फडणवीसांनी पुण्यातून खासदार व्हावं अशी मागणी करणाऱ्या अ.भा.ब्राम्हण महासंघाचा इतिहास

‘देवेंद्र फडणवीस यांना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी’

या मागणीच्या बातम्यांनी माध्यमांना व्यापून टाकलं आहे. ही मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवून केली आहे. कारण राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस विजयाची आणि नेतृत्वाची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वर्णी लागल्यानंतर त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशासाठी वातावरण निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं यावरून दिसत आहे. पत्रात हे देखील आवर्जून नमूद करण्यात आलं आहे की… 

पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने २००९ साली काँग्रेसचे सुरेश कलमाडी, २०१४ साली अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीश बापट यांना पाठिंबा दिला होता

त्याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मागणी करण्यात आली आहे.

पत्रात या गोष्टीचा उल्ल्लेख करणं प्रश्नात पाडतं की, राजकीय क्षेत्रात इतकं वजन असणारा अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ आहे काय? त्याचा इतिहास काय? उद्देश्य काय? आणि सध्याचं त्यांचं महाराष्ट्रात वजन काय?

तेच जाणून घेऊया…

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचं मासिक ब्रह्मकेसरीमधून मिळालेल्या माहितीनुसार, २००० सालानंतर घडलेल्या दोन घटना महासंघाच्या स्थापनेसाठी कारणीभूत ठरल्या. पहिली म्हणजे कांची कामकोटीचे शंकराचार्य यांना दिवाळीच्या दिवशी करण्यात आलेली अटक आणि दुसरी म्हणजे पुण्यातील भंडारकर इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीजवर झालेला हल्ला.

दोन्हीही घटना २००४ साली घडल्या होत्या. या घटनांबद्दल जास्त चर्चा झाली नाही की त्याचा व्यापक विरोध झाला नाही. मात्र याने ब्राह्मण समाजात असुरक्षितेची भावना बळावली. समाजात सुरक्षा ही एकतेत असते, याच धारणेनुसार ब्राम्हण समाज एकत्र आला आणि २००६ साली अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाची स्थापना झाली. 

गोविंदराव कुलकर्णी आणि पं. वसंतराव गाडगीळ सोबत होते यांनी सोबत मिळून महासंघाची स्थापना केली. सध्या हे गोविंदराव कुलकर्णी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.  

समाजाला सुरक्षा प्रदान करणं, हेच त्याच मुख्य उद्देश्य होतं. पूर्वी समाजाला राजकीय संरक्षण प्राप्त होतं, मात्र नंतर ते नाहीसं होत गेलं. म्हणून जर समाजाला राजाश्रय मिळाला नाही तर समाजाचे प्रमुख काहीतरी योजना बनवतील आणि त्याआधारे समाजाचा विकास करण्याचे प्रयत्न केले जातील, असं ठरलं. यामध्ये समाजाचा आर्थिक विकास आणि राजकीय विकासाला प्राधान्य देत मार्गक्रमण करण्यात आलं. 

मुख्यतः पाच विषयांवर महासंघ काम करतं…

पहिला म्हणजे ब्राह्मणवादाचं पालन करणं. दुसरं म्हणजे सामाजिक सलोखा. देशभरातील सर्व समाजाशी चांगले संबंध प्रस्थापित करणं. तिसरं म्हणजे शैक्षणिक नीतीवर काम करणं. जर कॉलेजमध्ये एखाद्या व्यक्तीला ५ हजार रुपये फीस आहे तर ब्राम्हण विद्यार्थ्याला तीच फीस १ लाख का आहे? असा समाजाचा आक्षेप असून शिक्षण संस्था बनवण्यासाठी महासंघ कार्यरत आहे.

चौथा विषय म्हणजे ब्राम्हण तरुणांना नौकरी मिळवून देण्यासाठी काम करणं, जेणेकरून अर्थार्जनासाठी मदत होईल. पाचवा विषय म्हणजे राजकीय प्राबल्य स्थापित करणं. राजकारण अतिशय खराब आहे, त्यात ब्राम्हणांचं काही काम नाही. मात्र देशात चुकीची व्यवस्था स्थपित झाली आहे आणि तिला दुरुस्थ करणं ब्राम्हणांचं कर्तव्य आहे, असं ब्राम्हण समाजाचं म्हणणं आहे. 

