वर्तमानपत्रांचा खप खरच कमी झालाय का?

दिवाळीनिमित्त गावी गेल्यानंतर समजलं की वर्तमानपत्र आजही सुरू आहे. महाराष्ट्रात कोरोना आला आणि पेपरवाल्यांची सुट्टी जाहीर झाली. पहिले काही दिवस तर सरकारमार्फत अधिकृत बंदी होती. ही बंदी उठली तोच आमच्या मुंबईतल्या सोसायटीने नियम करुन पेपरवाल्यांना सोसायटी बंदीचा आदेश जाहीर केला.

त्यानंतर आजही तो आदेश कायम आहे.

गावाकडे मात्र वेगळं चित्र होतं. पेपर अधिकृतरित्या बंद होते तेव्हाचं बंद. त्यानंतर सर्व गोष्टींसोबत वर्तमानपत्र सुरू झाले. वर्तमानपत्र मधल्या काळात काहीतरी दिवस बंद होते एवढीच काय ती गाववाल्यांची आठवण. पुणे आणि मुंबईची महत्वाची ठिकाणं सोडली तर संपुर्ण महाराष्ट्राचं एक वेगळं चित्र दिसत होतं.

तरिही पेपर बंद पडण्याची, जाहिराती कमी झाल्याची माहिती मिळत होती तेव्हा हा नेमका काय प्रकार आहे. खरच प्रिन्ट माध्यम बंद पडतय का याची खातरजमा करावी म्हणलं.

यासाठी बोलभिडू मार्फत प्रत्यक्षात वर्तमानपत्र विक्रेता, वितरक, वाचक, सोसायटींचे सेक्रेटरी आणि काही पत्रकारांसोबत संवाद साधून ग्राऊंडची परिस्थिती मांडण्याचा विचार समोर आला.

सर्वात पहिल्यांदा पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वर्तमान विक्रेते असणारे शिवाजी भरणे यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं,

कोरोना काळापासून ३० टक्के खप कमी आला आहे. पण याची कारणं वेगवेगळी आहेत. गेली १०-१५-२० वर्ष माणसांना वर्तमानपत्रातूनच बातमी वाचायची सवय आहे. जरी चॅनेल असले तरी ते आपल्या तालुक्याची, शहराची बातमी सांगत नाहीत. त्यामुळे माणसांच्या घरात वायफाय असेल तरी वर्तमानपत्र येतच.

मात्र कोरोनाकाळात सोसायट्यांनी नियम तयार केले. वर्तमानपत्र विक्रेत्यांना सोसायटीमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली. आजही आम्ही अनेक सोसायट्यांसोबत बोलत असून लवकर ते बंदी उठवतील अशी चिन्ह आहेत. पण हे फक्त शहरातील उच्चभ्रू सोसायट्यामध्येच आहे. त्यामुळेच एकंदरीत आकडेवारी ३० टक्यांचा फरक दिसतो.

जर का पेपर विक्री वाढणार नसती तर आम्ही कधीच हा धंदा सोडला असता. पण पेपरची विक्री हमखास वाढू शकते, ती पूर्वरत होवू शकते फक्त अजून काही दिवस जायला हवेत.

दूसरीकडे ग्रामीण भागातील विक्रेते म्हणून कोल्हापूरच्या रघुनाथ कांबळे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. रघुनाथ कांबळे हे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटन सचिव व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत.

ते म्हणाले,

२५ मार्च पासून विक्री बंद होती. लॉकडाऊनच्या काळात थोडासा फरक जाणवला, पण परिस्थिती लगेच सुधारली. सुरवातीच्या काळात पण लोकं आवर्जून ई-पेपर पाठवायला सांगायचे. आम्ही त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप करून ई-पेपर पाठवले.

कधीकधी आम्ही वेबसाईटच्या लिंक शेअर करायचो पण लोकांच म्हणणं असायचं अशी सुट्टी बातमी नको. थेट पेपरच पाठवत जा..!

वातावरण सुरळीत झालं तशी पेपर विक्री सुरू झाली. माझ्या पहिल्या आणि नंतरच्या वितरणावर शून्य परिणाम झाला. पहिला जी विक्री होती तिच आहे. एकाने देखील पेपर बंद ठेवला नाही.

