तुमची स्टार्ट- अपची आयडिया भारी आहे, फक्त फंडिंगची सोय अशाप्रकारे करू शकता
भारतात स्टार्ट- अप इकोसिस्टिम आज शिखरावर आहे. या इकोसिस्टिममध्ये आतापर्यंत जवळपास ५७ हजार स्टार्ट- अपची नोंद झाली आहे. २०१४ ते २०२१ दरम्यान भारतीय स्टार्टअप्सनी सुमारे $११२ अब्ज उभे केले आहेत. शार्क टॅंक सारख्या शोच्या लोकप्रियेनंतर आपल्याला प्रत्येकालाच स्टार्टअप काढायची इच्छा होत असेल.
तशा तर आयडिया आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात येतात पण पॉईंट तेव्हा बनतो जेव्हा त्या आईडियाचं काही तरी फलित होईल. आणि ज्यांना ज्यांना ही आयडिया प्रत्यक्षात आणायची असते त्यांच्यापुढील पहिला प्रॉब्लेम असतो पैशांचा. पण आता तुमची आयडिया जरा हटके असेल तर इन्वेस्टर्स पैसे लावायला पुढे येईला लागलेत. त्यामुळे ही फंडिंग कोण देतं, यातले टॉपचे प्लेयर कोण आहेत हे बघण्यासाठी हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.
आता तुम्हाला हे तर माहित असेल की फंडिंग काय एकगठ्ठा घेतलं जात नाही तर ते टप्या टप्यांत घेतलं जातं.
तर सुरवात करू स्टार्टअपच्या फंडींगच्या स्टेजेसपासून. तर या स्टेजेसची सुरवात होते प्री-सीड स्टेज पासून .
प्री-स्टेज-
प्री-सीड फंडिंग म्हणजे जेव्हा संस्थापक म्हणजे तुम्ही त्यांच्या कल्पनांना एक रूप देऊन स्टार्टअप अस्तित्वात आणता. या स्टेजला अनेकदा फाउंडर्स स्वतःचे पैसे लावतात.
सीड स्टेज-
याच स्टेजपासून स्टार्टअप्स बाहेरून भांडवल आणण्यास सुरुवात करतात . या टप्प्यावर एंजेल इन्वेस्टर्स , इन्क्युबेटर्स , ऍक्सेलेटर्स यांच्याकडून फंडिंग जमा केले जाते. या स्टेजला स्टार्टअपला फील्ड ट्रायल घेणे, संभाव्य ग्राहकांवर उत्पादनाची चाचणी घेणे, एकाधा मेंटॉर नेमणे,टीम तयार करणे ही आवश्यक कामं करण्यासाठी इथं तुम्हाला फंडिंग लागते.
आता ह्यात जी फंडींगवाल्यांच्या नावांचा अर्थ काय होते ते नंतर एक्सप्लेन करतो आधी फक्त स्टेजेस बघून घेऊ.
यानंतर येते सिरिज A,B आणि C स्टेजेस .
सिरिज A –
या टप्प्यावर येण्यासाठी सामान्यत: तुमची आयडीया मार्केटमध्ये चांगली चालू शकते हे तुम्हाला प्रुव्ह करावं लागतं. त्याचबरोबर पूर्वी गुंतवलेल्या पैशातुन स्टार्टअपने काय केले याचे आकडे गुंतवणूकदार पाहू लागतात. इथं तुम्हाला प्रॉफिटच दाखवावा लागतो असं काही नाही. परंतु त्यांना हे जाणून घ्यायचे असते की तुम्ही कोणत्या मेट्रिक्सवर सुधारणा केली आहे. आणि भविष्यात जर त्यांनी पैसे लावले तर तुमचं स्टर्टअप पैसे छापण्याची मशीन बनू शकते की नाही.
स्टार्ट अपमध्ये सगळ्यात जास्त पैसे लावणाऱ्या व्हेंचर कॅपिटॅलिस्टची एंट्री या स्टेजला होऊ शकते . या स्टेजचा पैसा सामान्यतः आतापर्यंत जे तुम्ही जे काम केलं आहे त्यात सुसूत्रता आणण्यासाठी, तसेच स्टार्टअपची स्केलेबिलिटी वाढवणाच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या तयारीसाठी वापरण्यात येतं.
सिरीज B –
या स्टेज मध्ये तुम्ही पूर्णपणे व्हेंचर कॅपिटॅलिस्टने तुमच्या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक करावी यासाठी प्रयत्न करता. प्रयत्न करता म्हणण्यापेक्षा त्याला आणावंच लागतं. तुमचं स्टार्ट जे आता पूर्णपणे एस्टॅब्लिश झालं आहे त्याला मोठया नवीन मार्केटमध्ये उतरवणे, स्केलेबिलिटी वाढवणे यासतरही तुम्हाला मोठ्या फंडींगची गरज असते ती या स्टेजमध्ये पूर्ण केली जाते.
