मुंबईच्या इंग्रज अधिकाऱ्याने पैसे खाण्यासाठी फ्लोरा फाऊंटनचं शिल्प उभारलं

मुंबई ही एक स्वप्ननगरी. मुंबईच्या गल्लीबोळातून, रस्त्यांवरून फिरलं तर या समृद्ध शहराचा ऐतिहासिक वारसा सुद्धा पाहायला मिळतो. कुठे टोलेजंग इमारती मध्ये असलेला क्लासिकपणा. तर कुठे लहानशा चाळीत असलेली मायेची संस्कृती अशा विभिन्न गोष्टींचा मिलाफ या शहरात दिसून येतो.

मुंबई ही निर्माण झाली नाही तर ती घडवली गेली आहे.

आजही सीएसटीची इमारत पाहिली किंवा मरीन लाईन्सचा कट्टा अनुभवला तर एक गोष्ट मात्र जाणवते, ती म्हणजे या शहराला घडवणारी माणसं ही दर्दी असावी. त्यांचं या शहरावर निस्सीम प्रेम असावं. मुंबईमध्ये अनेक शिल्प, वास्तू यांना एक ऐतिहासिक महत्त्व आहे.

अशाच एका लोकप्रिय शिल्पाचा इतिहास आज उलगडणार आहोत. ते शिल्प म्हणजे ‘फ्लोरा फाउंटन’.

सध्याच्या धावपळीच्या काळात सहसा त्या शिल्पाकडे लक्ष जात नाही. चर्चगेट आणि सीएसटी या रस्त्यांना जोडणारा मुख्य दुवा म्हणजे फ्लोरा फाऊंटन. मुंबईत जेव्हा काळाघोडा हा फेस्टीव्हल सुरू असतो. तेव्हा या ठिकाणी विशेष गर्दी असते.

बरं, आमच्यासारख्या वाचक प्रेमींना फ्लोरा फाउंटन हे खास जवळचं. कारण या फाऊंटन जवळ असणाऱ्या रस्त्यांवर पुस्तकं विक्रेते असतात.

कोणतेही पुस्तक घ्या फक्त १०० रुपये’

अशी पाटी लावणाऱ्या या पुस्तक विक्रेत्यांकडे आपसूक एक फेरफटका मारावासा वाटतो. तुम्ही वाचनप्रेमी नसाल तरीही फ्लोरा फाऊंटन नजीकच्या रस्त्यांवर पुस्तकांकडे बघत जाण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही.

फ्लोरा फाऊंटन कसं निर्माण झालं याची कहाणी मोठी रंजक आहे.

कारण ज्या माणसाने हे शिल्प निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, त्याच माणसावर पुढे पैशांचा गैरव्यवहार करण्याचा आरोप ठेवण्यात आला. पण त्याच्यामुळे का होईना ‘फ्लोरा फाऊंटन’ हे शिल्प आज मुंबईची शान म्हणून ओळखलं जातं.

फ्लोरा फाउंटनच्या निर्मितीची गोष्ट १८६९ सालची.

सर्वप्रथम हे शिल्प मुंबईच्या रस्त्यांवर बसवण्यात येणार नव्हतं. हे शिल्प लंडनला बनवण्यात आलं आहे. मुंबई येथे असणाऱ्या ‘ऍग्री- हॉर्टी कल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया.’ या संस्थेसाठी हे शिल्प बनवण्यात आलं होतं. तेव्हाच्या राणी व्हिक्टोरिया गार्डनमध्ये हे शिल्प बसवण्यात येणार होतं.

व्हिक्टोरिया गार्डन म्हणजे सध्याचं राणीबाग.

हे शिल्प बनवण्याची सर्व तयारी सुरू होती. लंडन येथील जो शिल्पकार हे शिल्प बनवत होता, त्याला २७ हजार रुपये देण्यात आले होते. तसेच शिल्प पूर्ण झाल्यावर त्या शिल्पकाराला आणखी ९० हजार रुपये देण्यात येणार होते.

परंतु झालं मात्र उलटंच. १८६५ साली मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आली होती. त्यामुळे जी संस्था शिल्प खरेदी करणार होती त्या संस्थेने शिल्प खरेदी करण्याचा विचार सोडून दिला आणि आगाऊ दिलेले पैसे परत मागितले.

त्यावेळी मुंबईचा पालिका आयुक्त होता ऑर्थर क्रॉफर्ड.

ऑर्थर त्यावेळी मुंबईचा पालिका आयुक्त होताच शिवाय तो शिल्प खरेदी करणाऱ्या संस्थेच्या सोसायटीचा अध्यक्ष होता. तसेच फोर्ट भागातील ज्या व्यापाऱ्यांची घरं मोठ्या रस्त्यांवर होती अशा व्यापाऱ्यांच्या फी फंडाचाही प्रमुख होता.

