कोरोनाशी लढायला पहिली गोळी आलिये

कोरोना या साथीच्या रोगानं फक्त भारतालाच नाही, तर सगळ्या जगाला हैराण केलं. कोरोनाच्या थैमानानं संपूर्ण जगात ५० लाखांहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. वेगवेगळ्या कोरोना प्रतिबंधक लसींमुळं मृत्यूदरात प्रचंड घट झाली. तरीही व्हायरसच्या नव्या म्युटेशनसमोर लस चालेलच का याची खात्री नाही.

लसीमुळं काय होतं, तर कोरोनाचा फार त्रास होत नाही आणि हॉस्पिटल, गंभीर अवस्था अशा गोष्टी टाळल्या जातात. पण हे केव्हा होतं भिडू, लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच. कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्सचेही बरेच दुष्परिणाम दिसून आले. त्यामुळं टेन्शन कायम होतंच.

आता टेन्शन को मारो गोली, असं सहज म्हणता येईल. कारण कोरोनाशी लढायला खरंच एक गोळी आलिये. जिचं नाव आहे मोलनूपिराविर.

युनायटेड किंगडमनं या गोळीला मान्यता दिली असून, चाचण्या पूर्ण झाल्यावर वापरालाही परवानगी दिली आहे.

ही गोळी बनवणाऱ्या मेरेकचं म्हणणं आहे की, मोलनूपिराविर ही तोंडावाटे घेता येईल अशी कोविड-१९ विरुद्ध उपलब्ध असलेली पहिली गोळी आहे. तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमधून असं लक्षात आलंय की, या गोळीमुळं सौम्य किंवा मध्यम लक्षणं असणाऱ्या कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडली नाही आणि मृत्यूचा धोकाही टळला.

जवळपास ७७५ लोकांचा समावेश असलेल्या चाचणीच्या प्राथमिक निकालांवरून असं स्पष्ट झालंय की, ज्या रूग्णांना कोविड-१९ ची लक्षणं आढळून आल्याच्या पाच दिवसांच्या आत ही गोळी देण्यात आली त्यांच्यात हॉस्पिटलमध्ये जाण्याचं किंवा मृत्यू होण्याचं प्रमाण इतरांपेक्षा निम्म्यानं कमी आहे.

आता ही गोळी कसं काम करते?

व्हायरस आपलं पुनरुत्पादन करण्यासाठी एन्झाईम्सचा वापर करतात. ही गोळी त्याच एन्झाईम्सला टार्गेट करते. यामुळं व्हायरसच्या जेनेटिक्समध्ये झोल होतो आणि त्याला आपल्या प्रतिकृती बनवता येत नाहीत. साहजिकच व्हायरसची शरीरातली संख्या मर्यादित राहते आणि रुग्णाची प्रकृती गंभीर होत नाही. या गोळीचं उत्पादन करणाऱ्या मेरेकच्या म्हणण्यानुसार, कोविडच्या इतर व्हेरिएंट्सवरही मोलनूपिराविर प्रभावी ठरू शकते.

ब्रिटनच्या औषधे आणि आरोग्यसेवा उत्पादने नियामक संस्था, म्हणजेच MHRA नं या औषधाला मान्यता देताना ‘हे औषध शक्य तितक्या लवकर वापरात आणावं’ अशी शिफारस केली आहे. कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, लक्षणं दिसायला लागल्यापासून ५ दिवसांच्या आत ही गोळी देण्यात यावी, असंही त्यांनी सांगितलं आहे.

पैसे किती लागणार?

युनायटेड किंगडमनं ४ लाख ८० हजार गोळ्यांच्या पहिल्या कंत्राटासाठी आपण किती पैसे मोजले हे जाहीर केलेलं नाही. मात्र, अमेरिकेनं १.२ अब्ज डॉलर्स देत गोळीचे १७ लाख डोस मागवले आहेत. म्हणजेच एका गोळीला साधारण ७०० डॉलर इतका खर्च आहे. आता साहजिकच पुरवठा वाढल्यावर किंमत कमी होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या दोन्ही प्रकारच्या नागरिकांना ही गोळी देण्यात येईल. त्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी एक अभ्यास उपक्रम राबवण्यात येईल आणि त्याच्या निकालानुसार गोळ्यांचा दुसरा लॉट मागवायचा की नाही, याबद्दल निर्णय होईल.

या गोळीमुळं हॉस्पिटलच्या बाहेरच रुग्णांवर उपचार करणं शक्य होणार आहे. आता लसी घेतल्या असतील, तरी मास्क सॅनिटायझर वापरा. फक्त मोलनूपिराविरच नाही, तर आणखी गोळ्या आल्या तरी आपल्याला त्या घ्यायची गरज पडायला नाय पाहिजे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.