सिरीज C –
तुमही या स्टेज आलाय म्हणजे तुम्ही आता आपलं चांगलंच बस्तान बसवलं आहे. त्यामुळे सामान्यतः या स्टेजला तुम्ही तुमच्या मार्केटमधला शेअर वाढवणे, स्पर्धेत पुढे जाऊन मार्केटमधल्या इतर प्लेयर्सना एलिमिनेट करणे, मग ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा ओतून स्पर्धकांना नामोहरण करणं असू दे की तुमची ज्याच्याशी कॉम्पिटेशन आहे त्याला विकत घेणं असू दे हे सर्व कार्यक्रम या स्टेजपासून सुरु होतात असं म्हटलं तरी चालेल. इथं तुम्ही मोठे व्हेंचर कॅपिटॅलिस्ट इव्हन कॉर्पोरेट इन्व्हेस्टर आणण्याचे प्रयत्न करतात.
आता यानंतर तुमच्याकडे जर अजून बऱ्यापैकी इक्विटी बाकी असेल तर तुम्ही पुढचे D,E,F…असे राउंड देखील चालवू शकता.
नाहीतर तुम्ही तुमच्या स्टार्ट-अपचा IPO आणता आणि तुमचं स्टार्ट-अप पब्लिक लिमिटेड कंपनी बनते.
स्टेजेस झाले.
आता या स्टेजेसला फंडिंग करणाऱ्यांबद्दल जाणून घेऊ. त्यात तुम्हाला स्टार्ट अप मधल्या काही महत्वाच्या टर्म्स पण कळतील.
स्वतःचा पैसा किंवा बूटस्ट्रॅपिंग-
स्वतःच्या स्टार्टअपवर स्वतःचे पैसे लावणे हि एक चांगली आयडिया असू शकते. यामुळे तुम्हाला कर्जावर हफ्ते फेडावे लागत नाहीत किंवा इतर गुंतवणूकदारांसोबत नफा शेअर करावा लागत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या स्टार्टअपच्या निर्णयांवर स्वतःचेच नियंत्रण ठेवता. पण यात रिस्क पण आहे जर आयडिया चालली नाही तर मग मात्र तुम्ही तुमची सगळी कमाई गमवून बसता.
बूटस्ट्रॅपिंगवर स्टार्टअप चालवणे म्हणजे तुम्हाला खूप काटकसर करून स्टार्ट-अप चालवावं लागतं. झोहोचे श्रीधर वेंबू किंवा झीरोधाचे नितीन कामथ यांनी आपले स्टार्ट-अप बूटस्ट्रॅपिंगनेच सुरु केले होते.
कुटुंब आणि मित्रांकडून पैसे उभा करणे.
प्री -सीड स्टेजला अनेक स्टार्टअप संस्थापकांनी त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांकडून पैसे उभे केले आहेत. त्यांनी तुम्हाला, तुमच्या आयडियाला जवळून पाहिलेले असते आणि त्यामुळे ते तुमच्यावर विश्वास ठेवण्याची सर्वात जास्त शक्यता असते. आता ही लोकं असंच विश्वास टाकून पैसे देत असली तरी त्यांना त्यांच्या फंडींगसाठी इक्विटी स्टेक किंवार व्याजावर कर्ज देणं हे व्यवहाराच्या दृष्टीने चांगलं असतं. असंगी फंडिंग घेण्याचा फायदा म्हणजे तुमच्या स्टार्ट-अप वर तुमचं पूर्ण नियंत्रण राहतं.
पण जर का आयडिया चालली नाही आणि त्यांना त्यांचे पैसे रिटर्न मिळाले नाहीत तर मात्र तुमची नाती बिघडू शकतात.
त्यामुळे लॉस झाला तरी तरी ते सहन करण्याची क्षमता असणाऱ्या गुंतवणूक दारांकडे फंडिंगसाठी जाणे एक चांगला ऑप्शन समजला जातो.
इनक्यूबेटर:
इनक्यूबेटर म्हणजे उद्योजकांना त्यांचे स्टार्टअप तयार करण्यासाठी आणि ते लॉन्च करण्यासाठी मदत करण्याच्या विशिष्ट उद्दिष्टासह स्थापन केलेल्या संस्था असतात. केवळ इनक्यूबेटर अऑफिस स्पेस, युटिलिटीज, प्रशासन आणि कायदेशीर सहाय्य याचबरोबरच ग्रँट्स ,कर्ज,इक्विटी गुंतवणूक देखील ऑफर करतात.
एंजेल फंडिंग किंवा सीड फंडिंग:
एंजेल गुंतवणूकदार हे कोटींमध्ये नेट-वर्थ असलेल्या व्यक्तीं असतात ज्यांचा साइड बिझनेसच एकप्रकारे चांगल्या आडियामध्ये इन्व्हेस्ट करणे हा असतो. . या प्रकारच्या स्टार्टअप फंडिंगला सीड फंडिंग असेही संबोधले जाते, कारण ते तुमच्या व्यवसायाला सुरुवातीच्या टप्प्यात मदत करतात. म्हणजे अगदी (एंजेल) देवदूतासारखे धावून येतात.
मग एंजेल गुंतवणूकदार कोणत्याही ट्रॅक रेकॉर्डशिवाय स्टार्ट अपला सीड मनी का देतात?
