बाळासाहेब म्हणाले,” गोपीनाथराव हंगामी मुख्यमंत्री आहात तर आश्वासन सुद्धा हंगामी ठेवू नका.”

बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे संबंध महाराष्ट्रावर असणारे गारुड, त्यांच्यावर असलेली शिवसैनिकांची भक्ती, त्यांची अखंड टिकलेली लोकप्रियता हा कोणत्याही विश्लेषणापलीकडचा विषय आहे. राजकारणाच्या रणधुमाळीत राहूनही ते अजातशत्रू राहिले. विरोधकांवर देखील त्यांनी प्रेमच केलं.

आणि जे मित्र होते त्यांच्यासाठी तर बाळासाहेब आदी कोणत्याही टोकाला जाण्यासाठी तयार असायचे. त्यात राजकारणाचे कोणते हिशोब नसायचे. निष्पक्षपाती पणा कसा असावा, हे त्यांच्याकडून शिकावे !

असाच बाळासाहेबांच्या मनाच्या उमदेपणाचा किस्सा गोपीनाथ मुंडे यांनी सांगितला आहे.

पुढे १९९५ मध्ये जेव्हा युतीची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे अशी वाटणी करण्यात आली होती.

मनोहर जोशी मुख्यमंत्री तर मुंडे उपमुख्यमंत्री झाले. गोपीनाथरावांना त्यासोबत महसूलमंत्रीपद हवे होते. युतीतील जागा वाटपानुसार महसूल भाजपकडे जाणार होते.

पण बाळासाहेबांनी जागावाटपात चक्क बदल केला. त्यांनी आपल्या वाट्याला आलेले गृहमंत्रीपद गोपीनाथ मुंडेंना दिले आणि सेनेच्या सुधीर जोशी यांच्यावर महसूलमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. तेव्हा त्यांनी गोपीनाथ मुंडेंना बजावून सांगतलं,

“गृहमंत्रीपदावर तुझ्यासारखा आक्रमक व कणखर माणूस हवा. मुंबईतील गुन्हेगारीशी मुकाबला करायचा असेल तर तूच त्या जागी पाहिजे.”

बाळासाहेब दिलेल्या शब्दाला जागणारे होते. आपल्या पक्षाच्या फायद्या तोट्याची गणिते न करता त्यांनी मराठी माणसाचा फायदा कशात आहे याचाच विचार केला.

याच युती शासनाच्या काळातली आणखी एक आठवण.

पुण्यतील बालगंधर्वमध्ये एका सन्स्थेचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. गोपीनाथ मुंडे यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. तेव्हा त्यांच्या सोबत पुस्तक प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील हजर होते.

 त्या वेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी परदेशी गेले होते आणि उपमुख्यमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार होता. त्यामुळे गोपीनाथरावांचं तेव्हा स्वागत हंगामी मुख्यमंत्री म्हणूनच करण्यात आलं.

पुण्यातले अनेक दिग्गज मान्यवर या कार्यक्रमाला हजर होते. संपूर्ण सभागृह भरलं होतं. पुस्तक प्रकाशन झालं, पाहुण्यांची भाषणे सुरु होती. गोपीनाथरावांच भाषण सुरु होण्यापूर्वी कार्यक्रमाच्या संयोजकांनी शासनाने पूर्वी दिलेल्या एका आश्वासनाची पूर्तता केली नाही, अशी तक्रार केली. 

त्यावर बोलताना गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हणाले,

‘तुमची तक्रार बाळासाहेबांसमोरच असल्यामुळे मला आता त्याची पूर्तता करणे भाग

आहे आणि मी ती महिनाभरात करतो,’

त्यानंतर पुढचं भाषण बाळासाहेबांचं होणार होतं. बाळासाहेब ठाकरे म्हणजे धडाडती तोफच. ते आपल्या भाषणात काय बोलणार याची सगळ्यांना उत्सुकता होतीच. बाळासाहेब म्हणाले,

 ‘गोपीनाथराव, तुम्ही खरोखरच आश्वासनाची पूर्तता कराल अशी मला आशा आहे. नाही तर सांगाल, आश्वासन दिलं, त्या वेळी मी हंगामी मुख्यमंत्री होतो, म्हणून माझं आश्वासनही हंगामीच होतं.”

संपूर्ण बालगंधर्व रंगमंदिरात त्यावेळी एकच हशा पिकला. गोपीनाथ मुंडे यांनी खरंच आश्वासन पूर्ण केलं कि नाही माहित नाही. पण बाळासाहेबांचा हजरजबाबी पणा पुणेकरांनी लक्षात ठेवला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.