शिवाय कोरोना काळात लोकांना खात्रीशीर माहिती मिळत नव्हती. तेव्हा टिव्हीच्या भडीमारापेक्षा लोकांनी पेपरलाच पसंती दिली त्यामुळे खप उलटपक्षी वाढलाच..

इकडे सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पुढारी, सकाळ, लोकमत यांच्या विक्रीवर परिणाम जाणवला नाही. कारण ते कोल्हापूरमधून प्रिंट होवून येतात. त्यातुलनेत पुण्यावरुन येणारे लोकसत्ता, सामना, संध्यानंद, इंडियन एक्सप्रेस ही दैनिके जवळपास १ महिना इकडे येत नव्हते. त्यामुळे दोन महिने या अंकांच्या विक्रीवर फरक जाणवला. पण आता पुर्ववत आहे.

पुणे – मुंबईत सोसायटींमधील गैरसमजुतीमुळे वृत्तपत्रपत्रांचा खप कमी आला. पण असं एक ही उदाहरण नाही की वृत्तपत्र किंवा वृत्तपत्रविक्रेत्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह कोणी झाले.

दूसरीकडे नांदेडच्या संदीप कटकमवार यांना फोन करुन माहिती घेण्यात आली. ते नांदेड शहरात वर्तमानपत्र विक्रेते आहेत.

ते म्हणाले,

कोरोना आणि लॉकडाऊन काळात माझ्या जवळील पेपरचा खप जवळपास ७० टक्के कमी झाला होता. कोरोनाच्या काळामध्ये नको, पेपर कुठून कुठून येतात माहित नसत, घरी लहान मुलं असतात त्यामुळे सध्या पेपर नको, पुन्हा चालू करू अशी कारण देऊन बंद केले होते.

त्यानंतर कुठे थोडं थोडं पिकअप पकडत आहे. ज्यांनी बंद केले होते ते आता पुन्हा चालू करत आहेत.  ६०० ते ७०० अंक मागील महिन्याभरात परत चालू झाले आहेत. हळू हळू खप रुळावर येत आहे.

औरंगाबादचे वर्तमानपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष निलेश फाटके म्हणाले,

आमच्याकडे सोसायटीमध्ये जास्त फरक जाणवला. म्हणजे २८ वर्षामध्ये पहिल्यांदाच असं कोणीतरी सांगत होत कि तुम्ही येऊ नका आणि हे सगळे सोसायटीमध्ये राहणारे होते. नक्षत्रवाडी, उल्कानगर, बायपास अशा ठिकाणी हा अनुभव आला.  सगळंच विस्कळीत झालं होत. ३ मूल काम सोडून गेली.

पण आता कोरोनाची भीती जशी जशी कमी होत आहे तसा खप वाढायला सुरुवात झाली.

लातूरच्या राजू गायकवाड या वर्तमानपत्र विक्रेत्यांना सांगितलं,

अंकांच्या विक्रीवर फरक तर बराच पडला कोरोना काळामध्ये. एप्रिलमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत विक्री एकदमच ४० टक्क्यांवर आली होती. दुकान बंद असल्यामुळे तिथले पेपर बंद झाले, सोबतच सोसायटी, आपार्टमेंट मध्ये पण लॉकडाऊन दरम्यान ‘पेपर नका टाकत जावू, तुमच्यामुळे कोरोना पसरतो’ अशी मानसिकता होती.

पण आता हळू हळू मार्केट पुन्हा चालू होत आहेत. त्यामुळे लोकांची मानसिकता देखील बदलत आहे. पुढच्या काही दिवसात अंकांची विक्री पिकअप घेईल आणि झालेल नुकसान आता दोन-तीन महिन्यात कव्हर होईल अशी आशा आहे.

थोडक्यात ग्रामीण आवृत्या, ग्रामीणच काय तर पुणे मुंबई या शहराबाहेरील वातावरण आणि पुण्या-मुंबईच्या सोसायट्यांच वातावरण यामध्ये खूप मोठ्ठा फरक असल्याचे स्पष्ट होत होते. नेमकं सोसायट्यांनी काय नियम केलेत, ते किती दिवस चालणार याबाबत आम्ही मुंबईतील गोरेगाव येथील एका सोसायटीसोबत संपर्क केला..