ऑर्थरला शिल्प खरेदी करण्यामागे स्वतःचा स्वार्थ दिसला.

ऑर्थरने शिल्पकाराचं नाव पुढे करून आगाऊ दिलेले २७ हजार रुपये परत मिळणार नाहीत, असं सांगितलं. तसेच ऑर्थर क्रॉफर्डने एक लाख १७ हजार रुपयांचे एक शिल्प आपल्याला फक्त ९० हजारात मिळतंय, असं व्यापारी संघटनेला सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले.

ऑर्थरच्या या गोष्टीला मात्र व्यापारी संघटनेचा विरोध झाला.

त्यामुळे ऑर्थरने कस्तुरजी फर्दुनजी शेख या व्यापाराच्या मनात भरवून त्याला या शिल्पासाठी वीस हजार ५०० रुपयांची देणगी देण्यास भाग पाडले. तो ज्या व्यापारी फंडाचा अध्यक्ष होता त्या लोकांना कळू न देता त्याने उरलेली रक्कम फी फंडामधून भरली आणि हे शिल्प त्याने लंडनहून मुंबईत आणले.

अखेर १८६९ च्या नोव्हेंबर महिन्यात हे शिल्प बसवण्यात आले.

या शिल्पासंबंधी अर्थात फ्लोरा फाउंटनविषयी सांगायचं झालं तर…

हुतात्मा चौक परिसरात हे शिल्प म्हणजेच एक फ्लोरा नामक कारंजं आपल्याला पाहायला मिळतं. फ्लोरा फाउंटन शिल्पावरील सर्वात उंचावर असलेल्या तरुणीच्या डाव्या हातामध्ये एक गोलाकार हार गुंफलेला आहे. तिने घातलेला झगा वाऱ्यावर उडत असल्याचा भास होतो. शिल्पाच्या थोडं खाली चार दिशांना उडी घेणारे चार मोठे मासे आहेत.

चुन्यामातीचा वापर करून दगडामध्ये हे संपूर्ण कारंजं बनवण्यात आले आहे.

या शिल्पाच्या आतून वाहणारे पाणी कसे फिरते, यात या शिल्पाची कलात्मकता दडलेली आहे. यामुळे शिल्पाकडे एकटक पाहताना शिल्पकाराने कल्पना केलेली फ्लोरा नामक तरुणी या झऱ्यातून उड्या मारत पाण्यात खेळत असावी, असा भास होतो.

या शिल्पाच्या खाली मध्यभागी चार कोपऱ्यांवर चार पुष्पकन्या कोरण्यात आल्या आहेत.

या शिल्पामधली कलात्मकता इतकी गहिरी आहे की संपूर्ण शिल्पांमध्ये असलेल्या पाचही तरुणींची लकब, त्यांच्या अदा एकमेकांपासून भिन्न आहेत. शिल्पकाराचं विशेष कौतुक अशासाठी की या पाचही तरुणी काहीशा विवस्त्र असल्या तरीही, या शिल्पाकडे बघताना कुठलीही गोष्ट खटकत नाही उलट या पाचही तरुणींच्या जवळ असलेली सौंदर्यता दृष्टीस पडते.

रोम हा देश अशाच शिल्पाकृतींचं शहर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तशी शिल्प डोळ्यासमोर ठेवून शिल्पकाराने फ्लोरा फाउंटनची निर्मिती केली असावी.

भिडुंनो तुम्हाला सांगुन विश्वास बसणार नाही, पण हा शिल्पकार कधीही मुंबईत आला नाही आणि दुर्दैवाने फ्लोरा फाउंटनवर या शिल्पकाराचं नाव देखील कोरण्यात आलेलं नाही.

तुम्हाला वाचताना कळालं असेल की ,

ऑर्थर क्रॉफर्ड या पालिका आयुक्ताने स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी हे शिल्प लंडनहून मुंबईत आणलं.

त्यासाठी त्याने पराकोटीचा गैरव्यवहार केला होता. ऑर्थरची ही काळी बाजू उघडकीस आल्यावर त्याच्यावर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला. आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याने जरी गैरव्यवहार करून हे शिल्प मुंबईत आणलं असलं, तरी आज त्याच्यामुळे का होईना हुतात्मा चौकाच्या रस्त्यावर मध्यभागी असलेलं ‘फ्लोरा फाउंटन’ आजही त्याच दिमाखात स्वतःची सुंदरता दाखवत मुंबईची शोभा वाढवत आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.