ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना काय फायदा होतो?

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात हाहाकार उडवला आहे. पुण्यासारख्या शहरातील पावसाचे व्हिडिओ शेअर झाले, मीडियानेही ते कव्हर केलं. मात्र याहूनही जास्त हानी झाली आहे ती शेतकऱ्यांची. खरीप हंगामाचं पीक काढणीलाच आलं होतं मात्र ऐन टायमाला आलेल्या पावसाने पीक शेतात सडून चाललंय. विशेषतः सोयाबीन, कापशीचं पीक काही दिवसात काढायचंच होतं मात्र ऐन वेळी झालेल्या धुंवाधार पावसाने पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.

त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाला दिले आहेत.

त्याचबरोबर राज ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली आहे. “ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा,” असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं तेव्हा नुकसान भरपाईची मागणी तर होतच असते पण सोबतच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते तेव्हा प्रश्न पडतो की, ओला दुष्काळ जाहीर केल्यावर शेतकऱ्यांना कोणते फायदे होतात?  

त्याआधी हा ओला दुष्काळ काय असतो? तो केव्हा जाहीर केला जातो? हे जाणून घेऊया… 

दुष्काळाचे २ प्रकार असतात. एक कोरडा दुष्काळ आणि दुसरा ओला दुष्काळ. थोडक्यात सांगायचं तर कोरडा दुष्काळ म्हणजे ज्याठिकाणी पाऊस झालेलाच नसतो आणि ओला दुष्काळ म्हणजे त्याठिकाणी  प्रमाणाच्या बाहेर पाऊस झालेला असतो.

ओला दुष्काळ कधी जाहीर करता येतो ?

  • सतत सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस पडणे.
  • ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडणे म्हणजेच अतिवृष्टी होणे.
  • पुरामुळे व शेतात पाणी साचून ३३ टक्के पिकांचे नुकसान झाले अशी खात्री पंचनाम्यांतून पुढे येणे.
  • गुणवत्ता व दर्जावर विपरीत परिणाम होणे, जीवित व वित्तहानी होणे, पाण्याची सुकाळ परिस्थिती उध्दभवणे व दुष्काळाच्या विरुद्ध स्थिती होणे.

पावसामुळे भाताचे पऱ्हे पाण्याखाली बुडून कुजतात, शेतात घातलेलं खात वाहून जातं, पाळीवर लावलेल्या तुरी मुळासकट निघून जातात, पाण्याची धार लागते त्या जागी सुपीक माती वाहून जाते. सोयाबीन, कापूस आणि मिरची तर पूर्णपणे सडून जाते आणि परत लागवड करायची तर जमीन सुकायला १५ ते २० दिवस लागतात. या सगळ्यात शेतकऱ्यांचा पैसे, कष्ट आणि वेळ सगळं वाया जातं. 

ओला दुष्काळ जाहीर झाला तर शेतकऱ्यांना काय फायदा होतो?

ओल्या दुष्काळात मदत देताना कर्जवसुली स्थगित होते. नंतर पिकाच्या नोंदणीनुसार जर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर त्या पिकाची नुकसानभरपाई मिळण्यास शेतकरी पात्र असतात. यात कोरडवाहू आणि बागायतीसाठी वेगवेगळे निकष असतात.

ओला दुष्काळ जाहीर झाल्यास २०१५ च्या शासन निर्णयानुसार हेक्टरी ३४ हजार रुपये मदद देण्याची तरतूद आहे. याअंतर्गत कोरडवाहू शेतीसाठी जवळपास १३ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायती शेतीसाठी जवळपास १८ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई दिली जाते.

नैसर्गिक आपत्ती विभागाकडे पीक नुकसानीचे हे अहवाल पाठविले जातात.

मात्र भात, कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या लागवडीसाठी यापेक्षा जास्त खर्च येतो. रासायनिक खतं आणि बियाण्यांच्या किंमती वाढलेल्या आहेत. तसंच पूर ओसरल्यानांतर पुन्हा जमीन लागवडी योग्य बनवण्यासाठी बराच खर्च येतो. नांगरणी, वखरणी, खुरपणी, पळे टाकणे, खतं, औषधांची फवारणी आणि मजुरांना दिलेली मजुरी या सगळ्यांचं गणित जुळवलं तर ओल्या दुष्काळावर मिळणारी मदत पुरेशी नाही. 

काही एक मोठे शेतकरी सोडले तर मुळात गरीब असलेल्या या भागातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी हा भार मोठा आहे. म्हणून नवीन सुधारित नियम बनवून हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.