मुंबईच्या गोरेगाव येथील ऑबेरॉय मॉलनजिक असणाऱ्या या सोसायटीच्या चेअरमननी सोसायटीचे नाव न छापण्याच्या अटीवर आम्हाला माहिती दिली ते म्हणाले,

वर्तमानपत्रच काय तर अगदी घरी काम करणाऱ्या महिलांना देखील आम्ही सोसायटीने सुट्टी जाहीर केली आहे. पहिले तीन महिने अत्यंत कठोरपणे नियम पाळले. अगदी लहान मुलांना देखील सोसायटीमध्ये एकमेकांसोबत मिसळून दिले नाही. दूध आणि अन्य भाजीपाला सोसायटीच्या गेटवर जावून घ्यावा लागत होता. मात्र पेपर बंदच ठेवले होते.

आत्ता परिस्थितीत पुर्वपदावर येत आहे. तरिही अद्याप आम्ही वर्तमानपत्र विक्रेत्यांना सोसायटीत आतमध्ये येण्यास मज्जाव कायम ठेवला आहे. पण एकंदरीत इतक्या वर्षांची सवय अशी जाणार नाही. येत्या महिन्याभरातच मिटींग घेवून वर्तमानपत्र विक्रेत्यांना देखील सोसायटीमध्ये प्रवेश देण्यासंबधित आम्ही निर्णय घेणार आहोत.

थोडक्यात शहरात वर्तमानपत्र पुर्वरत होईल अशी आशा लोक बाळगूण आहेत. बंद पडलेली वर्तमानपत्र हे देखील एका विशिष्ट “इलाइट क्लास” मधीलच आहे. मात्र सर्वसामान्यांच्या बातम्यांची भूक भागवणारे वर्तमानपत्र अद्याप चालू आहेत व चालूच राहतील असा एकंदरीत सुर आहे.

पण वाचकांच काय..?

तर पुण्यातील काही निवडक व सांगली, बीड अशा शहरांमधील वाचकांसोबत संपर्क साधल्यावर आमच्या एकंदरीत लक्षात आलं की,

शहरातील निवडक भागातील लोक सध्या पेपर वाचत नाहीत. त्याच महत्वाचं कारण म्हणजे त्यांना वर्तमानपत्र मिळण्यात अडचणी येत आहेत. सोसायटीचे नियम, सकाळी ११ नंतर उपलब्ध नसणारे विक्रेत अशा अनेक समस्या आहे.

उदाहणार्थ दाखल आम्ही पुण्यातील सदाशिव पेठेचे उदाहरण घेवूया.

या भागातून मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रांची विक्री कमी झाल्याची आकडेवारी आहे. पण दूसरी आकडेवारी अस सांगते की, या भागात साधारणपणे ८ ते १० हजार MPSC/UPSC करणारे तरुण राहतात. सध्या ही मुले गावीच असल्याने गावाकडे वर्तमानपत्र वाचतात. इतर वेळी याच परिसरातून इतक्या मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रांची विक्री होत होती.

MPSC/UPSC च्या मुले कम्प्लसरी एक ते दोन वर्तमानपत्र खरेदी करतात. अशा वेळी एकाच भागातून कमी झालेला १० ते २० हजारांचा खप वर्तमानपत्रांचा खप कमी झाला या गोष्टीला कारणीभूत ठरतो.

वर्तमानपत्रांची विक्री घटली हा फक्त निर्माण केलेला बागुलबुव्वा आहे. तो ही विशेषत: शहरी भागातील निवडक वर्तमानपत्रांच्या विक्रीवरून.

आजही शहरं सोडली की दिवसभर वर्तमानपत्र वाचणारे लोक तुम्हाला गावच्या पारावरून ते तालुक्यांतील चौकापर्यन्त दिसतील. कोल्हापूरच्या कट्टा संस्कृतीमध्ये आत्ताही सार्वजनिक वाचनालय म्हणून वर्तमानपत्र टिकून आहेत.

प्रिन्ट थांबणार, संपणार या वावड्या फक्त अगदी संगणक आल्यापासून चालू आहेत, अशा चर्चा चालत राहतीलच पण आकडेवारी काय सांगते हे पहावं, लोकांची मते विचारात घ्यावीत. आम्ही विविध क्षेत्रातील लोकांसोबत चर्चा केली म्हणूनच ठामपणे सांगू शकतो सहजासहजी वर्तमानपत्रे बंद पडणार नाहीत की त्यांचा खप कमी होणार नाही..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.