हृद्यविकारचा झटका आल्यास हे प्राथमिक उपचार करा.

हृदयविकार हा शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकला असेल. हृदयविकार हे नाव फार ढोबळ आहे. कारण ‘विकार’ म्हणजे ‘आजार’. हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह कमी किंवा बंद होणे यामुळे संबंधित भागातल्या स्नायूंचे पेशीसमूह मरतात. हे अचानक होत असल्याने त्याला ‘झटका’ असा शब्द पडला आहे.

हृदयस्नायूचा जास्त भाग निकामी झाला तर हृदयक्रिया बंद पडून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या स्वत:च्या रक्तवाहिन्या (रोहिण्या) असतात. हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे 70 वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या इतर कोठल्याही स्नायूपेक्षा जास्त जोरकसपणे, सातत्याने आणि नियमितपणे करावे लागते.

हृदयाच्या स्नायूंना रक्तप्रवाहामार्फत प्राणवायू पुरवण्याचे काम काही क्षण जरी बंद पडले तरी हृदय बंद पडू शकते. त्यामुळे हृदयक्रिया दोन-तीन मिनिटे जरी बंद झाली तरी मेंदूचे कामकाज थांबून मृत्यू ओढवू शकतो. भारतात हृदयाच्या आजारांमध्ये झडपांच्या दोषाखालोखाल याच आजाराचा क्रम लागतो. सुधारलेल्या देशांत तर हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. आपल्या देशातील श्रीमंत समाजातही असेच चित्र दिसते.

सर्वसाधारणपणे हा आजार चाळिशी – पन्नाशी- साठी या वयोगटांत जास्त प्रमाणात येतो.

स्त्रियांमध्ये याचे प्रमाण कमी आहे. स्थूलता, बैठे काम, अतिरक्तदाब, मधुमेह, तंबाखू व धूम्रपानाचे व्यसन असल्यास हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. कारणे हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.

रक्तपुरवठा कमी झाला, की थोडया श्रमाने देखील हृदयाला प्राणवायू कमी पडायला लागतो. जेव्हा हृदयाला जास्त कामाची गरज लागते त्या वेळी (उदा. व्यायाम, थंडीचे वातावरण, भीती भावना अनावर होणे, इ. ही कमतरता जाणवू लागते. प्रत्यक्ष हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधी बरेच दिवस रक्तवाहिन्यांमधील दोष सुरू झालेले असतात. हृदयाचा रक्त पुरवठा खंडित होण्यामागे कारणे असू शकतात.

कॉरोनरी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यात चरबीचे थर जमून त्या आतून गंजतात व अरुंद होतात. रक्तामध्ये चरबीचे प्रमाण वाढणे आणि धूम्रपान ही यामागची दोन प्रमुख कारणे आहेत. अति रक्तदाबामुळे हृदयावर जादा लोड/दबाव येतो त्यासाठी लागणारा हृदयाचा रक्तप्रवाह कमी पडतो.

कधीकधी भावनिक ताण ,राग, भीती अचानक येऊन कमकुवत हृदय बंद पडते. सिनेमात असे प्रसंग नेहमी असतात.

शक्यतेपेक्षा अधिक श्रम व जोर लावणे, काम/व्यायाम करणे. विशेष करून थंडीच्या वातावरणात असे केल्यामुळे रक्तपुरवठयाची वाढीव मागणी पूर्ण करता न आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

रक्ताच्या बारीक गाठी हृदय-रक्तवाहिन्यात अडकून प्रवाह बंद पडणे. हृदयवेदना रक्तपुरवठा काही सेकंद कमी पडला आणि परत चालू झाला तर हृदयाच्या जागी नुसती वेदना जाणवते. ही वेदना अगदी खोल घुसणारी, प्रचंड दाब असल्यासारखी जाणवते. या वेदनेला आपण हृदयवेदना असे म्हणू या. ही अगदी तीव्र कळ असते. या’हृदयवेदनेची’ विशिष्ट जागा, स्वरूप यांवरून ती ओळखता येते.

