पोलिसांनी कराडात अडवलं पण सोमय्या शांत बसले नाहीत, मुश्रीफांचा दुसरा घोटाळा उघड केलाय.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ज्या नाट्यमय घडामोडी झाल्या त्याने राज्यच वातावरण पूर्णपणे ढवळू निघाल्याचं चित्र आहे.

आरोप करायला निघणाऱ्या सोमय्यांनी कराडमध्ये थांबा का घेतला ? 

तर सोमय्यांनी कागल मध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली तेव्हा, मुश्रिफांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आल्यास  त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवली होती. त्यांनी सोमय्या यांना कोल्हापुरात दाखल होऊ नये, असा आदेश दिला. पण तो आदेश न जुमानता सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय कायम ठेवला.

त्यानंतर सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली आणि महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते.

महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे निघणाऱ्या सोमय्यांना आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड पोलिसांनी कराड रेल्वे स्थानकावर रोखले. तदनंतर किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली की,

पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडमध्ये थांबवले. ९ वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार आहे

त्यानंतर ११ वाजता होणारी पत्रकार परिषद वेळेआधीच म्हणजे ९.३० ला सुरु झाली. या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी मुश्रिफांचा अजून एक घोटाळा बाहेर काढला.  

सोमय्या म्हणतात,

हसन मुश्रीफांमुळे मला अंबाबाईचं दर्शन करता आलं नाही. ठाकरे सरकार हे घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणारं सरकार आहे. पोलिसांनी मला कोणत्या आदेशाअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं. मला काल सहा तास माझ्या घरात कोंडून ठेवण्यात आलं. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं. सीएसएमटी स्टेशनवर मला पोलिसांनी धक्काबुक्की देखील केली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्विकारावी. सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहे. माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? .

त्यांनी मुश्रिफांवर दुसऱ्या घोटाळ्याचा आरोप केला.

आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत सोमय्या यांनी या कारखान्यात  मुश्रीफ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या म्हणाले.

त्यामुळे सध्या आपल्याला मुश्रिफांचा तिसरा घोटाळा उघड होण्याची आणि ईडी काय कारवाई करते ते बघण्याशिवाय काही पर्याय नाही. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.