काश्मिरमध्ये डिपॉझीट जप्त झालेल्या उमेदवाराला वाशिमच्या मतदारांनी २ वेळा निवडून दिलं.

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खा. गुलाब नबी आझाद हे आज राज्यसभेमधून निवृत्त झाले. त्यांच्या या निवृत्तीसोबतच लक्ष वेधून घेतलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अश्रूंनी. आझाद यांच्या निरोप समारंभावेळी मनोगत व्यक्त करताना आणि आठवणी सांगताना मोदी अक्षरशः भारावून गेलेले पाहायला मिळाले.

यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील सभागृहात आझाद यांच्यासोबतच्या काही आठवणी सांगितल्या. यातील एक आठवण होती ती म्हणजे,

आझाद जरी मूळचे जम्मू काश्मिरचे असले तरी त्यांची संसदीय कारकीर्द मात्र सुरु झाली होती ती महाराष्ट्रातील वाशिम मतदारसंघातुन.

आझाद आणि महाराष्ट्र यांचं पहिल्यापासूनच एक विशेष नातं राहिलं आहे. अगदी आजही त्यांनी न विसरता वाशिमकरांची आवर्जून आठवण काढली. आपल्या राजकारणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच इथल्या जनतेनं आपल्याला आधार दिला, सांभाळून घेतलं, आणि निवडून देखील पाठवलं यामुळेच आपल्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत वाशिमच्या मतदारांचे ऋण कदापि फेडू शकणार नसल्याच ते सांगतात. 

आता या एवढ्या सगळ्या आभार प्रदर्शनानंतर जम्मू काश्मिरच्या या नेत्याची सुरुवात त्यांच्या राज्यापासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या विदर्भातील या जिल्ह्यातून कशी झाली असा प्रश्न सगळ्या भिडूंना पडला नसता तरचं नवल. तर सांगतो, याच उत्तर देण्यासाठी हा लेख.

गुलाब नबी आझाद यांच्या काँग्रेस पक्षासोबतच्या राजकारणाला आता जवळपास ५० वर्षपेक्षा जास्त कालावधी पूर्ण होत आहेत.

साधारण १९६८ च्या दरम्यान श्रीनगरच्या एस. पी. कॉलेजमधून परीक्षेतील कॉपी विरोधातील अभियानातून ते पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले. १९७२ साली एम. एसस्सीची पदवी घेतल्यानंतर ते आपल्या भलेसा या गावी परतले. तिथं त्यांचे वडील रेमतुल्लाह भट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाला तालुका काँग्रेसचे सचिव बनवलं.

याच दरम्यान ते पक्षात वरिष्ठ पण तरुण असलेल्या संजय गांधी यांच्या संपर्कात आले, ते पक्षात कायमच तरुणांना सक्रिय करण्यासाठी आग्रही होते, याच आग्रहातून २१-२२ वर्षाच्या आझाद आणि गांधी यांची चांगली ओळख झाली आणि इथूनच त्यांची पक्षातील प्रगती देखील चालू झाली.

पुढे दोनच वर्षात म्हणजे १९७५ साली संजय गांधी यांनी आझाद यांना थेट राज्याच्या युवक काँग्रेसचं अध्यक्ष बनवलं. 

एव्हाना पक्षाचे प्रमुख नेते बनलेले आझाद यांना आता संजय गांधींच्या विश्वासाच्या वर्तुळात गणले जावू लागले होते. १९७७ मध्ये दोडा जिल्हा काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव बनवण्यात आलं. अवघ्या ५ वर्षात आझाद यांनी तालुक्याच्या राजकारणापासून सुरुवात करून राष्ट्रीय राजकारणात ते सक्रिय झाले होते.

अशातच त्यावर्षी जुलैमध्ये राज्य विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या. आणीबाणी नंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणूका होत्या. देशात काँग्रेस विरोधी लाट होती, मार्चमध्ये झालेल्या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये ती स्पष्ट पणे जाणवली होती. काँग्रेसचा तर मोठा पराभव झालाच होता शिवाय स्वतः इंदिरा गांधी पडल्या होत्या.

त्यामुळे या विधानसभा निवडणुकांवर काँग्रेसने बरेच लक्ष केंद्रित केलं होतं. समोर नव्याने शक्ती गवसलेला शेख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स होता. काँग्रेसने पक्षाला आलेली पराभवाची मरगळ झटकून टाकण्यासाठी तरुण नेत्यांना प्रचारात आणि अगदी रिंगणात देखील उतरवले होते. संजय गांधी यांच्या विश्वासातील नाव यात जास्त होती. यातीलच एक नाव होतं गुलाब नबी आझाद यांचं. 

इंदेरवाल या मतदारसंघातून त्यांना रिंगणात उतरवलं होत. समोर नॅशनल कॉन्फरन्सचे गुलाम मोहम्मद शेख हे तगडे उमेदरवार होते. आणि दुसरं आव्हान होतं जनता पक्षाच्या अब्दुल घनी गोणी यांचं. तिन्ही पक्षांकडून प्रचार जोरात झाला.

