गांधीजींनी ज्या नौखालीला संप्रदायिकतेपासून वाचवलं होतं तेच आज बांग्लादेशात दंगलीत जळत आहे

बांग्लादेशात हिंदू समाजातील लोकांना टार्गेट करण्याच्या घटना  सतत पाहायला मिळतात. आताही असचं काहीस चित्र पाहायला मिळतंय. हिंदूंची मंदिर पाडली जातायेत, लोकांना मारहाण केली जातेय, हिंसेच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. महत्वाचं म्हणजे हे सगळं मोठ्या प्रमाणात घडतंय ते बांग्लादेशाच्या नौखालीमध्ये. जिथे महात्मा गांधींनी १९४६ मध्ये हत्याकांड थांबवले होते.

तिथल्या हिंसाचाराच्या या घटना आधीपासूनचं चालत आल्यात म्हणजे स्वातंत्र्यानंतर. देशाच्या स्वातंत्र्यानंतर नोआखली पूर्व पाकिस्तानचा एक भाग झाला आणि १९७१ मध्ये पाकिस्तानच्या विभाजनानंतर बांग्लादेशाचा एक भाग बनला.

काँग्रेस नेते डॉ. बिधानचंद्र राय यांनी १८ ऑक्टोबर १९४६ रोजी महात्मा गांधींना सांगितले की, नौखालीतील परिस्थिती बिघडत आहे. हिंदूंची हत्या केली जातेय आणि हिंदू स्त्रियांना त्रास दिला जातोय. मुहम्मद अली जिना यांच्या थेट कारवाईनंतर, कोलकातामध्ये झालेल्या हिंसा आणि हत्याकांडाचा परिणाम नोआखलीमध्येही झाला. गांधींनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले आणि  नोआखलीला जाण्याचा निर्णय घेतला.

६ नोव्हेंबर १९४६ रोजी गांधीजी नौखालीला रवाना झाले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबरला तेथे पोहोचले. महात्मा गांधींसोबत त्यांचे वैयक्तिक सचिव प्यारेलाल नायर, डॉ.राम मनोहर लोहिया, जे.बी. कृपलानी, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू, त्यांचे विशेष सहकारी आभा आणि मनु सुद्धा होते.

९ नोव्हेंबर रोजी बापू अनवाणी पायाने नौखाली दौऱ्यावर गेले. त्यांनी ११६ मैल अंतर कापले आणि पुढील सात आठवड्यांत ४७ गावांना भेट दिली. मुस्लिम लीग सरकारकडून सर्व प्रकारचा दबाव असूनही तिथल्या हिंदू समुदायासाठी गांधी चार महिने पायी चालत गेले.

७७ वर्षीय गांधींनी तेथे प्रार्थना सभा घेण्यास सुरुवात केली, स्थानिक मुस्लिम नेत्यांना भेटले आणि त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. गांधींनी नौखाली सोडण्यापूर्वी, तेथे गोष्टी बऱ्यापैकी सामान्य झाल्या होत्या. नोआखली नंतर ते बिहार, कलकत्ता आणि शेवटी दिल्लीतील दंगली थांबवण्यासाठी निघाले.

बॅरिस्टर हेमंतकुमार घोष यांनी त्यांना सुमारे २००० एकर जमीन दान केली. तेथे गांधी आश्रमाची स्थापना झाली जिथे आजही बापूंचा पुतळा बसवलेला आहे. पाकिस्तानच्या स्थापनेनंतर सर्व गोंधळ आणि कायदेशीर लढाई असूनही, गांधी आश्रम अजूनही तिथेच आहे.

मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. हिंदूंविरुद्ध हिंसाचाराचं सत्र पुन्हा एकदा सुरु झालंय. पण आता प्रश्न पडतो कि, बांग्लादेशात परत या गोष्टी का घडतायेत.

खरं तर अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीचा परिणाम नोआखलीमध्येही पाहायला मिळतोय. नोआखलीमध्ये अबुल अला मौदुदी यांनी स्थापन केलेल्या कट्टरपंथी जमात-ए-इस्लामीची एक शाखा देखील आहे जी बांगलादेशात शरिया लागू करण्याचा प्रयत्न करीत आहे. बेगम शेख हसीना उदारमतवादी आहेत पण मूलतत्त्ववाद्यांसमोर असहाय आणि असमर्थ दिसतात.

सध्या नौखाली पुन्हा पेट घेतंय. बांगलादेशात दुर्गापूजेदरम्यान सुरू झालेल्या हिंदूंविरोधातील हिंसाचाराची नवी फेरी गेल्या आठवड्यापासून सुरू आहे.  काही दिवसांपूर्वी धार्मिक कट्टरपंथीयांच्या जमावाने नोआखली भागातल्या इस्कॉन मंदिराचीही तोडफोड केली. हल्लेखोरांनी मंदिरात असलेल्या भाविकांना मारहाण केली.

ताज्या हिंसाचारात मुस्लिम कट्टरपंथी हल्लेखोरांच्या एका गटाने हिंदूंच्या ६६ घरांचे नुकसान केले आणि सुमारे २९ घरांना आग लावली. एका अहवालानुसार, रविवारी रात्री, राजधानी ढाकापासून सुमारे २५५ किलोमीटर दूर असलेल्या रंगपूर जिल्ह्यातील पीरगंजमधील एका गावात शंभरहून अधिक लोकांच्या जमावाने आग लावली.

कोमिला परिसरातील दुर्गा पूजा पंडालमध्ये कथित ईशनिंदानंतर पसरलेल्या जातीय तणावामुळे आग लावण्याची घटना घडली. गेल्या आठवड्यात कोमिला परिसरातील घटनेमुळे हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आणि कोमिला, चांदपूर, चटग्राम, कॉक्स बाजार, बंदरबन, मौलवीबाजार, गाझीपूर, फेनीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिस आणि हल्लेखोरांमध्ये संघर्ष झाला.

याआधीही २०१३ साली जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान हिंदूंवर ३,६७९ हल्ले करण्यात आले होते.

आता या सगळ्याच घटनांचा परिणाम बांग्लादेशातल्या हिंदूंवर पाहायला मिळतोय. असं म्हणतात कि, १९४६ च्या हिंसेवेळी हजारो हिंदूंना मुस्लिम बनवण्यात आलं. १९४७ मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली, तेव्हा बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या तिथल्या लोकसंख्येच्या ३० ते ३५ टक्के  होती. पण आता २०११ च्या जनगणनेनंतर हिंदू देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ८ टक्के राहिले आहेत.

जर बांग्लादेशच्या बातम्यांवर नजर टाकली तर आपल्याला पाहायला मिळेल की, तिथं एखादाचं दिवस जात असेल, जेव्हा मूलतत्त्ववादी कोणत्याही हिंदू स्त्रीशी गैरवर्तन करत नाहीत. त्यात तिथल्या सरकारने आधीच हात वर केलेत,अश्या परिस्थितीत तिथं पुन्हा एकदा गांधीजींसारख्या शांतिदूतांची गरज भासू लागली आहे. 

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.