नेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी उतरवून गोव्याला स्वतंत्र केलं

निवडणूक गुजरातमध्ये चालली आहे, पण प्रचारात मात्र देशभरातले मुद्दे चर्चेत येत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरतमध्ये प्रचाराचा पहिला टप्पा संपण्याच्या पूर्वी पत्रकारांशी बोलतांना  काँग्रेसवर टीका केली.

ते म्हणाले की,

जे आज भारत जोडो यात्रेत निघाले आहेत, त्यांच्या पक्षाने गोवा भारताचा भाग व्हावा यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. काँग्रेस तेव्हा सत्तेत होती तरीही गोव्याच्या स्वातंत्र्यसाठी प्रयत्न केले नाहीत. गोव्याचा स्वातंत्र्य लढा तिथल्या लोकांच्या जाबदारीवर सोडून दिला. गोव्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांनी पोर्तुगीजांशी लढून गोव्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं.”

प्रमोद सावंत यांनी काँग्रेस सत्तेत असतांना सुद्धा काहीही केलेलं नाही असं म्हणून अप्रत्यक्ष रित्या तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली आहे. मात्र खरंच तत्कालीन काँग्रेस सरकारने आणि पंडित नेहरूंनी गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नव्हते का? हा प्रश्न गोवा मुक्तिसंग्रामाच्या काळापासूनच वादाचा मुद्दा राहिला आहे.

जरी या मुद्द्यावर वादविवाद असले तरी नेहरूंनी गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी काहीच केलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल.

कारण जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू हेच सत्ताधारी काँग्रेसचे प्रमुख नेते होते. तर १९६१ साली गोव्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुद्धा पंडित नेहरूंचा काँग्रेसचे प्रमुख नेते होते. जरी गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून स्वतंत्र होण्यासाठी १४ वर्षांचा उशीर झाला असला तरी नेहरूंच्याच पुढाकाराने केलेल्या मिलिटरी कारवाईमुळे गोव्यात पोर्तुगीजांनी आत्मसमर्पण केलं होतं.

पण असं असलं तरी नेहरू आणि काँग्रेसवर गोव्याला पारतंत्र्यात ठेवल्याची टीका का केली जाते?

तर यामागे स्वातंत्र्य लढ्याची परिस्थिती, काँग्रेसने घेतलेली भूमिका आणि नेहरूंनी गोव्याच्या बाबतीत घेतलेली शांततेची भूमिका जबाबदार मानली जाते. गोव्यावर कब्जा करणाऱ्या पोर्तुगीजांनी तब्बल ४५० वर्ष गोव्यावर राज्य केलं होतं. परंतु भारताचा स्वातंत्र्यलढा सुरु असतांना गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रश्न समोर आणणे काँग्रेसला तितकंसं योग्य वाटलं नाही असं सांगितलं जातं.

कारण जर गोव्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित झाला तर पोर्तुगाल या आणखी एका देशाबरोबर लढा सुरु होईल आणि अख्या देशावर ठाण मांडून बसलेल्या ब्रिटिशांबरोबर सुरु असलेला लढा विचलित होईल असं काँग्रेस नेत्यांना वाटत होतं. त्यामुळे गोव्यात काँग्रेसचे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आलं असं सांगितलं जातं.

परंतु १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा गोव्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, त्यामुळे हा लढा पुन्हा सुरु झाला.

समाजवादी नेते राममनोहर लोहिया आणि महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी दीर्घ लढा दिला, यासाठी अनेकांनी तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्यसैनिक लढा देत असतांना नेहरूंनी गोव्याच्या बाबतीत शांतता आणि चर्चेचा मुद्दा स्वीकारला होता.

नेहरूंच्या या भूमिकेमागे काही कारण सांगितली जातात. 

१) स्वतंत्र भारताने अलिप्ततावादाचं धोरण स्वीकारलं होतं आणि यात पंचशील तत्वांचा स्वीकार केला होता. या नियमानुसार कोणत्याही देशाच्या मुद्द्यात हस्तक्षेप न करता शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला होता.

२) गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं, पोर्तुगाल नाटो या संघटनेचा सदस्य देश होता त्यामुळे गोव्यावर मिलिटरी कारवाई केल्यास नाटो देशांकडून भारतावर आक्रमण होण्याची भीती होती.

म्हणून नेहरूंनी २७ फेब्रुवारी १९५० रोजी पोर्तुगालबरोबर शांततामय मार्गाने चर्चेला सुरुवात केली. यासाठी त्यांनी पणजीत भारताचं राजदूत नेमलं तर मुंबईत पोर्तुगालच्या राजदूताची नेमणूक करण्यात आली. नेहरू या मुद्द्यावर शांतनेने चर्चा करत होते परंतु पोर्तुगालचे हुकूमशाह सालाझारने गोव्यावरील हक्क कोणत्याही किंमतीवर सोडण्यास नकार दिला.

परंतु भारतीय आणि गोव्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध आंदोलन सुरूच ठेवलं होतं.