पण निकालामध्ये काँगेस विरोधी लाट अद्याप देखील होती, काँग्रेसचा पराभव झाला होता. १९७२ च्या निवडणुकीत ५८ जागांवर असलेला पक्ष यंदा थेट ११ जागांवर घसरला होता. तर ७६ पैकी ४७ जागा जिंकत नॅशनल कॉन्फरन्सने मैदान मारलं होतं. काँग्रेसच्या उमेदवारांना डिपॉझिट पण वाचवता आलं नव्हतं.  

गुलाब नबी आझाद यांना तर ९५९ मत मिळाली होती. त्यांचं देखील डिपॉझिट जप्त झाले होते.

पण त्यानंतर देखील त्यांचं पक्षातील स्थान आणि महत्व कमी झालं नव्हतं.

त्यानंतर १९८० मध्ये लागलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सगळी जबाबदारी संजय गांधी यांच्यावर होती. पक्षाच्या तिकीट वाटपापासून ते अगदी प्रचारपर्यंतची सगळी जबाबदारी त्यांनीच पार पडली होती. युवा नेत्यांना संधी देऊन राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणतं होते. जेव्हा जम्मू काश्मिरमधील नावांची चर्चा झाली तेव्हा पुन्हा एकदा नबी यांचं नाव पुढे आलं.

पण संजय गांधी यांनी स्वतः तिथून फुली मारत त्यांच्यासाठी काँग्रेसचा सुरक्षित मतदारसंघ शोधण्यास सुरुवात केली. त्यांना आझाद आपल्यासोबत लोकसभेमध्ये हवे होते. 

त्यावेळी वाशिम मतदारसंघातून खासदार असलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंतराव नाईक यांचं नुकतचं निधन झालं होतं. पण मतदारसंघ काँग्रेससाठी अत्यंत सुरक्षित होता. पक्षाचा बालेकिल्लाच. संजय गांधी यांनी हाच मतदारसंघ अंतिम केला, आणि त्यांच्याच आदेशाने गुलाब नबी आझाद यांच्यासाठी पक्षादेश निघाला.

पण वाशिम हा मतदासंघ मुळातच काहीसा मागास भाग, दुष्काळग्रस्त असल्यामुळे शेती आणि पिण्यासाठी पाण्याची वानवा होती. त्यामुळे इथून उभं राहण्याचं महाराष्ट्रातून कोणी धाडस करत नव्हतं. पण आझाद जम्मू काश्मिरमधून येवून इथून निवडणूक लढवत होते.

त्यावेळी विरोधात शरद पवार यांचा पक्ष होता. त्यांनी ठरवलं, आझाद यांना निवडून द्यायचं नाही. त्यांना पाडायचं. खूप प्रयत्न केला. आझाद यांच्या विरोधात प्रचाारचं रान उठवलं. पण तरीही आझाद निवडून आले.

ते हि थोडं थोडकं नाही तर तब्ब्ल १ लाख ५१ हजारांच्या प्रचंड मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला.

स्वतःच्या राज्यात विधानसभेला डिपॉझीट देखील वाचवू न शकलेल्या नेत्याला वाशिमकरांनी डोळे झाकून केवळ पक्षावर विश्वास दाखवत थेट लोकसभेला निवडून दिले होते.

त्यावर जम्मू काश्मिरच्या तत्कालीन मुख्यमंत्री शेख अब्दुला यांची प्रतिक्रिया होती,

आझाद जरी आता लोकसभेला निवडून आले असले तरी जेव्हा ते जम्मू काश्मिर मधून कोणत्याही भागातून अगदी १००० हजार जरी मत मिळतील तो दिवस मी त्यांचा खरा राजकीय प्रवेश मानेन.

पुढे काही दिवसातच संजय गांधी यांचं अपघाती निधन झालं, यानंतर आझाद यांना अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आलं. १९८२ ला ते इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा मंत्री झाले.

पुढे १९८४ साली वाशिमच्या मतदारांनी पुन्हा गुलाब नबी आझाद यांना कौल दिला. १९९० मध्ये देखील ते महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर पहिल्यांदा निवडून गेले.   

त्यानंतर ते सातत्याने केंद्रीय मंत्रिमंडळात वेगवेगळया जबाबदाऱ्या पार पाडत राहिले, जवळजवळ सर्व समित्यांवर काम करणारा एकमेव नेता म्हणूनही आझाद यांच्याकडे पाहिले जाते.

पण शेख अब्दुल्ला यांनी आझाद यांना दिलेलं आव्हान पूर्ण करायला २००६ साल उजाडावं लागलं होतं. २००५ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना विधानसभेवर निवडून येणं अनिवार्य होतं, त्यावेळी ते भादेरवाह मतदारसंघातून ५८ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यांच्या विरुद्धच्या भाजपच्या उमेदवाराला ४ हजार मत मिळाली होती तर आझाद यांना तब्बल ६२ हजार.

आजपर्यंत २ वेळा लोकसभेचे सदस्य आणि तब्बल ५ वेळा राज्यसभेचे सदस्य, ४ वेळा केंद्रीयमंत्री आणि जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री म्हणून आझाद यांनी देशावासियांची सेवा केली, त्यांच्या याच सेवेचा गौरव आज सभागृहात करण्यात आला.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.