलिकॉप्टर्स आणि मशीन गन्स होत्या. दुसरीकडे शेतकरी सैन्याकडे साध्या रायफली आणि बोगदे. पण या लढाईत त्यांनी अमेरिकन सैन्याला धूळ चारली. अमेरिकन सैन्याची ५ हेलिकॉप्टर्स पाडून त्यांनी ८३ जवानांना टिपले. बदल्यात १८ शेतकरी कामी आले.

यावरून डीएम साहेब आता माघार घ्यायला तयार झाले. पण केनेडी साहेबानी त्याचं ऐकायला नकार दिला. ‘जिंकेपर्यंत हे युद्ध लढू’ अशी त्यांनी घोषणा केली.

अमेरिकेकडे तेव्हा ऑरेंज बॉम्ब म्हणून रासायनिक अस्त्रे होती. ते शिंपडल्यावर तो संपूर्ण भाग जळून जात असे. तेथील झाडे, जमीन दूषित होई आणि कित्येक वर्षे त्यावर पीक उगत नसे. त्यांनी याचा प्रचंड वापर सुरु केला. एक लाखापर्यंत व्यिएतनामी लोक यात या ना त्या प्रकारे मारले गेले.

हे युद्ध सुरु असताना केनेडींची हत्या झाली आणि जॉन्सन सरकार सत्तेत आले. त्यांनी अजून त्वेषाने हि लढाई लढली.

“कम्युनिस्टांच्या विरोधातला हा लढा आम्ही पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने लढू” असं त्यांनी जाहीर केलं.

यावर हो ची मिन्ह म्हणाले, “तुमच्याकडं अजूनही वेळ आहे. अमेरिका शरण येत असेल तर संध्याकाळी चहाला भेटून आपण शांतिकरार करू…

पण अमेरिकेला लढायचं असेल तर हे शेतकरी पुढची २० वर्षे लढायलाही तयार आहेत.”

यामुळे बाकीचे शेतकरी चवताळले. त्यांनी या युद्धात आपली पोरंबाळं पाठवायला सुरुवात केली.

गुयेन वान कोक या शेतकऱ्याचा पोरगा असाच सैन्यात दाखल झालेला. त्याला युद्धकला जास्त माहित नव्हती.

पण चपळ हालचालीच्या जोरावर या एकट्याने अमेरिकन सैन्याची २१ विमाने पाडली होती.

यामुळं जॉन्सन यांची जगभर नाचक्की झाली. विरोधी पक्षाचे नेते आणि माजी अभिनेते निकसन यांनी “माझ्याकडं युद्ध जिंकायचा सिक्रेट प्लॅन आहे” म्हणून आवई उठवली. १९६८ च्या निवडणुकीत याच ‘न सांगितलेल्या सिक्रेट प्लॅनवर’ निक्सन प्रचंड बहुमताने निवडून आले.

तिकडं शेतकऱ्यांनी डीएमला गाठून गोळ्या घातल्या होत्या. त्यामुळं आता अमेरिका लढेल तितकेच अवसान या युद्धात होते. काळ्या लोकांवर अमेरिकेत अत्याचार होतो म्हणून काळ्या सैनिकांनी त्यांना परत पाठवायची मागणी केली.

दरम्यान १९६९ ला हो ची मिन्ह यांचा मृत्यू झाला. तरीही शेतकऱ्यांनी मोठा लढा दिला. अमेरिकेचा धीर खचला होता. त्यामुळं हे युद्ध थांबवायला अमेरिका पुढं सरसावली.

“आम्ही शेतकऱ्यांचा निर्णय मान्य करत आहोत” असं म्हणून त्यांनी काढता पाय घेतला.

आपल्या काही अधिकाऱ्यांना त्यांनी चक्क नोबेल पारितोषिक देऊन टाकलं. तरीही या युद्धात शेतकऱ्यांनी आपला लढा सुरु ठेवला. १९७५ मध्ये त्यांनी राजधानी सायगाव जिंकून घेतली.

५८,२२० अमेरिकन सैनिकांचा यात नाहक बळी गेला होता. यातल्या ९१ सैनिकांचा शोध अजूनही घेतला जात आहे.

बलाढ्य महासत्तेला साध्या शेतकऱ्यांनी मिळून पाणी पाजले होते.

शेतकरी एकत्र आल्यावर जग बदलू शकतो आणि बेचिराख सुद्धा करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं.

त्यानंतर येथे शेतकऱ्यांनी आपले सरकार स्थापन केले. आज हा देश अतिशय आधुनिक आणि वेगाने प्रगती करणारा म्हणून प्रसिद्ध आहे .

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.