खरच हज यात्रेला जाणारा मुस्लीम तिथे “हिंदू” म्हणून ओळखला जातो?

सौदी अरेबियातील मक्का शहरातील काबातुल्लाह मस्जिद. साधारण १४०० वर्षापुर्वी मोहम्मद पैगंबरांनी स्थापन केलेली ही मस्जिद मुस्लीम समाजासाठी जगातील सर्वात पाक जागा मानली जाते.

प्रत्येक मुसलमान आयुष्यात एकदा तरी मक्काला अर्थात हज यात्रेला जावून यावं, इथल्या मस्जिदीत एकदातरी नमाज अदा करून अल्लाहला पुकारावे ही इच्छा बाळगून असतो. दरवर्षी जगभरातील लाखोंच्या घरात मुस्लीम इथे भेट देत असतात.

यात भारतातील देखील हजारो मुस्लीम समाजातील लोक हजला यात्रेला जातात.

पण हेच ‘भारतीय मुस्लीम जेव्हा तिथं पोहचतात तेव्हा त्यांना ‘हिंदू’ म्हणून ओळखले जाते’

असं विधान आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील एका चर्चेदरम्यान केलं आहे. पण असं विधान करणारे योगी आदित्यनाथ हे पहिलेच नाहीत. यापूर्वी देखील भाजपच्या नेत्यांनी अशी मत मांडली आहेत.

मग खरच हज यात्रेला जाणारा मुस्लीम तिथे “हिंदू” म्हणून ओळखला जातो का?

मुस्लीम धर्माचे अभ्यासक समीर दिलावर शेख यांनी ‘बोल भिडू’ शी बोलताना या संदर्भात सविस्तर मत मांडलं. ते म्हणाले, 

मी २०१४ साली वयाच्या २४ व्या वर्षी हजला जाऊन आलो आहे, आणि अगदी डोळस पणे. तिथं भारतीय मुस्लिमांना हिंदी म्हंटल जातं हिंदू नव्हे. हिंदी म्हणजे हिंद देशाचा नागरिक. जसं इराण मधील इराणी तसा हिंद मधला हिंदी. अरबी भाषेत भारताला अल हिंद म्हणतात, आणि तिथे राहणारा हिंदी. आपण पुणेकर मुंबईकर म्हणतो, कर लावतो, तसे ते ई प्रत्यय लावतात.

मुस्लिम धर्माचे अभ्यासक मुजाहिद शेख यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना समीर शेख यांच्या मताजवळ जाणार मत मांडलं, पण याबद्दल त्यांनी अधिक सविस्तर सांगितलं, ते म्हणाले, 

हिंदी म्हंटलं जातं, हिंदू नाही. दोन्हीत फरक आहे.

सिंध नदी पासून अगदी किनारपट्टीच्या खालच्या भागापर्यंत भारतीय उपखंडाला पौराणिक अरेबिक नाव अल हिंद प्रांत म्हणून आहे. मग यात भारताला देखील हिंद म्हणूनच ओळखलं जात, आणि पाकिस्तानला देखील. कारण पूर्वी दोन्ही एकत्रितपणे भारतातच भाग होता.

तिथले लोकं आता यात ‘ई’ असा प्रत्यय पुढे लावतात. जसा आपल्याकडे कर असा प्रत्यय लावतात (उदा : पुणेकर, मुंबईकर, नाशिककर इ.) तसा तिथं प्रत्येक भागाच्या पुढे ‘ई’ असा प्रत्यय लावतात. यात अफगाणिस्तानच्या लोकांना अफगाणी, इराणच्या लोकांना इराणी, इराकच्या लोकांना इराकी म्हणतात. 

आता जॉर्डन या देशाच अरेबिक नाव उर्दून आहे. तर त्यांना उर्दूनी, सोमालियाच अरेबिक नाव सोमल आहे, तर त्यांना सोमाली म्हणतात.

अगदी तसंच हिंद प्रांतातील लोकांना हिंदी म्हणून ओळखलं जात. मग या हिंदीमध्ये केवळ मुस्लिमच नाही तर हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन असे सगळ्यांनाच एका नावानं ओळखलं जात. 

त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी हजमध्ये भारतीय मुस्लीम लोकांना हिंदू म्हणून ओळखलं जातं असल्याचा जो दावा केला आहे तो चुकीचा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण हिंदू नाही तर हिंदी म्हणून ओळखलं जातं.

हे हि वाच भिडू.  

Leave A Reply

Your email address will not be published.