हेमासारख्या दिसणाऱ्या बिंदीयाला हेमाच्या आईनेच पहिला ब्रेक मिळवून दिला

अभिनयात आणि आयुष्यात महत्वाचं असतं ते म्हणजे टायमिंग ! तुमचा टायमिंग जर हुकला तर गोष्टी फिस्कटू शकतात. पण जर तुम्ही टायमिंग परफेक्ट साधलात तर तुमचं आयुष्य एका झटक्यात बदलू शकतं. आता वयाने लहान असलेल्या या मुलीला काय माहित होतं की, दस्तुरखुद्द हेमा मालिनी च्या आईची नजर तिच्यावर पडेल आणि ती थेट बॉलिवूडची हिरोईन होईल. पण तिने साधलेला टायमिंग इतका कमाल होता, की यामुळे तिचं करियर घडलं.

ही अभिनेत्री म्हणजे बिंदिया गोस्वामी.

बिंदिया गोस्वामी यांचा जन्म ६ जानेवारी १९६२ रोजी झाला. सुरुवातीला जे टायमिंग वैगरे मी म्हणत होतो त्याचा उलगडा करतो. वयाच्या १४ व्या वर्षी बिंदिया एका पार्टीमध्ये गेली होती. या पार्टीमध्ये हेमा मालिनी यांची आई उपस्थित होती. बिंदिया आणि हेमा मालिनी यांची आई जया चक्रवर्ती या पार्टीत असणं हा जणू काही योगायोग.

पार्टीचा आनंद घेताना जयाजींची नजर बिंदिया वर गेली.

अल्लड, निरागस अशी बिंदिया त्यांच्या नजरेत भरली. त्यांना बिंदिया आणि त्यांची मुलगी हेमा मध्ये खूप साम्य दिसलं. त्याच दिवशी जयाजींनी स्वतःहून बिंदियाला सिनेमात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक निर्मात्यांना त्यांनी बिंदिया चं नाव सुचवलं. आणि अखेर वयाच्या १५ व्या वर्षी १९७६ साली आलेल्या जीवन ज्योती या सिनेमात बिंदियाला सर्वप्रथम अभिनय करण्याची संधी मिळाली.

भिडू, इसको बोलते है टायमिंग ! एका पार्टीत येणारी एक सामान्य मुलगी बघता बघता सिनेमात सुद्धा झळकली. हेमा मालिनी यांच्या आईने बिंदियाला करीयरचा मार्ग तर दाखवला होता. पण त्या पुढची वाटचाल मात्र बिंदियाला करायची होती. बिंदियाने केलेला पहिलाच सिनेमा म्हणजे जीवन ज्योती फ्लॉप झाला. परंतु बिंदिया निराश झाली नाही.

पुढच्या काही वर्षात बासू चॅटर्जी यांच्या खट्टा मिठा आणि प्रेम विवाह या सिनेमातून बिंदियाने यशाची गोडी चाखली.

स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बिंदिया च्या आयुष्यात एका सिनेमाच्या निमित्ताने मोठं यश मिळालं. तो सिनेमा म्हणजे हृषिकेश मुखर्जी यांचा गोलमाल. अमोल पालेकर, उत्पल दत्त आणि इतर कलाकारांसोबत बिंदिया झळकली. या सिनेमाचा किस्सा असा की, बिंदिया चा रोल सुरुवातीला रेखा करणार हे ठरलं होतं.

त्यावेळी रेखा करीयरच्या एकदम पीक वर होती. सर्वांना असं वाटलं की, गोलमाल सिनेमा हा हिरोचा आहे. त्यामुळे रेखा सारख्या लोकप्रिय अभिनेत्रीला सिनेमात घेणं उचित नाही. म्हणून रेखाच्या जागी बिंदिया गोस्वामी यांची निवड करण्यात आली.

गोलमाल सिनेमा सुपरहिट झाला. इतक्या सुपरहिट सिनेमात काम केल्यामुळे बिंदिया सुद्धा लोकांच्या नजरेत आली.

गोलमाल सुपरहिट झाल्यावर बिंदियाने विनोद मेहरा सोबत अनेक सिनेमे केले. सिनेमा करताना दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण भिडू, हे बॉलिवुड आहे.. इथे क्षणिक वाटणाऱ्या सुखाच्या मागे एखादा कलाकार धावतो. पण हा आनंद त्यांना दीर्घकाळ टिकवता येत नाही.

 विनोद मेहरा सोबत ४ वर्ष सहजीवनाचा अनुभव घेऊन दोघांनी घटस्फोट घेतला. आणि काही वर्षांनी बॉर्डर चे दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्याशी तिने विवाह केला.

लग्न झाल्यानंतर बिंदियाने अभिनयाला रामराम ठोकून कॉस्च्युम डिझाईन क्षेत्र निवडले. ९० मधील आघाडीच्या अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी, करीना कपूर, ऐश्वर्या राय यांच्यासाठी बिंदियाने कॉस्च्युम डिझाईन केले आहेत.

जे.पी.दत्ता यांनी सिनेमे दिग्दर्शित केले. त्यामध्ये बॉर्डर, रेफुजी, LOC कारगिल, उमराव जान सारख्या सिनेमांचा समावेश आहे. या सिनेमांसाठी कपडेपटाची संपूर्ण जबाबदारी बिंदिया गोस्वामी यांनी सांभाळली आहे. आत्ता बायकोने नवऱ्याची बाजू घ्यावी.. आम्ही कुठे नाही म्हणतोय. झालं काय, जे.पी.दत्तांचा बॉर्डर सुपरहिट झाला. परंतु यानंतर आलेल्या LOC कारगिल वर फ्लॉप चा शिक्का बसला. सर्व परिस्थिती पाहून
बिंदिया म्हणाल्या,

” कारगिल सिनेमावर जो कोणी वाईट साईट बोलेल तो देशद्रोही असेल.”

या वाक्यातून बिंदिया गोस्वामी यांनी नवऱ्याच्या सिनेमा विषयी काळजी प्रकट केली. परंतु प्रेक्षकांचा मात्र रोष ओढवून घेतला.

तर ही होती बिंदिया गोस्वामी यांची कहाणी. त्या एका पार्टीत येणं. तिथे हेमा मालिनी यांच्या आईने तिला बघणं. आणि पुढे त्यांनी शिफारस केल्यामुळे तिचं आयुष्य बदलणं. या सर्व गोष्टी बिंदिया गोस्वामी यांच्यासाठी अगदीच अनपेक्षित होत्या. पार्टीत येण्याचा साधलेला छोटासा टायमिंग बिंदियाचं आयुष्य घडवून गेला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.