कारण सुरवातीला रिस्क घेऊन स्टार्ट अप यशस्वी झाल्यांनतर त्यातले आपले शेअर्स विकून ते पैसे कमवतात.
एंजल गुंतवणूकदारांनी अर्बन कंपनी, ओला आणि स्नॅपडीलसह भारतातील अनेक प्रमुख कंपन्या सुरू करण्यास मदत केली आहे. ज्यांना बँक कर्ज मिळत नाही त्या स्टार्टअप्ससाठी हा एक चांगला पर्याय आहे. पण एंजल गुंतवणूकदार अनेकवेळा ३०% पर्यंत इक्विटीची अपेक्षा करतातत्यामुळे निर्णयप्रक्रियेत त्यांनाही स्थान द्यावे लागते. तसेच सुरवातीला भांडवलाची निकड असल्याने अनेकदा कमी भांडवलासाठी पण तुम्हाला स्टार्ट-अपची मोठी इक्विटी सोडावी लागते.
तुमचे शार्क टँकचे सगळे जजेस याच कॅटेगरीत येतात.
व्हेंचर कॅपिटल फंडिंग:
व्हेंचर कॅपिटल हे इक्विटी आणि कंपनीच्या नियंत्रणाचा मोठा हिस्सा घेतात. म्हणून जेव्हा तुम्ही आधीच कमाई करत असाल आणि स्टार्ट अपच्या जलद वाढीसाठी मोठ्या पैशांची गरज असेल तेव्हाच अगदी नंतरच्या स्टेजवर VC निधी वापरणे उचित ठरते. फ्लिपकार्ट आणि बुक माय शो या हे VC मनी वापरून यशस्वी झालेल्या कंपन्यांची काही यशस्वी उदाहरणे आहेत. SoftBank Sequoia Capital आणि Tiger Global हि टॉपची व्हेंचर कॅपिटल फंडिंग मधली मोठी नावं आहेत.
सॉफ्ट बँकेने पेटीएम, फ्लिपकार्ट, ओला, ओयो, स्विगी, दिल्लीवेरी, इनमोबी आणि लेन्सकार्ट या स्टार्ट-अप्स मध्ये गुंतवणूक करून त्यांना युनिकॉर्न बनवले आहे.
व्हेंचर कॅपिटल कंपन्या या प्रोफेशनल मॅनेजमेंटकडून चालवल्या जातात. ज्या स्टार्टअप्स मध्ये मोठ्या क्षमता आहे त्याच्यातच गुंतवणूक करण्यास हे इंव्हेटर्स प्राधान्य देतात. काही प्लेयर्स त्यांची गुंतवणूक तीन ते पाच वर्षांत काढून घेण्याच्या मागे असतात. त्यामुळे, तुमच्या उत्पादनाच्या गर्भावस्थेचा कालावधी दीर्घ असल्यास, असं त्वरित बाहेर पडण्याच्या मागे असलेल्या VC कडे जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट वर मोठे रिटर्न्स पाहिजे असल्याने अनेकदा निर्णयप्रक्रियेत ते मोठा हस्तक्षेप करतात.
बँक कर्ज:
व्यावसायिक बँका स्टार्टअप्सना कर्ज देतात. पण रिस्क कमी करण्याकरता कर्ज मंजुरीसाठी त्या अनेक कठीण अटी घालतात . बँकांना तुमची परतफेड करण्याची क्षमता देखील पाहणे आवश्यक असते. तुम्हाला तुमचे पर्सनल असेट्स ज्यामध्ये घराचाही समावेश होतो हे गहाण ठेवण्यास सांगितलं जातं. आणि त्यात त्यांचे हफ्ते, ठराविक काळात कर्ज परत करण्याची सक्ती या गोष्टींचा प्रेशर राहतो.
क्राउडफंडिंग :
क्राउडफंडिंग हा स्टार्टअपसाठी भांडवल जमा करण्यासाठीचा अजून एक मार्ग आहे. यामध्ये व्यावसायिक गुंतवणूकदारांऐवजी हे सामान्य लोकांकडून पैसा उभारला जातो.
यामध्ये तुम्ही तुमच्या स्टार्ट अपची आयडिया क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर मांडतात. तुमच्या आइडियावर विश्वास असल्यास लोकं पैसे लावतात. यामध्ये पैशांबरोबरच तुमच्या स्टार्ट-अपची मार्केटिंग पण होते. भारतातील काही लोकप्रिय क्राउडफंडिंग साइट्स म्हणजे Catapoolt, Fundlined, Indiegogo, Ketto आणि Wishberry.
आता स्क्रोल करणं बसणं बास करा आणि कामाला लागा.
हे ही वाच भिडू :
- विदर्भाच्या पोट्ट्याचं जंगली मधाचं स्टार्टअप आदिवासींना सुद्धा चांगलं इनकम मिळवून देतंय
- स्टार्टअप सुरु करायच्या आधी त्याची सगळी A,b,c,d, माहित करून घे भिडू …
- या भावड्याच्या स्टार्टअपने अमेरिकेच्या शार्क टॅंकमधून गुंतवणूक मिळवलीय