ओवैसींनी भेट आज दिली, पण असा आहे औरंगजेबाच्या कबरीचा इतिहास…

गुरुवारी दुपारी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी आपल्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान विविध दर्ग्यांना भेट दिली. पण सगळ्यात जास्त कुठली गोष्ट गाजली, तर

ओवैसी आणि एमआयएमच्या नेत्यांनी मुघल बादशहा औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट.

आपल्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान ओवैसी आणि इतर नेत्यांनी खुल्ताबादमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन, फुलं चढवली आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं. औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यामुळे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टिका केली. त्यावेळी ते म्हणालेत,

“खुल्ताबादमधल्या इतर दर्ग्यांमध्ये लोक जातात, पण तिथल्या औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन कोणीही घेत नाही. औरंगजेबानं हिंदू मंदिरं पाडली, हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एमआयएमवाल्यांनी त्याच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यामधून काहीतरी नवीन राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,”

तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी,

“औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सुसज्ज अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी खुल्ताबादमध्ये सगळ्या दर्ग्यांचं दर्शन घेतलं,”

अशी प्रतिक्रिया दिली.

या वादाचे काय पडसाद उमटतात हे येणाऱ्या काळात समजेलच. पण मुद्दा हा राहतो, की गुजरातमध्ये जन्मलेल्या, दिल्लीचा बादशहा असलेल्या आणि महाराष्ट्र काबीज करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या एका मुघल सुलतानाची कबर महाराष्ट्रात कशी खोदली गेली? आणि ही कबर आहे तरी कशी?

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज या स्वराज्याच्या तीन छत्रपतींच्या निधनानंतर आपण मराठ्यांचं स्वराज्य सहज आपल्या टापेखाली आणू असा औरंगजेबाचा विचार होता.

मात्र राजाराम महाराजांच्या पत्नी छत्रपती ताराराणी यांनी आपल्या सरदारांच्या साथीनं औरंगजेब आणि त्याच्या महाप्रचंड मुघल सेनेला झुंजवत ठेवलं.

सह्याद्रीच्या या रणझुंजार योध्यांचा मारा एका बाजूला आणि उन्हा-पावसाची झोडपणी एका बाजूला. त्यात आधीच वार्धक्य आणि सगळ्याच पातळ्यांवर हरलेला औरंगजेब थकला. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यानं प्राण सोडले. अखेरपर्यंत जो महाराष्ट्र जिंकायला औरंगजेबानं जंगजंग पछाडलं, तिथल्याच मराठी मातीत त्याचा अंत झाला.

औरंगजेबाचं निधन झाल्यावर मुघल सल्तनतीचं काय झालं, हे तर सर्वश्रुत आहे. पण औरंगजेबाचं पार्थिवही महाराष्ट्रातच दफन झालं.

औरंगजेबाची एक शेवटची इच्छा होती. ती म्हणजे, ‘मेल्यानंतर माझं शरीर माझे अध्यात्मिक गुरु शेख झैनुद्दिन यांच्या कबरीजवळच दफन करण्यात यावं.’ जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला, तेव्हा तो होता अहमदनगरमध्ये. त्याचा मुलगा आझमशहा आणि मुलगी झीनतउन्निसा यांनी त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी पार्थिव औरंगाबादमधल्या खुल्दाबाद इथं आणलं.

असं सांगतात की, आपलं दफन कसं व्हावं याबद्दल खुद्द औरंगजेबानंच मरण्याआधी सूचना देऊन ठेवल्या होत्या. मुघल सम्राटांमध्ये निधनानंतर त्यांची कबर भव्यदिव्य बांधावी, अशी प्रथा होती. मात्र औरंगजेबाच्या कबरीबाबत या सगळ्या गोष्टींना छेद दिल्याचं दिसून येतं.

एका लाकडी चौथऱ्याच्या मधोमध औरंगजेबाची मातीची कबर आहे, त्याच्यावरती छतही नाही.

असं सांगण्यात येतं की, औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याच्या कबरीवर सब्जाची झाडं लावण्यात आली आहेत. त्याची इस्लामवर गाढ श्रद्धा असल्यानं, त्याच्या श्रद्धेनुसार कबरीवरची जागा मोकळीच आहे.

आपल्या कबरीसाठी खुल्दाबादमधल्या दर्ग्यातली ही जागा औरंगजेबानं १४ रुपये आणि १२ आणे देऊन खरेदी केली. हे पैसे त्यानं आपल्या वृद्धापकाळात नमाजाच्या टोप्या शिवून आणि आपल्या हातानं लिहिलेल्या कुराणाच्या प्रतींमधून साठवले होते, असंही सांगण्यात येतं.

खुलं आकाश, लाकडी चौथऱ्याच्या मधोमध मातीची कबर आणि त्यावर पांढरी चादर असं औरंगजेबाच्या कबरीचं स्वरूप होतं. आजूबाजूला संगमरवरी इमारती, नक्षीदार मनोरे, मोठे घुमट, बगीचे हे सगळं इतर मुघल बादशाहांच्या कबरीजवळ आढळतं. मात्र औरंगजेबाची कबर साधीच होती.

WhatsApp Image 2022 05 12 at 7.42.48 PM
चित्रकार विलियम कारपेंटर याने काढलेलं औरंगजेबाच्या कबरीचं चित्र

हीचा कायापालट केला तो लॉर्ड करझननं. १८९९ मध्ये लॉर्ड करझनची भारताचा व्हॉईसरॉय म्हणून नियुक्ती झाली. आपल्या कार्यकाळात त्यानं भारताच्या बाबतीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ताजमहालच्या डागडुजीचं कामही पहिल्यांदा त्यानंच हाती घेतलं होतं.

त्यानं जेव्हा औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली, तेव्हा तिची अवस्था बघून, आजूबाजूला संगमरवरी रेलिंग बांधण्याचे आदेश दिले. तसेच कबरीच्या बाजूंना संगमरवरी जाळीही बसवण्यात आली.       

हैदराबादच्या निजामानं औरंगजेबाच्या कबरीची थोडीफार डागडुजी केली होती. त्यानं कबरीजवळ औरंगजेबाचं नाव असलेला एक सोनेरी दगड बसवला होता, ज्यावर लिहिण्यात आलं होतं…

अल्-सुलतान अल्-आझम वल् खकान अल्-मुकार्ररम हजरत अबुल मुझफ्फर मुईनुद्दीन मुहम्मद औरंगझेब बहादूर आलमगीर-I , बहादूर गाझी, शहेनशहा-ए-सलतनत-उल्-हिंदीया वल् मुघलिया    

या निजामानं औरंगजेबाच्या कबरीच्या आजूबाजूला दरवाजे बांधले आणि भिंतीही बांधल्या.  

विशेष म्हणजे पहिला निजाम असफ जाह (ज्याचं थोरल्या बाजीरावांसोबत युद्ध झालं होतं आणि ज्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला होता.) आणि  त्याचा मुलगा नासर जंग यांच्याही कबरी इथंच आहेत. इतकंच नाही, तर औरंगजेबाचा मुलगा आझमशहा आणि त्याच्या पत्नीची कबरही इथंच खोदण्यात आली आहे. 

जिथं औरंगजेबाचा मृत्यू झाला, त्या अहमदनगरमधल्या ठिकाणी दैनंदिन वापरातल्या वस्तू आणि कुराण ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

आता ओवैसी आणि एमआयएमच्या नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर राज्यात नेमकं काय घडणार? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.