भारत-चीन सीमेवरच्या भारतातील सगळ्यात मोठ्या बौद्ध मॉनेस्ट्रीचा इतिहास ३५० वर्ष जुना आहे

चीनने पुन्हा एकदा भारताच्या सीमेवर कुरघोड्या करायला सुरुवात केलीय. याआधी गलवान खोऱ्यात चीनने कुरापती केल्या तेव्हा दोन्हीकडून बैठका झाल्या आणि वाद शांत झाला होता. मात्र चीनने आता अरुणाचल प्रदेशमधील सीमेवर कुरघोड्या सुरु केल्या आहेत.

चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्ह्याच्या सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तर देऊन चिनी सैनिकांचा डाव उधळून लावला. दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आल्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. याची माहिती स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत दिली आहे.

पण तवांगच्या सीमेवर जरी तणाव निर्माण झाला असला, तरी तवांगचं भारतातील सर्वात मोठी बौद्ध मॉनेस्ट्री  गेल्या ३५० वर्षांपासून शांततेचं प्रतीक म्हणून उभी आहे.

या मॉनेस्ट्रीची स्थापना १७ व्या शतकातील बौद्ध भिक्खू मेरा लामा लोड्रे ग्यात्सो यांनी केली होती.

तिबेट आणि अरुणाचल प्रदेश एकमेकांना लागूनच आहेत त्यामुळे दोन्हीकडच्या नागरिकांचे रोटी बेटी संबंध प्रचलित होते. दोन्हीकडील नागरिकांची तिबेटच्या दलाई लामांवर श्रद्धा होती. याचाचा प्रभाव १७ व्या शतकात तवांगच्या प्रदेशावर पडला. तिबेटचे पाचवे दलाई लामा नगवांग लोबसांग यांच्या काळात मेरा लामा लोड्रे ग्यात्सो हे तिबेटियन पंथाचे प्रसिद्ध बौद्ध भिक्खू होते. 

त्यांना ल्हासाप्रमाणेच हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये एका मॉनेस्ट्रीची स्थापना करायची होती. त्यांनी इथे मॉनेस्ट्री स्थापन करण्याचा निर्णय घेतला, पण मॉनेस्ट्री उभारायची कुठे हा महत्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी दिव्य शक्तींची मदत घेण्याचं ठरवलं आणि ते एका जागी ध्यानस्थ बसले. 

जेव्हा मेरा लामा यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांचा घोडा तिथून अदृश झाला होता.

मेरा लामा यांनी स्वतःच्या घोड्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, घोड्याला शोधत शोधत ते एका टेकडीवर पोहोचले. तेव्हा त्यांना राजा काला वांगपो यांच्या राजवाड्याच्या अवशेषांजवळ घोडा उभा असलेला दिसला. याच गोष्टीला शुभ मानून त्यांनी टेकडीवर मॉनेस्ट्री स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 

इसवी सन १६८० मध्ये मेरा लामा यांनी स्थानिक मोनपा समाजातील लोकांच्या मदतीने टेकडीवर मॉनेस्ट्री स्थापन केली आणि त्याला नाव दिलं तवांग. स्थानिक मोनपा भाषेत ता चा अर्थ होतो घोडा आणि वांगचा अर्थ होतो निवडलेला. घोड्याने निवडलेली जागा म्हणजे तवांग असा त्याचा अर्थ होतो. 

तवांगच्या मॉनेस्ट्रीची स्थापना झाली आणि तीन वर्षानंतर तवांगजवळच्या एका गावातील राजघराण्यात तेंगिंग ग्यात्सो नावाच्या एका मुलाचा जन्म झाला. 

तेंगिंग ग्यात्सोचे आईवडील राजघराण्यातले होते, ही गोष्ट वगळली  एक सामान्य मुलगा होता. मात्र लवकरच त्याचं आयुष्य बदललं. तेंगिंग ग्यात्सो १३-१४ वर्षाचा असतांना ल्हासाच्या राजवाड्यातील दलाई लामाचे सेवक दैवी संकेताचा शोध घेत तवांगला पोहोचले. कारण तेंगिंग ग्यात्सो हा साधासुधा मुलगा नव्हता तर तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांचा सहावा अवतार होता. 

तेंगिंग ग्यात्सो यांची तिबेटचे सहावे दलाई लामा म्हणून निवड झाली आणि तवांगच्या मॉनेस्ट्रीची प्रसिद्धी वाढायला लागली.

समुद्रसपाटीपासून ३ किलोमीटर उंचावर असलेल्या या टेकडीचा मागील भाग तीव्र उताराचा आहे तर समोरचा भाग निमुळत्या आकारात खाली उतरतो. टेकडीच्या माथ्यावर असलेल्या ५-६ एकर जागेवर ही मॉनेस्ट्री बांधण्यात आली आहे. ही मॉनेस्ट्री ल्हासाच्या मॉनेस्ट्रीनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील सर्वात मोठी मॉनेस्ट्री आहे.