यात अनेकदा हिंसा व्हायची, ज्यात आंदोलनकर्त्यांचा जीव सुद्धा जात होता. असंच एक आंदोलन १५ ऑगस्ट १९५५ रोजी करण्याचं ठरवण्यात आलं. यासाठी देशातून अनेक स्वातंत्र्यसैनिक गोव्यात दाखल होत होते. तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण करतांना नेहरूंनी भारतीयांना गोव्यात न जाण्याचा सल्ला दिला, सोबतच भारत सरकार गोव्यातील लोकांच्या मदतीला मिलिटरी पाठवणार नाही असं सुद्धा म्हटलं.

परंतु नेहरूंच्या सल्ल्याला न जुमानता स्वातंत्र्य सैनिक गोव्यात गेले, आंदोलन झालं. या आंदोलनावर चिडलेल्या पोर्तुगीजांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात गोव्यातील २२ स्वातंत्र्यसैनिक शाहिद झाले तर २२५ जण जखमी झाले. यात नेहरूंनी स्वातंत्र्यसैनिकांनी मदत केली नाही परंतु गोव्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा सोडून दिला नव्हता.

गोव्याच्या स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ नेहरूंनी मुंबईमध्ये दोन रॅली काढल्या.

२ ऑक्टोबर १९५५ आणि ४ जून १९५६ रोजी नेहरूंनी गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भव्य रॅली काढल्या, परंतु पोर्तुगीज सरकारवर त्याचा परिणाम झाला नाही. त्यामुळे चिंतीत झालेल्या नेहरूंनी १९५७ मध्ये गोव्यावर मिलिटरी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. परंतु पोर्तुगीजांनी गोव्यावर लावलेल्या निर्बंधांमुळे हा निर्णय मागे घेण्यात आला.

परंतु या कारवाईला १९६० मध्ये जोर आला. पोर्तुगालने आफ्रिका आणि आशिया खंडातील वसाहतींना स्वातंत्र्य द्यावं असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मांडण्यात आला होता. तेव्हा पोर्तुगालने हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. तेव्हा ऑक्टोबर १९६१ नेहरूंनी आफ्रिकी वसाहतींमधील नेत्यांबरोबर चर्चा सुरु केली.

त्यानंतर गोव्यात दिवसेंदिवस बिघडणारी परिस्थिती लक्षात घेऊन नेहरूंनी मिलिटरी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी भारत सरकारने डिसेंबर १९६१ मध्ये ऑपरेशन चटनीला सुरुवात केली. या ऑपरेशानुसार पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. गोव्याच्या अंजद्विपावर कब्जा करण्याचा ग्राउंड असॉल्ट प्लॅन बनवण्यात आला. भारताच्या आईएनएस त्रिशूल आणि म्हैसूरच्या हल्ल्यात पोर्तुगीजांनी हार मानली आणि १८ डिसेंबर १९६१ रोजी हा द्वीप भारताच्या ताब्यात आला. 

ऑपरेशन चटनीसोबतच ऑपरेशन विजय सुरु करण्यात आलं.

८ डिसेंबर १९६१ पासून भारतीय वायुसेनेचे विमान आणि बॉम्बर्स गोव्यावर उडायला लागले. ११ डिसेंबरला भारताचे ३० हजार सैनिक बेळगावला पोहोचले, १७ डिसेंबरला सैनिकांना गोव्यात शिरण्याचे आदेश देण्यात आले. भारताच्या तिन्ही दलांनी केलेल्या कारवाईत एकाच दिवसात बिचोलिम आणि  मॉलिनगुएम शहर भारताच्या ताब्यात आले. 

त्यानंतर १८ डिसेंबरला भारताच्या युद्धनौकांनी समुद्रातून हल्ला केला तर आर्मीने जमिनीवरून हल्ला केला. त्यांच्या मदतीला वायुसेना हवेत होतीच. या हल्ल्यात भारताचे ३४ सैनिक शाहिद झाले आणि ५१ सैनिक जखमी झाले. तर पोर्तुगालचे ३१ सैनिक ठार झाले तर ५७ जण जखमी झाले. त्यानंतर पोर्तुगालच्या ४, ६६९ सैनिकांनी भारतासमोर आत्मसमर्पण केलं आणि गोव्याला स्वातंत्र्य मिळालं.

अखेर भारताने केलेल्या मिलिटरी कारवाईत गोवा स्वतंत्र झाला. परंतु १४ वर्ष पंडित नेहरूंनी शांततामय मार्गाचा स्वीकार केल्यामुळे त्यांनी गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काहीच काम केलं नाही असा आरोप केला जातो. तसेच नेहरूंनी शांततेची भूमिका ही निव्वळ स्वतःची इमेज जपण्यासाठी घेतली होती असा सुद्धा आरोप केला जातो. परंतु १९६१ मध्ये पंडित नेहरूंच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईमुळे गोवा स्वतंत्र झाला हे नाकारता येणारे नाही.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.