दक्षिण आफ्रिकेत वादग्रस्त ठरलेले गुप्ता बंधू आयपीएलच्या बोलीत अदानींना फाईट देत आहेत…

सध्या आयपीएलच्या दोन संघांसाठी बोली लावणे सुरु आहे. भारतातले अनेक दिग्गज उद्योगपती या बोली साठी उतरले आहेत. २२ कंपन्यांनी १० लाख रुपयांची निविदा कागदपत्रे घेतली आहेत. नवीन संघांची मूळ किंमत २००० कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत अहमदाबाद आणि लखनऊ संघाचे नाव या शर्यतीत आघाडीवर आहे. या दोन शहरांमधूनच दोन नवीन आयपीएल संघ असू शकतात, अशी दाट शक्यता आहे. पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२२मध्ये ही स्पर्धा १० संघांची असेल.

फुटबॉलच्या सर्वात प्रसिद्ध क्लबपैकी एक असलेल्या मँचेस्टर युनायटेडनेही आयपीएलची नवीन टीम खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. नवा संघ खरेदी करण्यात क्लबच्या स्वारस्यामुळे बीसीसीआयने टेंडरची तारीख वाढवली होती, अशी चर्चा आहे. त्याच्या व्यतिरिक्त, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक गौतम अदानी आणि त्यांचा अदानी समूह अहमदाबाद फ्रेंचायझीसाठी बोली लावत आहे.

याच यादीत आणखी एक नाव झळकत आहे ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील तीन गुप्ता बंधू.

आता या गुप्ता बंधूच नाव आपण कुठं ऐकलं आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांविरोधात चांगलाच असंतोष पसरला होता. तिथल्या स्थानिक लोकांकडून डरबन आणि जोहान्सबर्ग या मोठ्या शहरांमध्ये भारतीयांवर हल्ले सुरु होते. या सर्वाला कारणीभूत ठरलेले उद्योगपती म्हणून गुप्ता बंधू कुप्रसिद्ध झाले होते.

आता हि तिघेजण नेमकी कशी जबाबदार आहेत? या प्रश्नाचं डिटेलमध्ये जर उत्तर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काहीस पाठीमागे जावं लागत. किती पाठीमागे तर अगदी ९० च्या दशकात. भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहायला लागले होते. परदेशी कंपन्यांना भारतात पायघड्या घातल्या जात होत्या.९० च्या दशकात. भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहायला लागले होते. परदेशी कंपन्यांना भारतात पायघड्या घातल्या जात होत्या.

साधारण याच काळात म्हणजे १९९४ – ९५ च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजले होते. यात आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्ष आणि नेल्सन मंडेला यांना बहुमत मिळाले. ते राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वात आफ्रिकेने पंख पसरायला सुरुवात केली. इतर देशांच्या तुलनेत उशिरा सुरुवात केल्यानं त्यांच्या सोबत यायचं म्हणून रेड कार्पेट संकल्पनेची सुरुवात केली.

याच दरम्यान उत्तरप्रदेशच्या सहारनपुरच्या शिव कुमार गुप्ता यांचं कुटुंबीय छोटे-मोठे उद्योग करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांना तीन मुलं. अजय, अतुल आणि राजेश. वडिलांची मदत करण्यासोबतच दिल्लीत एक कंपनी देखील चालवत होते. यात परदेशातून मसाल्यांची आयात करून ते इथं विकायचे असा उद्योग चालायचा.

सगळं सुरळीत चालू होते. पण गुप्ता बंधू पुढचा विचार करत होते. यातूनच अजय रशियाला, अतुल दक्षिण आफ्रिकेला आणि छोटा राजेश चीनला जाऊन पोहचले.

दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर तिथल्या रेड कार्पेटचा अतुलला फायदा झाला. त्याने एका चप्पलच्या दुकानापासून सुरुवात केली. पुढे एक नवीन कंपनीची सुरुवात केली. सहारा कॉम्प्युटर्स. परदेशातून पार्ट मागवून ते इथं आणून असेंबल करायचे, आणि विकायचे असा कारभार सुरु झाला. अतुलला या कामातून जॅकपॉट लागला.

यातूनच रशिया आणि चीनमधील अजय आणि राजेश हे देखील दक्षिण आफ्रिकेत येऊन पोहोचले. तिघ भावंडं मिळून जीवतोड मेहनत करत होते, सामान्य भारतीय माणसासारखे मान मोडून काम करत होते. त्यातून तिन्ही भावंडांची प्रगती १२० च्या स्पीडने होतं होती. पैशासोबत नवीन माणसांसोबत ओळखी वाढत होत्या.

यातूनच मोठमोठ्या अधिकाऱ्यांसोबत, आफ्रिकन काँग्रेसच्या नेत्यांसोबत देखील गुप्ता बंधूंची ओळख झाली, मैत्री झाली. यात जवळची मैत्री झाली ते त्यावेळचे दक्षिण अफ्रीकाचे उपराष्ट्रपती थाबो मबेकी यांच्यासोबत. तर त्याहून जवळची मैत्री झाली ती जॅकब जुमा यांच्यासोबत.

१९९९ मध्ये नेल्सन मंडेला यांच्याजागी राष्ट्रपती म्हणून थाबो मबेकी यांची एंट्री झाली. तर उपराष्ट्रपती म्हणून जॅकब जुमा यांची. ते पुढचे ६ वर्ष म्हणजे १९९९ ते २००५ पर्यंत दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती होते. या दरम्यान गुप्ता कुटुंबीय यांचा देखील व्यवसाय चांगलाचं वाढत होता.

पण जॅकब २००५ पर्यंतच उपराष्ट्रपती का होते? तर राष्ट्रपती थाबो यांनी जॅकब जुमा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदावरून हटवलं. त्यांच्या एका सहकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती, ज्याची मुळ थेट जॅकब यांच्यापर्यंत येऊन पोहोचली होती.

पण त्यांचं नशीब चांगलं होते. आफ्रिकेच्या उच्च न्यायालयाने थाबो यांचा निर्णय फिरवला. सोबतच त्यांच्यावर तपासात हस्तक्षेप केल्याचा ठपका देखील ठेवला. यातून थाबो यांना राजीनामा द्यावा लागला. सोबतच २००७ मध्ये जॅकब आफ्रिकन काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

२००९ मध्ये जॅकब यांच्याच नेतृत्वात निवडणुका पार पडल्या. आफ्रिकन काँग्रेस विजयी झाला. ते आफ्रिकेचे राष्ट्रपती बनले.

इथूनच गुप्ता आणि जॅकब जुमा या दोघांच्या दिवसांनी पुन्हा कूस बदलली. गुप्ता बंधूंची अगणित संपत्ती वाढत होती. कॉम्पुटरपासून सुरु झालेला बिझनेस आता खनिजांच्या उद्योगांपर्यंत येऊन पोहोचला होता. पुढे मीडिया, २४ तासांचं न्यूज चॅनेल, वृत्तपत्र अशा सगळ्या उद्योगांमध्ये जॅकब राष्ट्रपती असताना गुप्ता बंधूंनी आपले हातपाय पसरले.

२०१३ मध्ये गुप्ता बंधूंचा घरात एक लग्न होते, यात जवळपास २१७ पाहून विमानाने आफ्रिकेत दाखल झाले होते. या वऱ्हाडाचं विमान लँड झालं ते देशाच्या व्हीआयपी एयर बेसवरती. जिथं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि परदेशी राष्ट्रपती/पंतप्रधान यांची विमान लँड होतं असायची. त्याठिकाणी पहिल्यांदाचं कोणाचं तरी खाजगी विमान लँड झालं होतं. राष्ट्रपती गुप्ता बंधूंच्या खिशात आहेत असं म्हंटलं जाऊ लागलं.

याबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या, एका उद्योगपतीला एवढी सोयी सुविधा कोणत्या अधिकारातून दिली जाते? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. राष्ट्रपती आणि गुप्ता बंधूंचे संबंध पहिल्यांदाच सार्वजनिक रित्या चर्चिले जाऊ लागले. याला आणखी फोडणी मिळाली ती अर्थमंत्र्यांच्या हकालपट्टी मुळे.

२०१५ मध्ये आफ्रिकेचे अर्थमंत्री होते नाहनला नेने. राष्ट्रपती जॅकब जुमा यांनी त्यांना पदावरून अचानक हटवलं. असं सांगितलं जाऊ लागलं कि गुप्ता बंधूंच्या सांगण्यावरून जॅकब यांनी हि कृती केली आहे. त्यामुळे एका उद्योगपतीच्या सांगण्यावरून अर्थमंत्र्याला कसं काय काढलं जाऊ शकत? देश नक्की कोण चालवत? गुप्ता बंधू देशाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये देखील हस्तक्षेप करत असल्याचे आरोप होऊ लागले.

इथूनच गुप्ता बंधू आणि जॅकब जुमा यांच्या नशिबाचे वारे फिरले.

त्यावेळच्या पब्लिक प्रॉटेक्टर थुली मॅडोनसेला यांनी हा सगळ्या संबंधांचा तपास करण्याच मनावर घेतलं. त्या देशाच्या सर्वोच्च तपास अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. या तपासात नेने यांना पदावरून का हटवलं? जॅकब जुमा आणि गुप्ता बंधू यांचे संबंध काय? दोघांमधील आर्थिक व्यवहार कसे होते? गुप्ता बंधू धोरणात्मक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत होते का? याबद्दलचा तपास सुरु करण्यात आला.

२०१६ मध्ये हा अहवाल बाहेर आला. यात जुमा आणि गुप्ता बंधूंवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला होता. जुमा आणि गुप्ता बंधूंचा आर्थिक व्यवहारांचा यात उल्लेख होता. जगभरात या आरोपांमुळे जॅकब आणि आफ्रिकेचे छी-थू झाली. यातूनच त्यांच्या विरोधात प्रदर्शन चालू झाली. लोकमत विरोधात गेलं आणि नाइलाजाने राजीनामा द्यावा लागला.

तपास सुरु झाला. २००९ ते २०१८ या ९ वर्षांच्या काळात जॅकब आणि गुप्ता बंधू यांनी मिळून भ्रष्टाचार केला याबद्दल चौकश्या सुरु झाल्या.

नुकतंच जॅकब यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल १५ महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावरील ९ वर्षा दरम्यानच्या कथित भ्रष्टाराच्या आरोपांची चौकशी एक न्यायालयीन आयोग करत आहे. याच आयोगापुढे जॅकब यांना उपस्थित राहायचं होतं. पण ते उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलं आहे.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला. याच विरोधात सध्या जॅकब समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. भारतीय गुप्ता बंधूंनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना गोत्यात आणल्यामुळे त्यांच्यावर हि वेळ आली आहे असं आफ्रिकेतील स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. 

 

त्यामुळेच डरबन आणि जोहान्सबर्गमध्ये स्थानिक आफ्रिकन लोक भारतीयांविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. तिथल्या शॉपिंग सेंटर, मेडिकलला लुटलं जात आहे. लसीकरण बंद पाडलं आहे. या सगळ्या दंग्यात आता पर्यंत ६ लोकांचा मृत्यू झाला असून एकूण ४८९ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

तर या प्रदर्शन कर्त्यांना इशारा देताना राष्ट्रपती सिरिल रामफोसा म्हणाले, 

आम्ही या प्रदर्शन कर्त्यांविरोधात कारवाई करण्यासाठी जराही पुढे मागे बघणार नाही, त्यांना अटक करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.