या अवस्थेत रुग्णाला योग्य उपचार व विश्रांती मिळाल्यास पुढचे नुकसान थोडे तरी टळू शकते. रक्तपुरवठा कमी किंवा बंद अशा अवस्थेत जास्त वेळ गेला तर हृदयाच्या संबंधित स्नायूच्या पेशी मरतात. मग ही वेदना दोन तीन दिवस तशीच राहते. त्याचबरोबर दम लागणे, घाबरे होणे, छातीत धडधडणे, (किंवा नाडीचे ठोके कमी पडणे), खूप घाम, इत्यादी लक्षणे दिसतात. जर हृदयाच्या स्नायूंचा मोठा भाग निकामी झाला असेल तर हृदयक्रिया बंद पडून मृत्यूही येऊ शकतो. काही वेळा झोपेत किंवा विश्रांतीतही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

रक्तपुरवठा बंद पडून मृत झालेल्या स्नायूंचे पाच-सहा आठवडयांत एका वेगळया प्रकारच्या चिवट पेशीमध्ये रुपांतर होते. तो भाग जोडपेशींनी भरून येतो. म्हणजे जखम भरून आल्यावर जो पांढरट सांधणारा भाग दिसतो तसा प्रकार होतो. ह्या भागाची स्नायूंप्रमाणे हालचाल होत नाही, पण हृदयात इतर उरलेल्या स्नायूभागांची वाढ होऊन काम चालू राहते. एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर तो परत येण्याची शक्यता असते. रोगनिदान पहिल्यांदा हृदयविकाराचा हा त्रास होतो तेव्हा ओळखण्यासाठी हृदयवेदनेची जागा व स्वरूप महत्त्वाचे असते. ही कळ छातीच्या मध्यभागापासून निघून डाव्या हाताच्या छातीलगतच्या बाजूला येते. याच्याबरोबर दम लागणे,घाम, इत्यादी त्रास असतो.

कधी कधी छातीत नुसतीच जळजळ किंवा खूप दम लागणे, पाठीकडे खूप दुखणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. काही जणांना काहीही लक्षण न जाणवताही हृदयविकाराचा झटका येतो पण ते जाणवत नाही. निदान होण्यासाठी तज्ज्ञाकडून तपासणी आवश्यक आहे.

इसीजीच्या मदतीने निदान होते. इसीजी म्हणजे हृदयाच्या सततच्या सूक्ष्म विद्युतप्रवाहांचा आलेख असतो. या आलेखातील बदलांवरून इतरही काही निष्कर्ष काढता येतात (उदा. हृदयाचा आकार, निरनिराळया कप्प्यांचे परस्पर संबंध, इ.).

प्रथमोपचार.

हृदयविकाराचा झटका येण्याआधी अनेक रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसून येतात. यामध्ये जरा चालल्यावर छातीत मध्यभागी दुखणे, छातीवर दाब आल्यासारखे, घुसमट झाल्यासारखे वाटणे, इ. अशा त्रासावर एक अत्यंत प्राथमिक उपयुक्त साधन म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्या सैल व रुंद करून रक्तप्रवाह सुधारणारे एक औषध नायट्रेटची गोळी.

हृदयवेदना आल्याआल्या ही गोळी लगेच जिभेखाली धरावी. काही सेकंदात औषध विरघळून जिभेखालच्या केशवाहिन्यांत शिरून रक्तात पसरते. रक्तावाटे हृदयाच्या रक्तवाहिन्यांत औषध पोचून तिथला रक्तपुरवठा सुधारतो. याबरोबर वेदना कमी होते. यावरून वेदना हृदयविकाराची आहे हे निश्चित कळते. त्याबरोबरच पुढील नुकसान टळते व हृदयपेशी तग धरू शकतात. त्याचबरोबर वेदना सुरु झाल्यापासून रुग्णास झोपवून ठेवावे.

कमीत कमी हालचाल करु द्यावी. पुढील सल्ल्यासाठी तज्ज्ञाकडे पाठवावे. हृदयविकाराची शक्यता क्वचित असली तरी ही अत्यंत स्वस्त असलेली गोळी नेहमी जवळ ठेवावी. यामुळे वेळप्रसंगी कोणालाही अत्यंत मोठी मदत होऊ शकेल. हृदयविकाराच्या रुग्णांनीही ही गोळी सदैव जवळ बाळगण्याची गरज आहे. या गोळीने रुग्णास जीवदान मिळू शकेल. या गोळीबरोबरच ऍस्पिरिनची एक गोळी चूर्ण करून पाण्यात मिसळून लगेच द्यावी. यामुळे रक्त जास्त प्रवाही होते व नुकसान टळते. यासाठी ऍस्पिरिनच्या लहान गोळया मिळतात. मात्र हा सल्ला डॉक्टरांकडूनच घ्यावा.

उपचार एकदा हृदयविकार झाला, की त्याचे परिणाम व पुढचे सर्व उपचार अत्यंत अवघड असतात. कधी रक्तवाहिन्या इतक्या निकामी होतात, की रक्तवाहिन्यांवर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून रक्ताला नवीन वाट करून देणे किंवा आतली चरबी खरवडून काढणे हेच उपाय उरतात. याशिवाय परत हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून सतत गोळया घेत राहावे लागते.

हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.