टेकडीच्या सर्वात उंच भागावर मध्यभागी दुखंग नावाची तीन मजली इमारत आहे, ज्यात उत्तर दिशेच्या हॉलमध्ये गौतम बुद्धांची पद्मासनात असलेली २५ फूट उंच सोन्याची मूर्ती आहे. बुद्ध मूर्तीच्या दोन्ही बाजूला मौदल्यायन आणि सारीपुत्र या बुद्धांच्या दोन सेवकांच्या मुर्त्या आहेत. दोन्ही मुर्त्यांच्या हातात काठी आणि भिक्षापात्र आहे. मूर्तीच्या आजूबाजूला वेगवगेळ्या दलाई लामा आणि बौद्ध भिक्खुंच्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत. भिंतींवर बुद्ध आणि बौद्ध भिक्खुंची सुंदर चित्रे रेखाटली आहेत. 

यासोबत दुखंगमध्ये एक मोठं बैठक हॉल आणि मॉनेस्ट्रीच्या प्रमुख भिक्खूंच्या बसण्याची खोली आहे. मॉनेस्ट्रीच्या सर्व भिंती चित्रांनी रंगवलेल्या आहेत. या हॉलच्या बाजूला एक चांदीचं ताबूत ठेवण्यात आलंय, ज्यात मॉनेस्ट्रीचं रक्षण करणारी देवी पॅल्डन ल्हामोची मूर्ती आहे. ही मूर्ती पाचवे दलाई लामा नगवांग लोबसांग यांनी मेरा लामा यांना दिली होती. 

मॉनेस्ट्रीमध्ये मुख्य इमारतीसोबतच आणखी महत्वाच्या इमारती आहेत ज्यात भिक्खुंच्या राहण्याची व्यवस्था आहे.

या मॉनेस्ट्रीमध्ये असलेल्या प्रत्येक इमारती तवांगमधील वेगवगेळ्या परिवारांनी बांधून दिलेल्या आहेत. तेच परिवार या इमारतींची आजही देखभाल आणि दुरुस्ती करतात. यात भिक्खुंच्या राहण्याच्या खोल्या, स्वयंपाकघर, नाचण्यासाठीच हॉल, पर्यटकांच्या खोल्या आणि प्रार्थनागृह आहेत. सध्याच्या घडीला तवांग मॉनेस्ट्रीमध्ये ७०० बौद्ध भिक्षु आहेत, जे इथे बौद्ध धर्माचं शिक्षण घेतात.

मॉनेस्ट्रीच्या बाहेर खाली पठारावर गौतम बुद्धांची एक भव्य मूर्ती आहे. तवांगच्या जवळच १९५० मध्ये तयार झालेला शोवात्सर नावाचा सरोवर आहे, ज्याला माधुरी दिक्षित यांच्या नावावरून माधुरी सरोवर सुद्धा म्हणतात.

१९६२ च्या भारत चीन युद्धामध्ये चीनने तवांगवर कब्जा केला होता.

तवांग तिबेट आणि पर्यायाने चीनला लागून असल्यामुळे इथल्या संस्कृतीवर चायनीज संस्कृतीचा प्रभाव आहे. चीनच्या पौराणिक कथांमधील ड्रॅगनची कथा इथे प्रचलित आहेत, तसेच चिनी कॅलेंडर लुनार सुद्धा इथे प्रचलित आहे. लुनारच्या ११ व्या महिन्यामध्ये तवांगमधील मोनपा समाजाचे लोक उत्सव साजरा करतात.

तवांगपासून ३७ किलोमीटर अंतरावर बूम ला ही दरी आहे. भारत आणि तिबेटला जोडणारा महामार्ग याच बूम ला मधून जातो. याच ऐतिहासिक मार्गाचा वापर करून चीनने युद्धात तवांगवर कब्जा केला होता. १९६२ पासून चीन तवांगला दक्षिण तिबेट मानतो आणि तवांग चीनचाच भाग असल्याचा दावा करतो. दलाई लामा यांनी जेव्हा तवांगचा दौरा केला होता तेव्हा चीनने यावर आक्षेप घेतला होता.

परंतु दलाई लामा आणि हजारो वर्षांपासून भारत आणि तिबेटचे संबंध हे शांततेचे राहिले आहेत. या संबंधाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तवांग. त्यामुळे ल्हासानंतर जगातील दुसरी सर्वात मोठी बौद्ध मॉनेस्ट्री भारतासाठी इतकी महत्वाची आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.