म्हणून राजकरणात जाऊन एक चांगली राजकीय व्यवस्था स्थापन करण्यावर महासंघाचा भर आहे.

सोबतच ब्राह्मण मतांवरदेखील प्रभाव टाकण्यासाठी  महासंघ प्रयत्नशील आहे. लोकशाहीमध्ये वोट बँकेला खूप महत्व आहे आणि म्हणून ब्राह्मणांची एकत्र व्होटबँक बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. 

देशभरात साडे तेरा कोटी ब्राम्हण असून त्याना एकाच छताखाली आणण्यासाठी महासंघ काम करत आहे. सोबतच भारताच्या बाहेरील ब्राह्मणांना सामावून घेण्यासाठी ग्लोबल ब्राम्हण फेडरेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेशी देखील महासंघ जोडलेला आहे. 

सध्याच्या घडीला देशभरातील २० पेक्षा जास्त राज्यांमध्ये अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाची मुळं पसरलेली आहेत. केंद्रीय लेव्हल, राज्य लेव्हल, सिटी लेव्हल आणि तालुका लेव्हलवर महासंघाचं काम चालतं. 

महाराष्ट्रात अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचा प्रभाव किती आहे? हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूने महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं…

पुण्यात महासंघाच्या ३५ शाखा आहेत. त्यासाठी पुण्यात दोन जिल्हे विभागले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर अशी विभागणी आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ८ मंडळ आहेत तर पुणे शहरात १६ मंडळ आणि ग्रामीण ७ तालुके आहेत असे एकूण ३५ मंडळ आणि २ जिल्हे यामार्फत कार्य चालतं. 

पुण्यात १५ लाख ब्राम्हणांची लोकसंख्या आहे. जवळपास साडे ९ लाख वोटर्स आहेत. पुण्याच्या लोकसभेमध्ये ब्राम्हण समाजाचे साडे ७ लाख वोटर्स आहेत. तर प्रत्येक विधानसभेत लाखाच्या आसपास ब्राम्हण वोटर्स विभागले आहेत. यासर्व मतांवर अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ प्रभाव टाकतो. 

सध्या महासंघाची सभासद नोंदणी सुरु असून डिसेंबरपर्यंत ५ लाख सभासद करण्याचं टार्गेट असल्याचं, गोविंद कुलकर्णी यांनी सांगितलं. 

महासंघ कोणत्या मुद्यांना घेऊन सध्या राज्यात काम करत आहे? यावर गोविंद कुलकर्णींनी सांगितलं..

ब्राम्हणांना उद्योग क्षेत्रात नेण्याची योजना आहे. २०१८ ला ‘ब्रह्मोध्योग’ म्हणून एक्स्पो आणि कॉन्फरन्स घेतल्या होत्या. २०१६ ला औरंगाबादमध्ये घेण्यात आल्या होत्या, तर आता २०२३ ला दिल्ली हा कार्यक्रम असणार आहे. ब्राम्हण तरुणांना उद्योजक बनवण्यावर सध्या काम सुरु आहे. ३०० ते ४०० उअद्योग उभे करून त्याद्वारे आखली तयार करण्याचं प्लॅनिंग आहे. 

दुसरं म्हणजे UPSC च्या ट्रेनिंगसाठी काम सुरु आहे. यावर्षी २७ मुलांना ट्रेनिंग देण्यात आलं आहे. सध्या महासंघाच्या मार्फत शिक्षण आणि उद्योग आणि राजकीय पातळीवर ब्राम्ह्णण समाजाची वाढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

अशा या संघटनेने आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मागणी केली आहे. ब्राम्हण नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठीचा हा अट्टहास आहे. तेव्हा महासंघाच्या मागणीला केंद्राकडून काय प्रतिसाद येतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.